पंजाबमधील ‘रावण दहना’तील भीषण दुर्घटनेत ७० ठार, ३०० जखमी
अमृतसर- शुक्रवारी सायंकाळी ६:५० मिनिटांनी पंजाबातील अमृतसरजवळ मानावाला आणि फिरोजपूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या जोडा रेल्वेफाटकाजवळ लोहमार्गालगतच्या मोकळ्या जागेत विजयादशमीनिमित्त ‘रावण दहना’चा पारंपरिक कार्यक्रम सुरू होता. प्रतिकात्मक रावणाचे दहन सुरू होताच रावणाच्या पुतळ्यातील फटाके जोरात वाजू लागले आणि जिकडे तिकडे उडू लागले. त्यामुळेही बघ्यांची गर्दी लोहमार्गावर आली. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यात मग्न होते. त्याचदरम्यान अमृतसर हावडा मेल वेगाने निघालेली रेल्वे या मार्गावरून आली आणि लोहमार्गावर असलेल्या जमावाला चिरडत वेगाने पुढे गेली. तर काही सेकंदात दुसऱ्या बाजूने डीएमयू ट्रेन आली. त्यामुळे आणखी अंदाधुंदी माजली व ७० जण मृत्युमुखी आणि ३०० जखमी झाले.
या गंभीर घटनेने अवघा देश सुन्न झाला. पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जातील आणि जखमींवर मोफत उपचार होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. तर मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जी दुर्घटना घडली ती अत्यंत क्लेशदायक आहे मी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.