गोपुरी आश्रमात “आंम्ही भारताचे लोक” या पुस्तकावर विचार मंथन

म.गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्ताने राष्ट्र सेवा दल शाखा कणकवली व गोपुरी आश्रमाच्या वतीने पत्रकार संजय आवटे यांच्या पुस्तकावर विचार मंथन संपन्न!

कणकवली:- सर्वांगिण दृष्ट्या युवाई सजग होण्यासाठी संजय आवटे यांचे “We The People of India” ‘अर्थात आम्ही भारताचे लोक’ हे पुस्तक प्रत्येक युवकाने वाचायला हवे. देशात घडलेल्या,सद्या घडत असलेल्या आणि पुढे घडू शकणाऱ्या सर्वच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांचे अत्यंत तटस्थपणे आवटे यांनी विवेचन करुन वर्तमान कालीन आणि भविष्यातील युवा पिढी सजग होण्यासाठी या पुस्तकात वैचारिक मंथन करून प्रभावी मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या चर्चेतील हभागी युवक- युवतींनी या पुस्तकाला छत्रीची उपमा दिली. छत्री पाऊस थांबवत नाही, पण पावसातून आपला बचाव करते.त्याप्रमाणे युवकांची मानसिकता सक्षम आणि ‘माणव’ या विचारांकडे नेण्याचा प्रयत्न हे पुस्तक करू शकेल असा विश्वास ही सहभागी युवा- युवतींनी व्यक्त केला.
युवा वर्गाच्या खांद्यावर कोणत्याही देशाचे अस्तित्व अवलंबून असते.यासाठी देशातील युवा पिढी विवेकी, संस्कारक्षम, प्रगतशील विचारांची बौद्धिक बैठक सक्षम असलेली असावी लागते. हा विचार या पुस्तकातून मिळण्यास मदत होईल असा आशावाद सहभागींनी व्यक्त केला.
या पुस्तकात संजय आवटे यांनी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या देशातील सर्वच चळवळींच्या चुकीच्या बाजू मांडताना त्यांनी केलेल्या चांगल्या बाजूही तेवढयाच सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न करून या पुस्तकात विचारांचा बॅलन्स साधन्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे देशातील सर्वच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील घटकांना हे पुस्तक अंतर्मुख करायला मदत करू शकेल, असेही मत सहभागींनी व्यक्त केले.तसेच युवकांच्यातील माणूस जागृत करण्याचे काम करेल असा आशावाद या पुस्तकाची मांडणी करणाऱ्या पुजा राणे आणि भाग्यश्री घोगळे या युवतींनी व्यक्त केला.भविष्यात या विचारांची देशाला नितांत गरज आहे.या पुस्तकावरील चर्चेत उपस्थित मान्यवर आणि सहभागी युवक, युवतींनी ऊस्फूर्त सहभाग घेतला.

या पुस्तकाबरोबरच गिरीश प्रभुणे यांच्या ‘पारधी’ या पारधी समाजाच्या जीवनावरील कादंबरी विषयी पल्लवी कोकणी हिने विवेचन केले.मिळून साऱ्याजणी मासिकातील सूवर्णा दामले यांच्या ‘कलंकित जगणे’ या लेखाविषयी मनोगत मांडले.अभया पुरूषोत्तम रजनी यांनी जॉन हेगर्टी यांच्या ‘हेगर्टी ऑन क्रीयेटीव्हीटी’ या इंग्रजी पुस्तकातील हेगर्टी यांचे क्रियेटीव्हीटी विषयीचे विचार सांगितले.
सिद्धी वरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे अद्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम कदम,गोपुरी आश्रमाच्या संचलीका अर्पिता मुंबरकर, संचालक अमोल भोगले, राष्ट्र सेवा दल शाखा कणकवली च्या अद्यक्षा पुजा राणे, उपाध्यक्ष प्रथमेश लाड, सचिव सिद्धी गुडेकर,संघटक प्रज्ञा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी कोकणी तर सुत्रसंचालन पुजा बुचडे हीने मांडले. या कार्यक्रमाला मान्यवरांच्या व्यतिरिक्त ३० युवक युवती सहभागी होते.

(छायाचित्र- गोपुरी आश्रमात आयोजित संजय आवटे यांच्या आंम्ही भारताचे लोक या पुस्तकावर आधारित चर्चेत विवेचन करताना सिद्धी वरवडेकर, बाजूला पुजा बुचडे, प्रथमेश लाड,पुजा राणे, सिद्धी गुडेकर,प्रज्ञा कदम, अर्पिता मुंबरकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *