वृक्षांना सर्वाधिक महत्व देणारी जगातली सर्वात जुनी भारतीय संस्कृती
राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाच्या उपक्रमात यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचे उदीष्ट राज्याने ठेवले आहे. वृक्षाचे महत्व वेगळे पणानं सांगण्याची गरज नाही पण या निमित्तानं काही रोचक माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
भारतीय संस्कृती आणि वृक्ष यांचं नातं खूप जूनंच आहे. माझ्या मते वृक्षांना सर्वाधिक महत्व देणारी ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आहे. भारत देश हा कधी काळी निबीड अरण्ये आणि संपन्न अशी प्राणी सृष्टी असणारा देश म्हणून ओळखला जात होता.
या आसेतूहिमाचल विस्तार असणाऱ्या खंडप्राय देशाला जंबूव्दीप म्हणून आधी ओळख होती. जाभंळांच्या झाडांचा देश म्हणजे जम्बूव्दीप होय. हिमालयापासून सुरु होणारी ही वनसंपदा सागरापर्यंत पसरलेली हेाती. काळाच्या ओघात जंगलांचा ऱ्हास झाला अर्थात याला निसर्गांपेक्षा माणूसच आधिक जबाबदार आहे.
या देशात सर्वाधिक वनसंपत्ती आणि त्यावर आधारित जीवन पध्दती होती. यातूनच आयुर्वेदासारख्या समृध्द अशा उपचार पध्दतीचा शोध लागला. जंगलातील वनस्पती आणि त्यांचे उपयोग यातून भारतातील सर्वांत पहिला ग्रंथ चरक संहिता पूर्ण झाला. याच्या ज्ञानातून त्याकाळी गावोगावी वैद्य असत व ते वनातून औषधी वनस्पती आणून त्याचा आरोग्य समस्यांवर उपचारासाठी वापर करीत असत. त्यामुळे जंगलाला आगळे संरक्षण प्राप्त होते.सर्व प्रकारचे वन्यप्राणी दिसून येत असत.
भारतीय संस्कृतीत वृक्षांचे महत्व आरंभापासून जपले होते. याला वैज्ञानिक कारणं आहेत. या उपखंडात असणारे ऋतू आणि त्या निमित्ताने साजरे होणारे सण यामध्ये या वृक्षांना जाणीवपूर्वक मानाचे स्थान देण्यात आले होते.
पुराण कथांमधील उल्लेख आपण जाणून घेतले पाहिजेत पांडवानी वनवासात जाताना आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. आजही दसरा हा सण या शमीच्या अर्थात आपटयाच्या पानांशिवाय साजरा होत नाही.
आंबा हा कुणाला परचित नाही या आब्याचं महत्व जाणून त्याला प्रत्येक शुभकार्यात अग्रस्थान प्राप्त आहे. आजही शुभप्रसंगी आंब्याच्या पानांचं तोरण दारोदारी दिसेल.जगात यांत्रिकी करणानंतर झपाटयाने जंगलांचा ऱ्हास झाला. माणसाने आपल्या गरजेसाठी जंगलं नष्ट केली त्याचा वापर अधिवासासाठी जागेपासून घर बनवणे, कागद उत्पादन आणि सर्वाधिक प्रमाणात इंधन म्हणून केल्याने जंगलाचे प्रमाण आजही घटत आहे. त्यात भर पडते ती दरवर्षी जगभरात जंगलांमध्ये लागणाऱ्या वणव्यांची हे वणवे देखील जंगले कमी होण्याचं एक कारण आहे.
भारतात देखील थेाडयाफार फरकाने हेच घडलेलं असलं तरी भारतात लोकसंख्या वृध्दीने प्रचंड प्रमाणात जगलतोड आजपर्यंत सुरु आहे या पार्श्वभूमीव संस्कृतीत वृक्षांना दिलेला अधिष्ठानामुळे काही वृक्ष तग धरुन आहेत. आपण संणाची सांगड घातल्याने त्या वृक्षांना तोडत नाही असं असलं तरी गेल्या काही वर्षात रस्त्यांचा विस्तार करताना मोठया प्रमाणावर या वृक्षांना तोडण्यात आलय.
वटवृक्ष
ज्याला आपण वडाचे झाड किंवा वट वृक्ष म्हणतो तो पूर्णपणे भारतीय आहे. जगभरात ते ‘इंडियन बॅनियन ट्री’ म्हणून ओळखले जाते.
भारतीय वड असला तरी भारता बाहेरील जगातील सर्वात मोठे वडाचे झाड मात्र अमेरिकेच्या हवाई बेटांच्या श्रुंखलेतील लहायना या ठिकणी आहे. हायना ही एके काळी हवाईची राजधानी होती. येथे अमेरिकन अध्यक्षांनी भेट दिली या घटनेच्या सवूर्णमहोत्सवी वर्षी त्याची आठवण म्हणून विल्यम आवेन स्मिथ यांनी १८७३ साली भारतीय वडाचे रोपटे लावले.
