मेळघाटातील राखी झाली ग्लोबल; ३७ देशांमध्ये पोहोचणार बांबूची राखी

नवी दिल्ली:- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून मेळघाटातील आदिवासी महिलांनी बांबूपासून बनविलेल्या पर्यावरणस्नेही राख्या सांस्कृतिक परिषदेच्या परदेशातील ३७ केंद्रांमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती आयसीसीआरचे अध्यक्ष तथा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी काल महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.

देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची ओळख जागतिक पातळीवर व्हावी या उद्देशाने विदेश मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आयसीसीआर संस्थेच्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्रातील आदिवासीबहुल मेळघाटातील महिलांची कला राखीच्या माध्यमातून परदेशात पोहोचत आहे. विविध देशांबरोबरील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने कार्यरत या परिषदेचे ३७ देशांमध्ये केंद्र आहेत. या केंद्रांद्वारे त्या-त्या देशातील विद्यार्थी व नागरिक भरतनाट्यम, लावणी, कुचिपुडी आदी भारतीय नृत्यप्रकार, भारतीय शास्त्रीय संगीत, संस्कृत, हिंदी आदी भारतीय भाषांचा अभ्यास करतात. या केंद्रांमध्ये भारतीय सणही साजरे केले जातात. येत्या रविवारी भारतात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मेळघाटातील आदिवासी महिलांद्वारा निर्मित राख्या आयसीसीआरच्या जगभरातील ३७ केंद्रांमध्ये पाठविण्यात येत असल्याचे डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

मेळघाटाने जगाला घातलेली प्रेमाची साद

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासीबहुल भागातील आदिवासी महिलांच्या कलेला व प्रतिभेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रथमच आसीसीआरच्या वतीने हा उपक्रम आखण्यात आला आहे. या राख्यांच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांची प्रतिभा व मेहनत परेदशातील बाजारात पोहोचेल, असा विश्वास डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. या राख्या म्हणजे मेळघाटाने जगाला घातलेली प्रेमाची साद असल्याचे ते म्हणाले.

मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्राच्या वतीने या भागातील आदिवासी महिलांना चरितार्थासाठी बांबूपासून विविध वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याच केंद्राअंतर्गत मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावातील वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेच्या महिलांनी बांबूपासून पर्यावरणस्नेही राख्या तयार केल्या आहेत. परदेशात पाठविण्यात येणाऱ्या या राख्या अतिशय सुबक, रेखीव व सुंदर आहेत. विविध आकाराच्या या राख्यांचे तेवढेच आकर्षक बॉक्स तयार करण्यात आले असून विमानाद्वारे हे आसीसीआरच्या परदेशातील सर्वच ३७ केंद्रामध्ये पाठविण्यात येत आहेत. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *