आरोग्य योजनांमुळे महाराष्ट्रातील ९० टक्के जनतेला आरोग्य कवच- मुख्यमंत्री

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयास १०० कोटी तर सामान्य रुग्णालयास महिनाभरात जमीन देणार

लातूर:- आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९० टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध झाले आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास १०० कोटी रुपये तीन वर्षात टप्प्याटप्प्याने देण्यात येतील तर सामान्य रुग्णालयास महिनाभरात जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले.

लातूर येथे आयोजित विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, सुरेश धस, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, महापौर सुरेश पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अशोक कुकडे, रमेश कराड, गणेश हाके, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनलावे, लातूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून याअंतर्गत ५० कोटी लोकांना आरोग्य कवच उपलब्ध झाले आहे. प्रत्येक रुग्णाला पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. तसेच राज्यात महात्मा फुले जन आरोग्य व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या आरोग्याच्या योजनांच्या माध्यमातून ९० टक्के लोकांना आरोग्यावरील विविध उपचार मोफत मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांना आरोग्यावरील खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेक लोक उपचार घेत नाहीत. उपचारावर झालेल्या खर्चामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना विविध आरोग्याच्या योजनांच्या माध्यमातून त्यांना मोफत उपचाराच्या सुविधा देऊन त्यांचे जीवन आरोग्यदायी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शासनाच्या आरोग्याच्या या योजनांमुळे ग्रामीण भागातही मोठमोठी अद्ययावत रुग्णालये सेवा सुरु होण्यास मदत मिळेल. त्यामुळे ग्रामीण जनतेला ग्रामस्तरावरच अद्ययावत आरोग्य सेवा मिळाल्याने सर्वसामान्य लोक समाधानी होतील. या माध्यमातून राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे मोठे जाळे निर्माण होईल. स्वर्गीय प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने हे अटल महाआरोग्य शिबीर आयोजित केले असून त्यांची सर्वसामान्य लोकांप्रती असलेली तळमळ व प्रेम पाहून या शिबिराला देण्यात आलेले अटल हे नाव अत्यंत सार्थ ठरत आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, या शिबिराच्या माध्यमातून एकही गरजू रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही. तसेच अन्न, वस्त्र व निवारा या गरजाबरोबरच शिक्षण व आरोग्य या मुलभूत गरजा झाल्या असून त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध आरोग्य सुविधा नव्याने उपलब्ध करुन देण्यासाठी, काही सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी १०० कोटीचा निधी तीन वर्षात देण्यात येईल. पहिला टप्पा मार्च २०१९ पूर्वी देऊ तर सामान्य रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न एका महिन्यात सोडवून त्यातून लातूर जिल्ह्यातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात ७७ टक्के पाऊस झाला असून मराठवाड्यात त्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडविला जाईल. शासनाने साडेतीन वर्षात शेतकऱ्यांना २२ हजार कोटीची मदत केली असून याच कालावधीत साडेआठ हजार कोटीची धान्य खरेदी केली आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करुन दिलासा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील १२ लाख बेघरांपैकी १० लाख बेघर लोकांना सन २०१९ पर्यंत घरकुले दिली जाणार आहेत. उर्वरित दोन लाख बेघर लोकांच्या नवीन याद्यांना मंजुरी प्रदान करुन त्यांनाही घरकुल देऊन संपूर्ण राज्यात एकही गरजू घरापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सन २०११ च्या जनगणनेनुसार सर्व १० लाख बेघर लोकांना घरकूल उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. या शिबिरात आलेल्या सर्वांना निरामय आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मागील चार वर्षांपासून आरोग्य शिबीरे आयोजित केली जात आहेत. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एकही गरजू रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. याअंतर्गत उपचारावरील खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. याकरिता समाजातील दानशूर व्यक्ती, खाजगी कंपन्या यांच्या माध्यमातून उपचाराचा खर्च केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. शासन पाणी आणि रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या आरोग्यांच्या विविध योजनांमुळे लोकांचे जीवन आरोग्यदायी होणार आहे. या शासनाचे शिक्षण, पोषण व आरोग्य हे मिशन असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देऊन या माध्यमातून समाज पूर्णपणे विकसित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या शिबीराच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळत आहेत. हे शिबीर आरोग्याचा कुंभमेळाच असल्याचे मत पालकमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केले. त्याप्रमाणेच जिल्ह्यात जलयुक्तच्या माध्यमातून पाणी वाढ निर्माण झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत सर्वात जास्त वैद्यकीय मदत मिळणारा लातूर जिल्हा असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगून लातूरला उजनीचे पाणी मिळावे व येथील सामान्य रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर, निरामय फाऊंडेशनचे कार्यकर्ते, अभिमन्यू पवार, अरविंद पाटील-निलंगेकर यांचाही पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे लाभार्थी यांच्या बाईटवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

या शिबीराचा उद्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात सांगितला तर सूत्रसंचालन शिबीर समन्वयक रामेश्वर नाईक यांनी करुन आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *