राज्य मंत्रिमंडळात १३ नव्या सदस्यांचा समावेश, सहा मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडून स्वीकृत

राज्यपालांनी दिली ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांना शपथ

मुंबई:- राज्याच्या मंत्रिमंडळात आज १३ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, राज्य प्रशासनातील अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

तर राज्यमंत्री म्हणून सर्वश्री योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय (बाळा) भेगडे, डॉ. परिणय फुके आणि अतुल सावे यांनी शपथ घेतली. श्री. महातेकर यांनी गांभिर्यपूर्वक शपथ घेतली तर अन्य सदस्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. सोहळ्याची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.

सहा मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडून स्वीकृत

तीन कॅबीनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपुर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हे राजीनामे स्वीकारले आहेत. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *