उद्योजकांनी व्यापार आणि सेवा क्षेत्राची सांगड घालून मुंबईचा विकास साधावा! -उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई:- व्यावसायिक व उद्योजकांनी व्यापार व सेवा क्षेत्राची सांगड घालून मुंबईची प्रगती साधावी, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल येथे केले. जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेल्या केनोरिटा गारमेंट हबचे उद्गाटन करताना ते बोलत होते. यावेळी उद्योजक कंजीभाई रिटा, बिरेन लिंबाचिया, कमलेश लिंबाचिया, हेमंत जैन आदी उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या शुभ प्रसंगी जोगेश्वरी परिसरात काही व्यापाऱ्यांनी भव्य असे वस्रप्रावरण दालन (गारमेंट हब) उभे केले आहे. दालनामुळे मुंबईतील छोट्या मोठ्या उद्योगांना फायदा होणार आहे. यावेळी श्री. देसाई म्हणाले, गेल्या काही दिवसांत मुंबई परिसरातून जड उद्योगांची संख्या घटली आहे, परंतु लोकसंख्येत काही घट झालेली नाही. वाढत्या लोकसंख्येच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी सेवा क्षेत्र, टेक्स्टाईल्स, आयटी, जेम्स-ज्वेलरी आदी क्षेत्राची वाढ होण्याची गरज आहे.
परवडणारी घरे बांधताना व्यापारदेखील वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. नवी मुंबई परिसरात दोनशे एकर भूखंड खुला होत असून या ठिकाणी सेवा क्षेत्राचा विस्तार होण्याची गरज आहे. शिवाय मिठागराच्या खुल्या जमिनीवर गृहप्रकल्प होणार आहे. येथील व्यापारी, व्यावसायिकांनी अशा जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे श्री. देसाई म्हणाले.