आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात संधी
मुंबई:- आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. या उद्योग संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दुबईत शनिवारी केले.
गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमच्या वतीने दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स महाबिझ २०१८ चे उद्घाटन मंत्री श्री. रावल आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. रावल बोलत होते. आखाती आणि आफ्रिकन देशातील सुमारे ५०० उद्योजक, महाराष्ट्रातील उद्योजक या परिषदेला उपस्थित होते.
आफ्रिकन देश, आखाती देश आणि महाराष्ट्र राज्य यांच्यात पर्यटन, आरोग्य, शिक्षण, सेवा, माध्यम, माहिती तंत्रज्ञान, रियल इस्टेट, व्यापार आदी १० उद्योग क्षेत्रात कशा रोजगार, उद्योग संधी आहेत, भांडवलवृद्धी आणि कर्ज उभारणीची प्रक्रिया काय आहेत यावर या परिषदेत चर्चा, परिसंवाद झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, तज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील यशाची माहिती दिली. महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आली आहे. देशात एकूण झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा निम्मा आहे हे विशेष. ‘मेक इन महाराष्ट्र’सारख्या उपक्रमातून राज्यात विदेशी गुंतवणुकीला चालना दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. रावल म्हणाले की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यामुळे वर्ल्ड टुरिझम डेचे यजमानपद भारताला मिळाले. वर्ल्ड बँकेच्या टॉप १०० देशात भारताचा समावेश झालाय. महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या अरेबियन ट्रॅव्हल मार्टमध्ये इंडो अरब चेम्बर ऑफ कॉमर्सशी मेडिकल आणि वेलनेस टुरिझम हबसंदर्भात सामंजस्य करार केला आहे. पर्यटकांना वेगळे काही हवे असते. महाराष्ट्रातील द बोहरी किचनच्या मुनाफ कपाडीया यांसारख्या युवकांनी होम डायनिंग संकल्पना राबवत अल्पावधीत जगातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील कोकणी, सावजी, खान्देशी, वऱ्हाडी, मालवणी, कोल्हापुरी अशा बहुविध खाद्य संस्कृती होम डायनिंग संकल्पनेअंतर्गत जगातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
पर्यटन उद्योग वाढले तर रोजगार निर्मिती होते. महाराष्ट्रातील प्रगतीच्या संधी सर्वांना उपलब्ध होतील. त्यामुळे आखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन श्री. रावल यांनी यावेळी केले.
दरम्यान, सौदी अरब सरकारने भारतातील हज यात्रेकरूंचा कोटा ५ हजारने वाढवला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या हज उमराह इंटरनॅशनल फोरमच्या ट्रॅव्हल मार्ट कार्यक्रमात ४० आंतरराष्ट्रीय हज टूर ऑपरेटर सहभागी झाले होते. त्यावेळी मंत्री श्री. रावल यांनी भारतात मुस्लिम लोकसंख्या मोठी असल्याने भारताचा हज यात्रेकरू कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. सौदी अरब सरकारने नुकतीच ही मागणी मान्य केल्याने मंत्री श्री. रावल यांनी समाधान व्यक्त केले. मागील दोन वर्षात दुसऱ्यांदा भारताला हज यात्रेकरू यांचा कोटा वाढवून देण्यात आला आहे.