महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी औषध पुरवठा
मुंबई:- केरळ राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने विस्कळीत झालेले जनजीवन व उद्भवलेल्या आरोग्यविषयक परिस्थितीशी सामना करण्यासाठी देशभरातून विविध प्रकारे मदतीचा ओघ केरळकडे अव्याहत सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदत कार्यात सर्वतोपरी सहभाग घेण्याचे आवाहन सर्वस्तरांवर केलेले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन राज्याचा अन्न व प्रशासन विभागही औषध पुरवठा करीत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट आणि विभागाच्या आयु्क्त डॉ. पल्लवी दराडे यांनी राज्यातील सर्व औषध उत्पादक व वितरक यांना केरळ पूरग्रस्तांसाठीच्या मदत कार्यात आवश्यकतेनुसार औषधे देण्याबाबत आवाहन केले आहे. या आवाहनास राज्यातील बहुतेक औषध उत्पादक, विक्रेते व पुणे येथील औषध विक्रेते संघटना यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात औषधसाठा मोफत उपलब्ध करुन दिला. या औषधांमध्ये प्रामुख्याने रक्तदाब, मधुमेह, ह्दयविकार आदीवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा समावेश आहे.
मंत्री श्री. बापट व श्रीमती दराडे यांनी हा औषधसाठा केरळ येथे रवाना करण्यासाठी जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा समन्वय अधिकारी डॉ. तायडे यांच्याकडे सुपुर्द केला.