वृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा- रिजनल जिरॅएट्रिक सेंटरची नागपूर येथे स्थापना होणार
मुंबई:- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिजनल जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास आणि त्याअनुषंगाने सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या केंद्रामुळे वृद्धांसाठी आरोग्यविषयक सर्वंकष सोयीसुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.
जीवनशैली तसेच आरोग्यमानात सुधारणा झाल्याने नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. परिणामी समाजात ज्येष्ठांची संख्या वाढती आहे. त्यांच्या आरोग्यविषयक विशेष काळजीसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रम (नॅशनल प्रोग्रॅम फॉर हेल्थ केअर ऑफ द एल्डरली-एनपीएचसीई) राबविण्यात येतो. त्या अंतर्गत नागपूरमध्ये स्थापन होणाऱ्या या विभागीय जिरॅएट्रिक सेंटरला केंद्राकडून ६० टक्के तर राज्याकडून ४० टक्के निधी देण्यात येईल. या केंद्रासाठीच्या पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव संबंधित उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेसाठी तीन वर्षात पाठविण्यात येणार आहे. राज्याच्या निधीसह पदनिर्मितीच्या तरतुदीसदेखील मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसेच याबाबत सामंजस्य करार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली.