वेदकाळापासून संस्कृत भाषेची अतिशय महत्वपूर्ण भूमिका! -पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन २६ ऑगस्ट २०१८ रोजी
`मन की बात’द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं
प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन
हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात. रक्षण करण्यासाठी वचन म्हणून बांधल्या जाणाऱ्या एका ‘रक्षा सूत्रा’ने दोन वेगवेगळ्या राज्यांतल्या किंवा धर्मातल्या लोकांना या विश्वासाच्या धाग्यानं बांधून ठेवण्याचं, जोडून ठेवण्याचं काम केलं होतं, याच्या अनेक कथा देशाच्या इतिहासात आपण वाचल्या आहेत. आता लवकरच जन्माष्टमीही साजरी करण्यात येणार आहे. सगळीकडे दुमदुमणाऱ्या ‘‘हाथी, घोडा, पालकी- जय कन्हैयालाल की, गोविंदा-गोविंदा’’ अशा जयघोषानं वातावरण भारलं जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या रंगामध्ये रंगून जाण्याचा आनंद काही आगळा-वेगळाच असतो. देशाच्या काही भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रातले आमचे युवक दही हंडीची तयारी करत असतील. सर्व देशबांधवांना रक्षाबंधन आणि जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
‘प्रधानमंत्री -महोदय! नमस्कारः. अहं चिन्मयी, बेंगलुरू -नगरे विजयभारती – विद्यालये दशम – कक्ष्यायां पठामि. महोदय अद्य संस्कृत- दिनमस्ति. संस्कृतं भाषां सरला इति सर्वे वदन्ति. संस्कृतं भाषा वयमत्र वहः वहः अत्रः सम्भाषणमअपि कुर्मः अतः संस्कृतस्य महत्वः- विषये भवतः गहः अभिप्रायः इति रुपयावदतु.’
भगिनी ! चिन्मयी!!
भवती संस्कृत- प्रश्नं पृष्टवती.
बहूत्तमम् ! बहूत्तमम्!!
अहं भवत्याः अभिनन्दनं करोमि.
संस्कृत -सप्ताह -निमित्तं देशवासिनां सर्वेषां कृते मम हार्दिक-शुभकामनाः
संस्कृत भाषेचा विषय उपस्थित केल्याबद्दल मी चिन्मयीचे खूप खूप आभार मानतो. बंधूंनो, रक्षाबंधनाबरोबरच
श्रावण पौर्णिमेचा दिवस संस्कृत दिन
म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत भाषेचा महान वारसा जतन आणि संवर्धन करीत, तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भाषेचं, स्वतंत्र असं वेगळं महात्म्य असतं. या विश्वातली सर्वात पुरातन भाषा तमिळ आहे, भारताला याचा अभिमान वाटतो. त्याचबरोबर वेदकाळापासून ते वर्तमानामध्ये संस्कृत भाषेनेही ज्ञानाच्या प्रचार- प्रसारामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे, याचाही आम्हां भारतीयांना अभिमान वाटतो.
संस्कृत भाषा आणि या भाषेतल्या साहित्यामध्ये जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राविषयी ज्ञानाचं जणू भांडार आहे. मग त्यामध्ये विज्ञान असेल किंवा तंत्रज्ञान, कृषी क्षेत्र असेल किंवा आरोग्य, खगोलशास्त्र असेल किंवा स्थापत्यशास्त्र म्हणजे वास्तूकला असेल. गणित असेल किंवा व्यवस्थापन, अर्थशास्त्राची माहिती असेल किंवा पर्यावरणाचा विषय असेल. इतकंच नाही तर आजची वैश्विक समस्या असलेल्या ‘तापमान वृद्धीचे आव्हान कसं झेलायचं, या विषयाचंही सविस्तर उत्तर देणाऱ्या मंत्रांचा उल्लेख संस्कृत भाषेमध्ये आहे, असंही सांगण्यात येतं. कर्नाटक राज्यातल्या शिवमोगा जिल्ह्यातल्या मट्टूर या गावातले रहिवासी बोलण्यासाठी आजही संस्कृत भाषेचा वापर करतात, हे जाणून आपल्या सर्वांना नक्कीच आनंद वाटेल.
संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या भाषेमध्ये नवनवीन असंख्य शब्दांची निर्मिती करता येते, हे जाणून आपल्याला आश्चर्यच वाटेल. दोन हजार धातु, दोनशे प्रत्यय म्हणजे ‘सफिक्स’, २२ उपसर्ग म्हणजे ‘प्रिफिक्स’ यांच्यामुळे समाजात वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दांची रचना या भाषेमध्ये करता येते. त्याचबरोबर अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टींचाही अचूक तपशील देत कोणत्याही विषयाची माहिती या भाषेमधून सांगता येते. आपल्या बोलण्याला एकप्रकारे वजन प्राप्त व्हावं म्हणून आपण इंग्लिशमधल्या अवतरणांचा वापर नेहमीच करत असतो. तर कधी शेर-शायरीचा उपयोग करतो. परंतु ज्या लोकांचा संस्कृतमधल्या सुभाषितांविषयी अभ्यास आहे, त्यांना चांगलं माहिती आहे की, कोणत्याही सुभाषितामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आशय स्पष्ट केला गेलेला असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांनी युक्त असे हे सुभाषित आपल्या या मातीशी नाळ जोडणारं असतं, आपल्या परंपरांना बांधून ठेवणारं असतं, त्यामुळं त्याचा आशय, त्यातून मिळणारा संदेश समजणं खूप सोपं जातं.
जीवनामध्ये गुरूचं नेमकं किती महत्व आहे, हे स्पष्ट करणाऱ्या सुभाषितामध्ये म्हटलं आहे की-
एकमपि अक्षरमस्तु, गुरूः शिष्यं प्रबोधयेत्
पृथिव्यां नास्ति तद्-द्रव्यं, यद्-दत्त्वा ह्यनृणी भवेतकृ
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, गुरूंनी आपल्या शिष्याला एका अक्षराचं जरी ज्ञान दिलं, तर आपल्या या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या शिष्याला संपूर्ण पृथ्वीवर एखादी वस्तू किंवा धन मिळणार नाही.
आपण सर्वांनी याच भावनेनं आगामी शिक्षक दिन साजरा केला पाहिजे.
ज्ञान आणि गुरू अतुल्य आहे, अमूल्य आहे, अनमोल आहे.
आपल्या आईबरोबरच शिक्षकही आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मुलांच्या विचारांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी ते पेलत असतात आणि त्याचा प्रभाव मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असल्याचे दिसून येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून महान विचारवंत आणि देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांचं स्मरण केलं जातं. त्यांच्या जयंतीदिनीच संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिवस साजरा केला जातो. आगामी शिक्षक दिवसानिमित्त देशातल्या सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर विज्ञान, शिक्षण आणि विद्यार्थी यांच्याविषयी त्यांच्याठायी असलेल्या समर्पणाच्या भावनेबद्दल मी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अपार कष्ट, परिश्रम करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी मौसमी पाऊस हा नवीन आशा आकांक्षा घेऊन येत असतो. भीषण कडक उन्हाळ्यामुळे वाळून, सुकून गेलेल्या झाडा-झुडुपांना, आटलेल्या जलाशयांना हा पाऊस वरदान ठरतो. परंतु काहीवेळेस ही अतिवृष्टी विनाशकारी, प्रलयंकारी महापूर घेऊन येते. देशात काही ठिकाणी इतर स्थानांच्या तुलनेमध्ये अति पाऊस झाला आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट पाहिली आहे. महापुरामुळे केरळमधलं संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालं आहे. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देश केरळच्या मदतीसाठी धाऊन गेला आहे. या पुरामध्ये केरळमधल्या ज्या परिवारांना आपल्या घरातला सदस्य गमवावा लागला, त्या कुटुंबियांबद्दल आपल्याला सहानुभूती आहे. एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं होणारं नुकसान कोणत्याही गोष्टींनी भरून काढता येत नाही. तरीही शोकाकूल परिवारांना मी विश्वास देऊ इच्छितो की, सव्वाशे कोटी भारतीय दुःखाच्या या काळात तुमच्याबरोबर आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लाऊन या संकटसमयी तुम्हाला मदत करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जे लोक जखमी झाले आहेत, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थना मी करतो. राज्यातल्या लोकांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अदम्य साहस यांच्या जोरावर केरळ लवकरच या संकटातून सावरेल आणि नव्या जोमाने उभा राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आपत्ती आपल्यामागे ज्या प्रकारे दुःखद स्मृती ठेवून जाते, ते एकप्रकारे दुर्भाग्यच आहे, असं म्हणावं लागेल. परंतु अशा संकटाच्या काळातही मानवतेचे दर्शन आपल्याला होत असते. कच्छपासून ते कामरूपपर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकजण आपआपल्या पातळीवर जी काही शक्य असेल ती मदत आपद्ग्रस्तांना करतोय. मग अशी आपत्ती केरळमधे असोत किंवा हिंदुस्तानमधल्या इतर कोणत्याही जिल्ह्यात, भागात असो. जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी सगळेजण हातभार लावत आहेत. सर्व वयोगटातले आणि सगळ्या क्षेत्रातले लोक आपआपल्या परीनं पूरग्रस्तांसाठी योगदान देत आहेत. केरळमधल्या लोकांवर जे संकट कोसळलं आहे, त्याची तीव्रता कशी कमी करता येईल, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. केरळमध्ये सुरू असलेल्या बचाव मोहिमेचे नायक सशस्त्र दलाचे जवान आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पुरामध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर न ठेवता अथक प्रयत्न केले. हवाई दल असो, नौदल असो, त्याचबरोबर स्थलसेनेचे जवान असो, सीमा सुरक्षा दल, सीआयएसएफ, आरएएफ, सैन्याच्या या प्रत्येक विभागांनी बचाव आणि मदतीच्या कार्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एनडीआरएफ म्हणजेच
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पराक्रमी जवानांनी केलेल्या परिश्रमाचा
इथं विशेष उल्लेख करू इच्छितो. संकटाच्या या घडीला त्यांनी अतिशय उत्तम कार्य केलं. ‘एनडीआरएफ’ची क्षमता, त्यांची समर्पणाची भावना, इतक्या कठीण प्रसंगामध्ये त्वरित, निर्णय घेऊन अतिशय तडफेने परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहिल्यानंतर प्रत्येक हिंदुस्तानीच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळी श्रद्धा निर्माण झाली आहे. कालच ओणमचा सण होता. ओणमच्या या पवित्र काळामध्ये देशाला विशेषतः केरळला या संकटातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याची शक्ती मिळावी आणि केरळच्या विकासयात्रेला चांगली गती मिळावी, अशी आपण प्रार्थना करूया. सर्व देशवासियांच्या वतीने मी पुन्हा एकदा केरळच्या लोकांना आणि देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे अतिवृष्टीचे संकट आले आहे, त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की, संपूर्ण देश अशा संकटसमयी आपल्याबरोबर आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी
‘मन की बात’
