दहीकाल्याची हंडी तुम्ही फोडा, अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार-मुख्यमंत्री

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने ठाणे, भिवंडीत गोविंदा पथकांमध्ये उत्साह

ठाणे:- दहीहंडीचा उत्सव सर्वत्र लोकप्रिय करणाऱ्या ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ठाण्यात आल्यामुळे येथील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील स्वामी प्रतिष्ठानच्या भव्य दहीहंडीस त्यांनी भेट दिली व समोरील चैतन्याने सळसळणारी तरुणाई पाहून त्यांनी सुद्धा व्यासपीठावर पुढे येऊन उत्साहाने “भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ अशा घोषणा दिल्या.

आपल्या छोट्याशा संदेशात ते म्हणाले की, प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही दहीकाल्याची ही हंडी फोडा, आम्ही अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी फोडू. थरांवर थर लावणाऱ्या पथकांचे देखील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर जय जवानच्या पथकाने नऊ थर लावून मुख्यमंत्र्यांना सलामी दिली, तेव्हा वातावरणात जोश पसरला.

यावेळी स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच त्यांच्या प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदिवासी मुलींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पिंगळे यांचाही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसनीय कामगिरीबद्दल शाल देऊन सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपये आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दोन लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले.

याप्रसंगी खासदार कपील पाटील, आमदार सर्वश्री संजय केळकर, गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, शायना एन.सी., जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे भिवंडीतील शिवाजी चौकमधील कपील पाटील फाऊंडेशनच्या दहीहंडी उत्सवातही सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *