केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू आणि प्रचंड हानी

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. आतापर्यंत येथे जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत २१ हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून पावसामुळे मदत कार्यात असंख्य अडचणी येत आहेत. शनिवारी पावसामुळे अजून ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिली. एकूण मरण पावलेल्यांचा आकडा ३५० च्या वर पोहोचला आहे. आजही हजारो लोक पुरात अडकल्याने त्यांना वाचवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफने सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं असून केरळमध्ये एनडीआरएफच्या १६९ टीम काम करत आहेत. २२ हेलिकॉप्टर, नेव्हीच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या शिवाय स्थानिक तरुण, पोलीस आणि मच्छिमारांचीही मदत मिळत आहे.

भीषण महापुरामध्ये अडकलेल्या केरळमध्ये पुन्हा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधल्या १४ पैकी ११ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अन्न-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी मदत छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *