‘जलयुक्त शिवार अभियान’ दुष्काळावर मात करण्याची योजना!

`जलयुक्त शिवार अभियान’ शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक!

‘पाण्याशिवाय जगणे’ म्हणजेच प्रत्येक जीवाने तडफडत तडफडत मृत्यूला कवटाळणे. पाऊस पडतो, कधी अधिक तर कधी कमी. पण पावसाचे पाणी जोपर्यंत आम्ही भूगर्भात साठवत नाही तोपर्यंत दुष्काळावर मात करणं शक्यच नाही. म्हणनूच २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर उपाय योजना म्हणून अशा योजनेची सुरुवात खूप आधीपासून व्हायला पाहिजे होती. परंतु राज्यकर्ते आणि प्रशासन यांची इच्छाशक्ती अपूरी पडली. महाराष्ट्रामध्ये अनेक लाजीरवाण्या दुदैवी घटना घडल्या; त्याच्या मुळाशी पाणी टंचाई हाच मुद्दा होता. हे प्रकर्षाने जाणवले आणि शेवटी शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान’ हाती घेतले. जर प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने ही योजना राबविली तर निश्चितपणे दुष्काळावर मात करण्याचे श्रेय शासनाला द्यावेच लागेल.

कुठलीही योजना कागदोपत्री पूर्ण होण्यापेक्षा ती ‘प्रत्यक्षात’ किती सफल झाली; त्यावरच त्या योजनेचे फलित साध्य होऊ शकते. आजपर्यंत शासनाच्या योजना कागदोपत्री यशस्वी होतात. प्रत्यक्षात करोडो रूपये खर्च होऊनही झालेले कामं पूर्णत्वास गेलेली नसतात. अशा अनेक समस्या असतानाही शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान’ यशस्वीपणे राबवून दुष्काळावर मात करण्यासाठी सक्षमता निर्माण केली. २०१५-१६ यावर्षात राज्यातील सहा हजार तर २०१६-१७ यावर्षात ५ हजार २८१ गावांची निवड केली व त्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली.

गावागावात ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ ही संकल्पना आणली गेली पाहिजे. गावकऱ्यांमध्ये जागृती आणली गेली पाहिजे. राजकीय पक्षांचे राजकारण आणि ठेकेदारांचे वर्चस्व ह्या मगरमिठीतून सुटका झाल्यावरच ग्रामपातळीवर ‘जलयुक्त शिवार अभियान’ यशस्वी होऊ शकेल. दुष्काळात अनेक दिवस होळपळल्यानंतर नागरिकांमध्येही पाण्याच्या योजनांबद्दल आपुलकी निर्माण झालेली दिसली म्हणूनच महाराष्ट्रात जलयुक्त शिवार आभियान प्रगतीपथावर दिसते आहे. ते शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *