प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सविता जप्तीवाले यांच्या व्यवसायाला चालना
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वतःची प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या अनेक लाभार्थींपैकी एक म्हणजे सांगलीच्या सविता अनिल जप्तीवाले. त्यांच्या वर्षानुवर्षांच्या घरगुती, छोट्या प्रमाणात असलेल्या केटरिंग व्यवसायाला दोन वर्षांपूर्वी मुद्रा योजनेचा हातभार लागला. त्यातून त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली आहे.
सविता जप्तीवाले यांना नवनवीन पदार्थ बनविणे आणि ते इतरांना खाऊ घालण्याचा छंद होता. १९९० साली अनिल जप्तीवाले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पती नोकरीला गेल्यानंतर घरात त्यांच्या पाककलेचे प्रयोग सुरू होत. छंद जोपासण्याबरोबरच थोडीफार कमाई होईल, या हेतूने त्यांनी छोट्याशा प्रमाणात विद्यार्थ्यांना मेसचे डबे पुरवणे सुरू केले. मागणीप्रमाणे दिवाळीचा फराळही त्या करून देत असत. केवळ छंद म्हणूनच त्या हे करत असल्याने त्याचे रुपांतर मोठ्या प्रमाणात व्यवसायात करावे, असा विचार त्यांच्या मनात कधी आलाच नाही.
याबाबत सविता जप्तीवाले म्हणाल्या, जवळपास २० वर्षे मी छोट्याशा प्रमाणात विद्यार्थ्यांना मेसचे डबे पुरवले. मात्र, २०१४ साली मला पी.एन.जी.या सराफा दुकानात नाश्ता पुरवता का? असे कुणीतरी सुचविले. मी त्यांना भेटले. माझ्या हातच्या पदार्थांची चव त्यांना आव़डली. त्यामुळे पी.एन.जी.कडून होकार दिला. यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले. आज दुकानातील १६० जणांना सकाळचा नाश्ता मी पुरवते. गेल्या चार वर्षांत यात एक दिवसाचाही खंड पडला नाही, हे सविता जप्तीवाले आनंदाने सांगतात.
सविता जप्तीवाले पी.एन.जी. सराफा दुकानात पोहे, उपीट, शिरा या नेहमीच्या पदार्थांबरोबरच पावभाजी, कुर्मा पुरी, मिसळ-पाव, भेळ, दाबेली, बटाटे वडे, दही वडे, उदीड वडे, पराठे, इडली असे विविध प्रकारचे पदार्थ पुरवतात.
सविता जप्तीवाले म्हणाल्या, दुकानात रोज १६० जणांना सकाळचा नाश्ता पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनसामग्री नव्हती. त्यामुळे खूप वेळ खर्ची होत असे. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. त्यामुळे मी व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी घेण्यासाठी पैशाची जुळणी करायचा विचार करत होते. त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर तेथील शाखाधिकारी श्री.यु.व्ही.फडके व जिल्हा समन्वयक श्री.एस.आर.डांगे यांनी मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एक लाख रुपयांचे कर्जही मंजूर केले.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून विनातारण कर्ज मिळाल्याने सविता जप्तीवाले यांना त्याचा व्यवसायवृद्धीसाठी फायदा झाला. व्यवसायासाठी आवश्यक फूड प्रोसेसर, ग्राईंडर, गॅस शेगड्या, मोठी भांडी घेतली. मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवताना कांदा चिरणे, भाज्या चिरणे अशा कामांसाठी खूप वेळ जायचा. फूड प्रोसेसरमुळे या वेळेची बचत झाली. शिवाय आज त्यांच्याकडे ३ महिलाही मदतीसाठी कामाला आहेत. या महिलांना रोजगार दिल्याचे समाधान त्यांना आहे.
एकूणच प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सविता जप्तीवाले यांच्या व्यवासायास गती मिळाली आहे, हे निश्चितच!
संप्रदा बीडकर (माहिती अधिकारी) सांगली