आनंदवनातील कुष्ठ रुग्णांच्यावतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश
नागपूर:- डॉ. विकास आमटे यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी सामाजिक कर्तव्य म्हणून राज्यातील विविध स्वंयसेवी, सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला आनंदवनातील कुष्ठरोग्यांनी प्रतिसाद देत ही मदत केली. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून देशातील विविध भागामध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीला आनंदवनातील महारोगी सेवा समिती मार्फत कुष्ठरोगी नेहमीच मदत करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज डॉ.विकास आमटे आणि डॉ.शितल आमटे यांनी कुष्ठ रुग्णांच्यावतीने त्यांचा एक दिवसाचा पगार केरळ पूरग्रस्तांसाठी दिला आहे. यापूर्वी कुष्ठरोग्यांनी बनविलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या नॅपकीन, रजई, टॉवेल, धोतर, यासह विविध जीवनावश्यक वस्तूही केरळला पाठविल्या असल्याचे डॉ.शितल आमटे यांनी सांगितले.