सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली महामार्गाची पाहणी

रत्नागिरी:- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते लांजा पर्यंतच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी तसेच महामार्गावरील रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारे खात्याच्या कन्सल्टंट यांच्यासह पाहणी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी रत्नागिरी अमित शेडगे, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता श्री. नेवले, कार्यकारी अभियंता श्री. बनगोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.देशपांडे, सा.बां.उत्तर रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता श्री. सावर्डेकर, सा.बां. विभाग चिपळूणचे कार्यकारी अभियंता, श्री. मुळे, जिल्हा कृषि अधिक्षक श्री. जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे चिपळूण ते लांजा रस्त्याच्या पहाणी करताना म्हणाले गेल्या आठवड्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते कणकवली या रस्त्याच्या कामाचा आपण आढावा घेतला आणि त्यावेळी ज्या ठिकाणी रस्ते खराब, रस्त्यावर खड्डे आहेत ते तात्काळ भरण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार महामार्गावरील आरवली ते संगमेश्वर या दरम्यानच रस्ता वगळता इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे समाधानकारक काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. तसेच आरवली ते संगमेश्वर या दरम्यानचा रस्तावरील खड्डे बुजविण्याचे काम गणपतीपुर्वी पूर्ण होईल. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर वाहतुकीस कोणतीही अडचण निर्माण होणार नाही व त्यांचा प्रवास सुखकर होईल.

बांधकाममत्र्यांनी सकाळी ७ वाजता चिपळूणहून रस्ते पाहणीला सुरुवात केली. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावाजवळी रस्त्याची पाहणी करताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले मुंबई गोवा महामार्ग चौपदरणीकराचे काम लवकरच पूर्ण होईल. हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा होणार असल्याने भविष्यात खड्डे ही समस्या राहणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *