उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड
नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या ‘उन्नत भारत’ अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘उन्नत भारत अभियानासाठी’ देशभरातील ८४० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यातील ७५ तांत्रिक व ८५ अतांत्रिक अशा एकूण १६० उच्च शैक्षणिक संस्थांचा यात समावेश आहे. देशभरातून निवड झालेल्या एकूण ८४० शैक्षणिक संस्थांपैकी ५२१ तांत्रिक तर ३१९ अतांत्रिक आहेत.
यापूर्वी उन्नत भारत अभियान कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात देशातील ६८८ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली होती. या वर्षी साजऱ्या होत असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये या संस्था सहभागी होत आहेत.
उन्नत भारत अभियानांतर्गत पुढील कार्यक्रम राबविण्यात येणार
उन्नत भारत कार्यक्रमांतर्गत फील्ड व्हिझीट , घरोघरी जाऊन सर्वेक्षण, ग्रामीण जनतेच्या समस्या व गरजांची माहिती घेणे आणि त्यांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी विविध तंत्र व कार्यपद्धती विकसित करणे आदींचा समावेश आहे.
राज्यात सर्वात जास्त ३३ संस्था पुणे जिल्ह्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील ५३ शैक्षणिक संस्था
पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त ३३ संस्थांची निवड या कार्यक्रमासाठी झाली आहे. यातील २३ तांत्रिक तर १० अतांत्रिक संस्था आहे. पुणेसह पश्चिम महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्यातील ३१ तांत्रिक आणि २२ अतांत्रिक अशा एकूण ५३ संस्थाची निवड करण्यात आली आहे.
विदर्भातील ३३ शैक्षणिक संस्थांची निवड
या अभियानांतर्गत विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यातील १७ तांत्रिक आणि १५ अतांत्रिक अशा एकूण ३३ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील २९ संस्था
मराठवाड्यातील अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांतील ७ तांत्रिक व २२ अतांत्रिक अशा एकूण २९ संस्थांची निवड झाली आहे.
खान्देशातील २४ संस्थांची निवड
जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांतून १३ तांत्रिक व ११ अतांत्रिक अशा एकूण २४ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे.
कोकणातील रायगड व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील ३ तांत्रिक व ५ अतांत्रिक अशा एकूण ८ संस्थाची तर मुंबईतील २ तांत्रिक व २ अतांत्रिक अशा एकूण ४, मुंबई उपनगरातील ३ अतांत्रिक तर ठाणे जिल्ह्यातील ४ तांत्रिक व २ अतांत्रिक अशा एकूण ६ शैक्षणिक संस्थाची निवड उन्नत भारत अभियानासाठी करण्यात आली आहे.