माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन
नवी दिल्ली:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पाचवेळा लोकसभेत मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.
१९७६ सालापासून विद्यार्थी चळवळीत त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. केंद्रातील ‘यूपीए-२’च्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय गृह खात्यात राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले. गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. पेशाने वकील असलेले कामत यांचे मुंबईत शिक्षण झाले.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. तसेच या महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या श्री. कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे.