पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचे संयुक्तरित्या कार्यक्रम होणार
गुजरातच्या पर्यटन सचिवांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट
दोन्ही राज्यातील पर्यटन विकासाबाबत चर्चा
मुंबई : गुजरातच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी आज मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेऊन दोन्ही राज्यातील पर्यटन विकासासंदर्भात चर्चा केली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी प्रधान सचिव श्री. हैदर यांनी ‘गुजरात ५० गोल्डन डेस्टिनेशन’ हे पुस्तक पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना भेट दिले.
श्री.रावल यांच्या मंत्रालयीन दालनात आज ही बैठक झाली. यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कच्छच्या रण महोत्सवाच्या धर्तीवर सारंगखेडा येथील चेतक महोत्सव विकसित करणे, गुजरातप्रमाणे खासगी, सार्वजनिक सहभागाच्या माध्यमातून महोत्सव घडविणे, गुजरात राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करणे, उडान योजनेचा लाभ घेऊन पर्यटक वाढविणे, सिनेमा चित्रीकरणासाठी स्वतंत्र धोरण बनविणे, गाईड्सना विशेष मानधन देणे, त्यांना प्रशिक्षित करणे, डिजिटल सादरीकरणावर भर देणे याबाबतीत यावेळी चर्चा झाली. (‘महान्यूज’)