साठी सूचवलेले विषय कोणते आहेत, हे मी पाहत होतो. त्यावेळी लक्षात आलं, देशभरातल्या लोकांनी सर्वात जास्त जो विषय कळवला आहे तो म्हणजे ‘आपल्या सर्वांचे लाडके श्रीमान अटल बिहारी वाजपेयी’ यांचा विषय. गाझियाबादहून कीर्ती, सोनीपत इथून स्वाती वत्स, केरळमधून भाई प्रवीण, पश्चिम बंगालचे डॉक्टर स्वप्न बॅनर्जी, बिहारमधल्या कटिहारचे अखिलेश पांडे, अशा असंख्य लोकांनी ‘‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’’ आणि ‘‘मायगव्ह’’वर लिहून अटल जी यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवावेत असा आग्रह मला केला आहे. १६ ऑगस्ट रोजी अटलजींच्या निधनाची बातमी आली. या वृत्ताने संपूर्ण देश शोकसागरामध्ये बुडाला. १४ वर्षांपूर्वी पंतप्रधान पदावरून पायउतार झालेला हा महान नेता होता. गेल्या दहा वर्षांपासून तर सक्रिय राजकारणापासून ते खूपच दूर गेले होते. सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित रहात नव्हते, त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांमध्ये, बातम्यांमध्येही दिसत नव्हते. विस्मरणात जाण्यासाठी १० वर्षांचं अंतर खूप मोठं असतं. परंतु १६ ऑगस्टनंतर देशानं आणि जगाने पाहिलं की, हिंदुस्तानमधल्या सामान्य माणसाच्या मनात या दहा वर्षांच्या कालखंडानंतरही अटलजींबद्दल अपार स्नेह कायम होता. त्यामध्ये एका क्षणाचंही अंतर राहिलेलं नव्हतं. संपूर्ण देशभरातून अटलजींबद्दल ज्या प्रकारे स्नेह, श्रद्धा आणि शोक भावना व्यक्त होत होती, त्यावरून त्यांच्या विशाल व्यक्तित्वाचे दर्शन झाले. गेल्या काही दिवसांमध्ये अटलजींमध्ये असलेले उत्तमोत्तम पैलू देशासमोर आले आहेतच. लोकांनी उत्तम संसदपटू, संवेदनशील लेखक, श्रेष्ठ वक्ते, लोकप्रिय पंतप्रधान अशा स्वरूपात त्यांचं स्मरण केलं आणि अजूनही करत आहेत.
सुशासन म्हणजेच ‘गुड गर्वनन्स’ला मुख्यधारेमध्ये आणण्यासाठी हा देश अटलजींचा सदैव आभारी राहील.
मी आज याठिकाणी अटलजींच्या महान व्यक्तित्वामधल्या एका वेगळ्याच पैलूला स्पर्श करू इच्छितो. अटलजींनी भारताला ज्या प्रकारे राजकीय संस्कृती दिली, राजकीय संस्कृतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, या संस्कृतीला एका व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे भारताला खूप मोठा लाभ झाला आहे. आगामी कालखंडामध्ये आणखीही त्याचा असाच फायदा देशाला होणार, हे निश्चित आहे. ‘’९१ व्या सुधारणा अधिनियम २००३’’ यासाठी भारत नेहमीच अटलजींविषयी कृतज्ञ राहील. या बदलामुळे भारताच्या राजकारणामध्ये दोन महत्वपूर्ण परिवर्तन घडून आले.
यापैकी पहिली गोष्ट म्हणजे, राज्यांच्या मंत्रिमंडळाचा आकार एकूण विधानसभा जागांच्या 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला.
दुसरी गोष्ट म्हणजे, पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत निश्चित करण्यात आलेली मर्यादा एक-तृतियांश होती, ती वाढवून दोन-तृतियांश करण्यात आली. याच्या जोडीलाच पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी स्पष्ट दिशा-निर्देशही निश्चित करण्यात आले.
अनेक वर्षांपर्यंत भारतामध्ये भरभक्कम मंत्रिमंडळ तयार करण्याची राजकीय संस्कृती होती. त्यानुसार भारंभार मंत्र्यांची संख्या असलेल्या जम्बो मंत्रिमंडळामध्ये कामाच्या विभागणीसाठी नाही तर केवळ राजकारण्यांना खुश करण्यासाठी मंत्री बनवले जात होते. अटलजींनी ही परिस्थिती बदलून टाकली. त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे देशाचा पैसा आणि साधन सामग्रीची बचत झाली. त्याचबरोबर कार्यक्षमताही वाढली. केवळ अटलजींच्या दूरदृष्टीमुळेच त्यावेळी राजकीय स्थितीमध्ये बदल होऊ शकला. आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये चांगली परंपरा निर्माण झाली.
अटलजी एक निष्ठावान देशभक्त
होते. त्यांच्या कार्यकाळातच देशाचा अर्थसंकल्प सभागृहामध्ये मांडण्याची वेळ बदलण्यात आली. त्यापूर्वी इंग्रजांच्या परंपरेनुसार संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जात होता. लंडनमध्ये संसदेच्या कामकाजाचा प्रारंभ होण्याची ती वेळ होती, म्हणून संध्याकाळी अंदाजपत्रक मांडले जात होते. सन २००१ मध्ये अटलजींनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी अकराची केली. अटलजींच्या काळातच आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट घडली. ‘भारतीय ध्वज संहिता’ त्यांच्या काळात बनवण्यात आली आणि २००२ मध्ये या संहितेची अंमलबजावणी झाली. या संहितेमधील काही नियमांमुळे सार्वजनिक स्थळी तिरंगा फडकवणे शक्य झाले. त्यामुळे अधिकाधिक भारतीयांना आपला राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी मिळू लागली. आपल्या प्राणप्रिय तिरंग्याला जनसामान्यांच्या जवळ आणण्याचं महान कार्य अटलजींनी केलं आहे. देशातली निवडणूक प्रक्रिया असेल आणि लोकप्रतिनिधींशी संबंधित काही अयोग्य गोष्टी असतील त्यांच्यामध्ये पायाभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी धाडसी पावलं उचलण्याचं कार्य अटलजींनी कशा पद्धतीनं केलं, हे आपल्या आता लक्षात आलं असेल. अशाच प्रकारे देशामध्ये केंद्र आणि राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी करण्याविषयी खूप मोठ्या प्रमाणावर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबतीत कोणी बाजूनं तर कोणी विरोधक म्हणून, लोकं आपआपली मतं मांडत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीनं तर हा एक शुभसंकेत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी, उत्तम लोकशाहीसाठी चांगली परंपरा विकसित करून, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. अशाप्रकारच्या चर्चा मोकळ्या मनानं केल्या गेल्या पाहिजेत, ही एक प्रकारे अटलजींना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. त्यांनी पाहिलेलं समृद्ध आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या संकल्पाचा पुनरूच्चार करून मी आपल्या सर्वांच्या वतीनं अटलजींना श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल संसदेच्या कामकाजाविषयी ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी बरेचदा व्यत्यय, गोंधळ आणि कामकाज स्थगिती, यांचीच चर्चा होते. परंतु जर काही चांगलं काम झालं असेल तर मात्र त्याची फारशी चर्चा होत नाही. काही दिवसांपूर्वीच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं. या सत्रामध्ये लोकसभेची उत्पादकता ११८ टक्के आणि राज्यसभेची ७४ टक्के होती, ही माहिती जाणून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. पक्षहित बाजूला सारून संसदेच्या सर्व सदस्यांनी हे पावसाळी अधिवेशन अधिकाधिक उपयुक्त बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणजे लोकसभेमध्ये २१ विधेयकं आणि राज्यसभेमध्ये १४ विधेयकं मंजूर करण्यात आली. संसदेचं हे पावसाळी अधिवेशन सामाजिक न्याय आणि युवकांच्या कल्याणाचे सत्र म्हणून कायमचे स्मरणात राहणार आहे. या अधिवेशनामध्ये युवक आणि मागास समुदायांना लाभ देऊ शकणाऱ्या अनेक महत्वपूर्ण विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की, अनेक दशकांपासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाप्रमाणे इतर मागासवर्गीय जाती आयोग बनवण्याची मागणी केली जात होती. मागासवर्गीयांचे अधिकार निश्चित करण्यासाठी देशाने यावेळी ‘ओबीसी आयोग’ बनवण्याचा संकल्प पूर्ण केला आणि त्याला घटनात्मक दर्जा, अधिकारही देण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाचा उद्देश अधिक सफल होण्यासाठी हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे अधिकार सुरक्षित राहण्यासाठी एक दुरूस्ती विधेयक मंजूर करण्याचं कामही याच अधिवेशनामध्ये झालं. हा कायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील समुदायांच्या हितांना अधिक सुरक्षित ठेवणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांना अत्याचार करण्यापासून रोखू शकणार आहे. यामुळे दलित समुदायांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकणार आहे.
देशातल्या महिलाशक्तीच्या विरोधामध्ये कोणत्याही सभ्य समाजामध्ये कसल्याही प्रकारे अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. महिलांवरील अत्याचारामध्ये सहभागी असलेल्या दोषींना देश कदापि सहन करणार नाही. म्हणूनच संसदेमध्ये या अपराधाबाबतच्या कायदा दुरूस्ती विधेयकाला मान्यता व देऊन,
महिलांवरील अत्याचारामध्ये सहभागी असलेल्या अपराधींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद
आता करण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींना कमीत कमी १० वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये आलेली बातमी आपण वाचली असेल. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये एका न्यायालयात आलेला अज्ञान बालिकेवरच्या अत्याचाराचा खटला केवळ दोन महिने चालवून त्यासाठी अपराधी ठरलेल्या दोघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआधी मध्य प्रदेशातल्या कटनी इथं एका न्यायालयाने फक्त पाच दिवस सुनावणी करून दोषींना फाशीची शिक्षा दिली. राजस्थानमध्येही तिथल्या न्यायालयात अशाच पद्धतीने महिलांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांवर तातडीने निर्णय दिले आहेत. हा कायदा महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे रोखण्यासाठी प्रभावी भूमिका पार पाडणार आहे. सामाजिक परिवर्तनाशिवाय आर्थिक प्रगती अपूर्ण आहे. लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विषयीचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मात्र या अधिवेशनामध्ये राज्यसभेमध्ये या विधेयकाला मान्यता मिळू शकली नाही. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्याबरोबरीने उभा आहे, असा मी विश्वास देऊ इच्छितो. ज्यावेळी आम्ही देशहिताचा विचार करू, त्याचवेळी गरीब, मागास, शोषित आणि वंचित यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणता येणार आहे. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व सदस्यांनी मिळून एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे. यासाठी देशातल्या सर्व खासदारांचे सार्वजनिक पातळीवर, आज मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या कोट्यवधी भारतीयांचे लक्ष जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागलं आहे. दररोज सकाळी वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाणीच्या बातमीपत्रांकडे, समाज माध्यमांवरून लोक एक नजर टाकत असतात. कोणा भारतीय खेळाडूने पदक जिंकले, हे जाणून घेत असतात. आशियाई क्रीडा सामने, आत्ताही सुरूच आहेत. देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छितो. ज्या खेळाडूंच्या स्पर्धा अजून होणार आहेत, त्या
सर्व क्रीडापटूंना माझ्या खूप-खूप शुभेच्छा.
नेमबाजी आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू खूप चांगली कामगिरी करीत आहेत. विशेष म्हणजे, ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताची कामगिरी आधी फारशी चांगली नव्हती, त्यामध्येही भारतीय खेळाडूंनी पदकाची कमाई केली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. वुशू आणि रोईंग यासारख्या क्रीडाप्रकारांमध्ये भारतीयांनी दाखवलेलं कौशल्य फक्त पदक मिळवण्यापुरते नाही तर मोठ्या धाडसाने गगनाला गवसणी घालणाऱ्या भारतीय क्रीडापटूंची स्वप्ने नवीन प्रमाण सिद्ध करणारी ठरली आहेत. देशासाठी पदक जिंकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये आमच्या कन्याही सहभागी आहेत, यातून खूप सकारात्मक संकेत मिळतोय. इतकंच नाही तर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये १५-१६ आमचे नवयुवक आहेत, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंपैकी बहुतांश लहान शहरे, छोट्या गावांमधले रहिवासी आहेत. या युवा खेळाडूंनी अतिशय कठोर परिश्रम करून हे यश संपादन केलं आहे.
येत्या २९स्ट रोजी आपण ‘‘राष्ट्रीय क्रीडा दिन’’ साजरा करणार आहोत. यानिमित्त मी सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हॉकीचे जादूगार, महान खेळाडू श्री. ध्यानचंद जी यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
देशातल्या सर्व नागरिकांना माझं एक निवेदन आहे की, त्यांनी जरूर कोणतातरी खेळ खेळावा. आपल्या तंदुरूस्तीकडे लक्ष द्यावं. कारण तंदुरूस्त,
आरोग्य संपन्न देशच संपन्न आणि समृद्ध भारत निर्माण करू शकणार
आहे. ज्यावेळी ‘इंडिया फिट’ असेल त्याचवेळी भारताचे उज्ज्वल भविष्य निर्माण होणार आहे. पुन्हा एकदा मी अशियाई क्रीडा स्पर्धेमधल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या स्पर्धा अजून व्हायच्या आहेत, ते आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करतील अशी कामना करून त्यांना खूप-खूप शुभेच्छा देतो.
मी कानपूर इथून अभियांत्रिकीची विद्यार्थिनी भावना त्रिपाठी बोलतेय. प्रधानमंत्रीजी मागच्या ‘मन की बात’मध्ये आपण महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला होता. आणि त्याआधी आपण डॉक्टर, चार्टर्ड अकौंटटस् यांच्याशी संवाद साधला होता. माझी आपल्याला एक विनंती आहे की,
१५ सप्टेंबर या तारखेला ‘इंजिनीअर्स डे’ साजरा
केला जातो. म्हणून आगामी ‘इंजिनीअर्स डे’चं औचित्य साधून आपण माझ्यासारख्या अभियांत्रिकी शाखेच्या असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी काही बोलावे. यामुळे आमचं मनोधैर्य उंचावेल आणि आम्हाला खूप आनंद होईल. त्याचबरोबर नजिकच्या भविष्यामध्ये आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचं प्रोत्साहनही आम्हाला मिळू शकेल. धन्यवाद’’!
नमस्ते भावनाजी, मी आपल्या भावनांचा आदर करतो. आपण सगळ्यांनीच दगडा-विटांचे बांधकाम करून घरे आणि इमारती उभ्या राहतात हे पाहिले आहे. परंतु जवळपास बाराशे वर्षांपूर्वी महाकाय डोंगरासारख्या फक्त एका दगडाला अतिशय उत्कृष्ट, विशाल आणि अद्भूत मंदिराचं स्वरूप दिलं गेलं होतं. खरंतर याविषयी कल्पनाही करणं खूप अवघड आहे. परंतु हे प्रत्यक्षात घडलं होतं. आणि हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेरूळ इथलं कैलासनाथाचं मंदिर आहे. जर कोणी तुम्हाला सांगेल की, जवळपास एक हजार वर्षांपूर्वी ग्रॅनाईटचा ६० मीटर लांब एक मोठा स्तंभ बनवला गेला आणि त्याच्या शिखरावर ग्रॅनाईटचा जवळपास ८० टन वजनाचा एक महाकाय शिलाखंड ठेवण्यात आला होता. या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवणार का? परंतु तामिळनाडूमधल्या तंजाऊर इथं बृहदेश्वर मंदिर नावाचे एक स्थान आहे. तिथं आपल्याला स्थापत्य कला आणि अभियांत्रिकी यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. गुजरातमध्ये पाटण इथं अकराव्या शतकामध्ये निर्माण केलेली ‘‘ रानी की बाव’’ आहे, ती पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत होतो. भारताची भूमी म्हणजे अभियांत्रिकीची जणू प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. भारतातल्या अनेक अभियंत्यांनी केवळ कल्पनेमध्ये शक्य आहे, असं वाटावं, अशा गोष्टी प्रत्यक्षात आणल्या. अभियांत्रिकी दुनियेतील चमत्कार म्हणता येतील, अशी उदाहरणे त्यांनी प्रस्तुत केली. महान अभियंत्यांचा वारसा सांगणाऱ्या आमच्या परंपरेमधले असेच एक रत्न आपल्याला मिळाले आहे. ज्यांचे कार्य पाहिले की आजही लोक अचंबित होतात. हे रत्न म्हणजे
भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरैया.
कावेरी नदीवर त्यांनी बांधलेल्या कृष्णराज सागर धरणाचा आजही लाखो शेतकरी बांधवांना आणि जनसामान्यांना लाभ मिळत आहे. ज्यांना या धरणाचा लाभ मिळतो, त्या भागात त्यांच्याबद्दल आदराची, पूजनीय भावना आहेच, परंतु उर्वरित संपूर्ण देशही त्यांच्या कार्याबद्दल सन्मानाने, आत्मीयतेने डॉ. विश्वेश्वरैया यांचे स्मरण करतो. त्यांच्या स्मरणार्थ दि. १५ सप्टेंबरला ‘‘इंजिनीअर्स डे’’ साजरा केला जातो. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आपल्या देशाच्या अभियंत्यांनी संपूर्ण विश्वामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अभियांत्रिकी जगतामधील चमत्कारांची चर्चा ज्यावेळी मी करतो, त्यावेळी २००१ मध्ये गुजरातच्या कच्छ भागात आलेल्या प्रलंयकारी भूकंपाच्या वेळी घडलेल्या एका घटनेचं मला स्मरण होतं. त्यावेळी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये कार्यरत होतो. एका गावामध्ये जाण्याची संधी मला त्यावेळी मिळाली.त्या गावामध्ये मला एक अतिशय वयोवृद्ध माताजी भेटल्या. त्यांचं वय १०० पेक्षा जास्त होतं. त्या आजीबाईंशी मी बोलत होतो. माताजी माझ्याकडं पाहून अगदी उपहासानं सांगत होत्या,‘‘ हे माझं घर पहा. कच्छमध्ये त्याला ‘भूंगा’ असं म्हणतात. माझ्या या घरानं ३-३ भूकंप पाहिले, अनुभवले आहेत. मी स्वतःच तीन भूकंप याच घरामध्ये अनुभवले आहेत. परंतु आत जाऊन पहा, तुम्हाला कुठंही, कसलंही नुकसान झालेलं दिसणार नाही. हे घर आमच्या पूर्वजांनी इथल्या निसर्गाला,भौगोलिक रचनेला अनुसरून, त्याचबरोबर इथल्या वातावरणाला अनुरूप बांधलं आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट त्या माताजी अतिशय अभिमानानं सांगत होत्या. ते घर पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार आला की, अनेक युगांच्या आधीही त्या कालखंडामधल्या अभियंत्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्याला अनुरूप कशा प्रकारे गृहरचना केली होती, ज्यायोगे जनसामान्य सुरक्षित राहू शकतील, याचा अभ्यास केला होता, तसे आपणही केले पाहिजे. आता ज्यावेळी आपण ‘इंजिनीअर्स डे’ साजरा करतो, त्यावेळी आपण भविष्याचाही विचार निश्चितच केला पाहिजे. ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. बदलत्या काळामध्ये आपला काय-काय नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी लोकांना शिकवल्या पाहिजेत? कसे जोडले पाहिजे? आजकाल आपत्ती व्यवस्थापन हे खूप मोठे कार्य झाले आहे. नैसर्गिक संकटांचा संपूर्ण विश्वाला सामना करावा लागतो आहे. अशावेळी संरचनात्मक अभियांत्रिकीचे नवे स्वरूप नेमके कसे असू शकते? त्याचे वेगवेगळे अभ्यासक्रम कसे असतील? विद्यार्थी वर्गाला यामध्ये नेमकं काय शिकवलं गेलं पाहिजे? पर्यावरणस्नेही बांधकाम कशा पद्धतीने करता येईल? शून्य कचरा, कचऱ्याची निर्मितीच होणार नाही, याला प्राधान्य देऊन, आपण काय करू शकतो? अशा अनेक गोष्टींचा विचार ज्यावेळी ‘ इंजिनीअर्स डे’ साजरा केला जातो,त्यावेळी केला पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सण -समारंभांचे वातावरण आहे. त्याबरोबरच आता दिवाळीचीही तयारी सुरू होणार आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण भेटत राहणार आणि मन की बात करत राहणार. त्याचबरोबर अगदी मनापासून आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत. या भावनेबरोबरच आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा! धन्यवाद!! पुन्हा भेटू!