वड वाढल्यानंतर त्याच्या पारंब्यांचा विस्तार ०. ६६ एकर क्षेत्रात झालाय आज तो जगातला सर्वात मोठा वृक्ष म्हणून मान्यता मिळवून आहे इतकेच नाही तर त्याच्या बाजूना असणाऱ्या उद्यानाला बॅनियन ट्री पार्क म्हणून ओळखलं जात आणि हे उद्यान विश्ववारसा स्थळ म्हणून घोषीत करण्यात आलयं हे विशेष.
भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकाता जवळील हावडा इथल्या आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये आहे. याला हा वटवृक्ष २५० वर्षे जूना असून १८६४ आणि १८६७ या वर्षांमध्ये आलेल्या चक्रीवादळात त्याचे मुळ खोड क्षतीग्रस्त झाले आहे.
या खऱ्या अर्थाने वटवृक्ष काय याचं दर्शन इंथ आपणास घडेल याच्या पारंब्या ४.६७ एकर क्षेत्रात विस्तारल्या आहेत. १९२५ साली याचं मुळ खोड काढावं लागलं पण पारंब्यांचा विस्तार सुरुच आहे.
याची सर्वात उंच पारंबी २४.५ मीटर म्हणजे साधारण गेट वे ऑफ इंडिया इतकी आहे. या वटवृक्षाच्या ३७७२ पारंब्या इथं आपणास बघायला मिळतील.
या वडाला आपल्या संस्कृतीत सणांचे अधिष्ठान प्राप्त आहे. यातूनच ज्येष्ठ पौणिमेला वटपौणिमा साजरी केली जाते.
जम्बू व्दीप / सिल्क रुट
वृक्षांमध्ये भारतीय वृक्ष म्हणून सर्वप्रथम नाव वडाचे जगभर झाले असे नाही तर जांभूळ वृक्षाचे झाले संस्कृत भाषेत याला जम्बू म्हणतात. या वृशांची मुबलकता भारतात सर्वाधिक असल्याने महाभारत – रामायण काळापासून भारताची ओळख या वृक्षाच्या नावाने अर्थात जम्बूव्दीप अशीच होती.
पुराण कथांमध्येही याचा उलेख आहे महाभारतात भीष्म पितामह याला राजजम्बू किंवा या अर्थांने रुबाबदार नावाचा वृक्ष आहे असे म्हणत असा उल्लेख आहे तर रामायणात सिताहरण झाल्यानंतर श्रीरामांनी दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या झाडास सांगितल्याचा उल्लेख आहे.
जांभळाचे वैशिष्टय म्हणजे याची पाने वर्षभर हिरवी असतात आणि सुगंधित असतात. सुगंधाचा गुण असणारी झाडे कमीच आहेत यात निलगिरी आणि लवंग प्रमुख आहेत. या प्रकारच्या वृक्षांना लवंगफुल म्हणून ओळखले जाते.
या झाडाच्या फायदा फळासोबत याच्या लाकडामुळेही आहे. याची फळे मधुमेहावर गुणकारी आहेत. हे वृक्ष सरळ-सरळ १५० फूट पर्यंत उंच असू शकतात याच्या लाकडाचे वैशिष्टय म्हणजे लाकूड टणक असते पाण्यात कुजत नाही म्हणून तो सागासारखे टिकावू देखील असते. मुळचा हा भारतीय वृक्ष भारताबाहेर म्यानमार, श्रीलंका, मलेशिया आणि अगदी ऑस्ट्रेलियातही आढळेल. याची बाहेरील देशात असणारी ओळख इंडीयन ब्लॅकबेरी नावाने आहे. भारतात सर्व जंगलांमध्ये जाभ्ंळाची झाडं आपण बघू शकाल.
या झाडाद्वारे थेट जांभूळ हे उत्पन्न मिळते या खेरीज रेशीम कोष याच्या पानांवर व्यवास्थित पोसले जात असल्याने रेशीम धाग्यांच्या निर्मितीसाठी याचा सर्वोत्तम उपयोग होतो.
रेशीम ही या काळी भारताची वेगळी ओळख होती. आजही रेशीम (टसर) उद्योगासाठी याची लागवड व वापर करणे संयुक्तिक व लाभदायक ठरु शकते.
भारतात सण परंपरेशी निगडीत वृक्ष अशी सांगड घातल्याने किमान ती झाडे तोडली जात नाहीत याच कडूनिंब , पिंपळ, उंबर अशी अनेक वृक्षांची नावे आणि त्याचे महत्व आहे. ही झाडे अर्थातच भारतीय उपखंडातलीच आहेत याखेरीज भारतात विदेशतूनही अनेक झाडे आणली गेली ती इथं रुजली आहेत त्या प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे.
प्रशांत अं.दैठणकर (जिल्हा माहिती अधिकारी ), गडचिरोली (‘महान्यूज’)