राज्यातील पोलीस गृहनिर्माण वसाहतींच्या कामांना गती
राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळाची मंत्रालयात बैठक संपन्न
मुंबई:- राज्यात पोलीस गृहनिर्माण वसाहतींच्या कामांना गती द्यावी. पोलीस महासंचालक, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यात अधिक लक्ष देऊन पोलिसांना घरे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले.
राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळाची मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. गृहराज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यावेळी उपस्थित होते.
राज्यात १ हजार ६९६ कोटी रुपयांचे पोलीस वसाहतीच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. ४३ प्रकल्पांमध्ये २१ प्रकल्प निवासी संकुलाचे असून १ हजार २८० कोटी रुपयांचे प्रकल्प निविदा स्तरावर आहेत.
अकोला, गोरेगाव, सातारा, जळगाव, मरोळ, मुलुंड, ठाणे, बीड, नांदेड, रायगड, मालेगाव, उस्मानाबाद या ठिकाणी ५ हजार ६११ वसाहतींचे काम निविदा स्तरावर आहे. या कामांना गती देऊन पोलिसांना घरे तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलीस वसाहतींचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरवून ती पूर्ण होतील यासाठी यंत्रणेने वेळापत्रक करावे. पोलिसांना मालकी हक्काचे घरे मिळावीत यासाठी म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये जमीन उपलब्ध करुन देण्याचे शासनाच्या विचाराधीन असून नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, पुणे या ठिकाणी असा प्रयत्न केला जाऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.