महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी संधी – ऊर्जा मंत्री
नवी दिल्ली:- महाराष्ट्रात आजपर्यंत ८३४३ मेगावॅटची सौर ऊर्जा निर्माण केलेली आहे. भविष्यात महाराष्ट्र ६२ गिगा वॅट ऊर्जा निर्माण करू शकतो. महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी क्षमता असल्याचा विश्वास राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने जागतिक ऊर्जा परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद़्घाटन मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात झाले. या ऊर्जा परिषदेंतर्गत ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथे ऊर्जा प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
सौर ऊर्जा अधिक वापरात आल्यावर विजेचे दर कमी होतील. याचा लाभ उद्योजकांना तसेच खाजगी वापरकर्त्यांनाही होईल, असेही श्री. बावनकुळे म्हणाले. या जागतिक परिषदेत महाराष्ट्र भागीदार असल्याने याचा मोठा लाभ भविष्यात होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथे दोन-दोन मेगा वॅटचे पथदर्शी सौर प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंतर्गत उभारले आहे. याचे प्रदर्शनही या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती श्री.बावनकुळे यांनी दिली.
ग्रेटर नोएडा येथे असणाऱ्या रि-इन्वेस्ट परिषदेच्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासना ऊर्जा विभागाच्यावतीने ३ हजार चौरस वर्ग फुटाचे दालन उभारण्यात आले आहे. या दालनामध्ये महाराष्ट्राने अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली यशस्वी कामगिरी येथे मांडण्यात आली आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत स्थापित केलेली सौर ऊर्जा क्षमतेवर आधारित माहिती देणारा लघूपट, संगणकीकृत सादरीकरण येथे मांडण्यात आलेले आहे. यासोबत राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’, ‘मुख्यमंत्री सौर पेयजल योजने’मध्ये केलेली कामगिरीही या ठिकाणी दर्शविण्यात आलेली आहे.
३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेमध्ये ‘आंतराराष्ट्रीय सौर आघाडी’ ची पहिली बैठक, इंडियन ओशन रिम असोसिऐशनची (आयओआरए) नविनीकरण ऊर्जा मंत्रालयीन’ बैठक ‘जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद’ आणि प्रदर्शन (रिइन्वेस्ट-२०१८) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या जागतिक परिषदेत जगातील ५० पेक्षा अधिक राष्ट्र सहभागी झालेले आहेत.
सौर व अक्षय ऊर्जेच्या दुसऱ्या जागतिक ऊर्जा परिषदेचा उद्देश ऊर्जेची क्षमता वाढविण्यासाठी वैश्विक पातळीवर प्रयत्न करणे, वैश्विक गुंतवणूक समुहाला जोडणे हा आहे. आयोजित ३ दिवसीय रि-इन्वेस्ट परिषदेत क्लिनटेक, भविष्यात वापरात येणारे ऊर्जेची पर्यायी व्यवस्था, अक्षय ऊर्जा निर्माता, विकासक, गुंतवणुकदार, या क्षेत्रात अभिनव कल्पना मांडणारे व्यक्ती, या क्षेत्रात यशस्वी व्यक्तींना आमंत्रित करून चर्चा केली जाणार आहे. या रि-इन्वेस्ट परिषदेत ६०० पेक्षा अधिक दिग्गज उद्योजक आणि १०, हजार प्रतिनिधी सहभागी होतील.