विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला!

मुंबई:-प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळ मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असून महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विजय चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

१९८५ मध्ये ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या विजय चव्हाण यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टी गाजविली. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या ३५० पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या, या भूमिकांना रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘मोरुची मावशी’ या सर्वाधिक गाजलेल्या नाटकात विजय चव्हाण यांनी मोरुची मावशी अप्रतिम रंगवली.

विजय चव्हाण यांच्या नाटक-चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल काही महिन्यांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, अशा या कसदार अभिनयाच्या अष्टपैलू कलाकाराच्या निधनाने नाटक, चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही शेवटी श्री.तावडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *