राज्यात लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ पशुसंवर्धनमंत्री जानकर यांची माहिती

नवी दिल्ली:- राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ग्रो वर्ल्ड – २०१८’ परिषदेत दिली.

येथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्पेलस मध्ये भारतीय कृषी व खाद्य परिषदेच्यावतीने व केंद्रीय कृषी मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागाच्या सहकार्याने तीन दिवसीय ‘ग्रो वर्ल्ड – २०१८’ परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. जानकर बोलत होते. केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. मिझोरमचे राज्यपाल कुम्मनम राजशेखरन आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. जानकर यांनी यावेळी गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकास मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय व त्याचा झालेला सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली. राज्यात पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेसाठी २ हजार कोटींचा खर्च येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील जनतेला ‘मागेल त्याला पशुधन’ या तत्वावर प्रत्येकी एक गाय, म्हैस, शेळी, मेंढी आदी पशुधन देण्यात येणार आहे. राज्यशासन बँकांच्या मदतीने कर्ज उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्जांची बँकेकडून छाननी करण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यास पशुधनासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम राज्य सरकार भरणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात कॅटल होस्टेल; पालघर व उस्मानाबाद येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवात
पशुसंवर्धन मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यात कॅटल होस्टेल सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले. प्रायोगिक तत्वावर पालघर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हे कॅटल होस्टेल उभारण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अशा होस्टेल मध्ये शेतकऱ्यांना आपले जनावर ठेवता येणार आहे. या जनावरांची देखभाल राज्य शासन करेल व त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्याना देण्यात येणार असल्याचे श्री.जानकर म्हणाले.

गेल्या चार वर्षात दूध उत्पादनात विक्रमी वाढ
राज्यात दुधाचे विक्रमी उत्पादन होत आहे सध्या दिवसाला १ कोटी ३० लाख लीटर दूध उत्पादन होत आहे. यापूर्वी राज्यात दिवसाला ५७ लाख लीटर दूध उत्पादन होत असे. मत्स्य उत्पादनातही ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कुक्कुट पालनातही राज्याने आघाडी घेतली आहे, असे श्री. जानकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *