भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया-पंतप्रधान

नवीदिल्ली:- ७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ८२ मिनिटे संबोधित केले. गेल्या चार वर्षात सरकारने केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यातील योजना देशासमोर मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाट येथे लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-

१) महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी देशात सत्याग्रही तयार केले. या सत्याग्रहींनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले. आज महात्मा गांधींच्या प्रेरणेतून आम्ही स्वच्छाग्रही तयार केले आहेत. हे स्वच्छाग्रहीच देशाला स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतील.

२) भारतात राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे तीन लाख बालकांचा प्राण वाचला. आज देशातील लाखो बालकं निरोगी आयुष्य जगत आहेत. आपल्या या मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले.

३) यावर्षी २५ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान देशाला सर्मपित केले जाणार असून गरीब व्यक्तीलाही चांगली आणि परवडणारी आरोग्य सेवा या माध्यमातून मिळणार. आरोग्य क्षेत्रातील सरकारच्या या अभियानाचा देशातील ५० कोटी भारतीयांना फायदा होणार आहे. देशातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील प्रामाणिक करदात्यांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.

४) बलात्कार पीडित मुलीला ज्या त्रासाचा सामना करावा लागतो त्या वेदना मी समजू शकतो. देशाला या राक्षसीवृत्तीतून मुक्त करायचे आहे.

५) तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आम्ही कायदा करत आहोत, मात्र काही लोक त्याला विरोध करत आहेत. मी मुस्लीम महिलांना आश्वासन देतो की हा कायदा येणारच.

६) जम्मू- काश्मीरमध्ये गोळीच्या नव्हे तर गळाभेट घेऊन आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आगामी काळात तेथील ग्रामस्थांनाही महत्त्वाचे अधिकार मिळणार, तिथे पंचायत तसेच महापालिका निवडणुका होतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु.

७) काळा पैसा व भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाते. देशातील दलालांचे दुकानही बंद पाडले.

८) देशातील विविध योजना या करदात्यांच्या पैशांमधून राबवल्या जातात. या योजनांचे श्रेय हे सरकारचे नव्हे तर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना.

९) २५ सप्टेंबरपासून पंतप्रधान आरोग्य अभियानाला सुरुवात होईल. देशातील गरीब जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळणे ही काळाची गरज.

१०) देशातील १३ कोटी लोकांना मुद्रा कर्ज देण्यात आले असून यातील ४ कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले आहे. यातून देशातील बदल दिसून येतो.

११) कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.

१२) देश तोच आहे, जमीन, आकाश, समुद्र, सरकारी कार्यालय देखील तेच आहे. निर्णय घेणारी प्रशासकीय यंत्रणाही तीच आहे. गेल्या चार वर्षात देशाने बदल अनुभवला आहे.

१३) १०० हून अधिक उपग्रह अंतराळात सोडून भारताने जगाचे लक्ष वेधले. अंतराळ क्षेत्रातील वाटचाल लक्षणीय असून आगामी वर्षांमध्ये अंतराळात मानवाला पाठवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल. यादृष्टीने वैज्ञानिकांनी पाऊलंही उचलली आहेत. इस्रोमध्ये याबद्द्ल फार वेगाने काम सुरू आहे. ‘मला आज देशाच्या नागरिकांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. २०२२मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असेल तेव्हा देशाचा एक नागरिक, अंतराळात जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल’

१४) पूर्वी ईशान्य भारतातून वीज नाही, लोक रस्त्यावर अशा स्वरुपाच्या बातम्या यायच्या. पण आता काळ बदलला आहे. आता तिथे विकास कामे होत असून स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. तरुण स्वत:चे व्यवसाय सुरु करत आहेत.

१५) जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने नाव नोंदवले आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान.

१६) २०१३ च्या वेगाने काम केले असते गॅस सिलिंडर घराघरात पोहोचवण्यासाठी तसेच घराघरात शौचालये बांधण्यासाठी आणखी १०० वर्षे लागली असती. मोदींकडून भाजपा सरकार आणि काँग्रेस सरकारच्या कामाची तुलना.

१७) २०१४ मध्ये जनतेने देश घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया.

१८) संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन सामाजिक न्यायासाठी समर्पित होते. दलित, मागासवर्गीय, महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी संसदेने पावले उचलली.

१९) आज देशाकडे आत्मविश्वास आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करत देश यशाचे शिखर गाठत आहे. आजचा दिवस देशात एक नवीन उत्साह घेऊन आला आहे.

२०) देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मी नमन करतो.

२१) आदिवासी मुलांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *