वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने ७० टक्के अंधांना दृष्टी नाही!

वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी स्वस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई:- समाजातील आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी नेत्रतज्ज्ञांनी सर्वोत्तम, स्वस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधून काढावे. देशातील अंधत्व दूर करण्याचे आव्हान नेत्र तज्ज्ञांनी स्वीकारावे, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.

बाराव्या आंतरराष्ट्रीय ‘अॅडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजी’ काँग्रेसच्या आणि इंटरनॅशनल अॅकॅडमी फॉर अॅडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडियन अॅकॅडमी ऑफ अॅडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजीकडून आयोजित ‘आयॲडव्हान्स २०१८ काँग्रेस या कार्यक्रमात श्री. राव बोलत होते.

रेनेसा कन्व्हेन्शन सेंटर, पवई, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी युरोपियन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट आणि रिफ्रेक्टीव्ह सर्जन्सच्या अध्यक्ष प्रा. बीट्रीस कोचनर, “आयॲडव्हान्स २०१८”चे संयोजक अध्यक्ष पद्मश्री प्रा. डॉ. केकी मेहता, सह अध्यक्ष प्रा. डॉ. किरीट मोदी, सर जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक तसेच नेत्रोपचार विभागाचे प्रमुख पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, संयोजन समितीचे सदस्य, नेत्ररोग विशेषज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, संशोधक जगभरातून या परिषदेसाठी उपस्थित होते.

जगामध्ये भारतात सर्वाधिक अंधत्व असल्याबद्दल दुःख वाटते असे सांगून श्री. राव पुढे म्हणाले की, यापैकी ७० टक्के अंध व्यक्तींचे दूर होण्यासारखे अंधत्व केवळ वैद्यकीय यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे दूर होत नाही.

ओरबिस संस्थेच्या अंदाजानुसार २०२० पर्यंत भारतातील अंधांची संख्या १५ दशलक्षांपर्यंत पोहोचू शकते. मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वाचे सर्वाधिक ६२ टक्के प्रमाण असल्याचे दिसून येते. पूर्वी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात राहावे लागत होते. मात्र आता शस्त्रक्रियेत आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णाला मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर लगेचच रुग्णालयातून घरी सोडले जाते.

तरीही अद्याप अनेक रुग्ण नेत्रशस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत असून प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावर अंधत्वाची, अंध व्यक्तींची ओळख करून घेणे आणि उपचार यासाठी उपाययोजना करण्यास कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. आपण अनेक क्षेत्रांत सध्याचे तंत्रज्ञान बदलून त्याऐवजी पूर्णतः नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून ते स्वीकारले आहे. नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रिया क्षेत्रातही पूर्णतः नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे अशी अपेक्षा करतो. नेत्रोपचार क्षेत्रात खाजगी रुग्णालये नवीन विशेष रुग्णालये येत असली तरी सार्वजनिक रुग्णालयांनाच बहुतांश रुग्णावर उपचार करावा लागतो. जे. जे. रुग्णालयासारखी रुग्णालये रुग्णांनी भरून गेलेली दिसतात. अशा रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीची गरज आहे. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करणे तसेच नेत्रचिकित्सेकरिता सर्वोत्तम पायाभूत सुविधा पुरवणे जरुरी आहे. जेणेकरुन लोकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांप्रमाणेच मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही.

मोबाईल आणि स्मार्टफोन्सच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने तसेच विशेषत: लहान मुले आणि शाळेतील मुले स्मार्टफोनचा अमर्याद वापर करत असल्याने डोळ्यांच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डोळ्यांची निगा राखण्याबाबत तसेच याबाबत जागरुकता निर्माण करण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही श्री. राव यांनी केले.

भारतामध्ये मधुमेह ही एक गंभीर आरोग्य समस्या भेडसावत आहे. एका अभ्यासानुसार 60 टक्के भारतीय मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दोन्हीचे रुग्ण आहेत. मधुमेहींमधील नेत्रपटलाचे आजारावर उपचारपद्धती शोधणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान आहे.

नेत्रदानाच्या प्रमाणात वाढ होण्याची गरज आहे. एक मरणासन्न व्यक्ती दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकते हे पाहता मरणोत्तर नेत्रदानासाठी लोकांनी अर्ज भरून दिले पाहिजेत. त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रचार मोहिम घेणे आवश्यक आहे.

दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आयएडव्हान्स परिषदेत होणाऱ्या विचारमंथनामुळे नेत्र विज्ञानमध्ये प्रगतीची चर्चा होणार आहे. याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही श्री.राव यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात नेत्रचिकित्सा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या जगातील नेत्रतज्ज्ञ आणि संशोधकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात डॉ. कोचनर, डॉ. लहाने, डॉ. केकी मेहता, रोटरीचे शशी शर्मा, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ.विजय पाटील, डॉ.किरीट मोदी आदींनी मनोगत व्यक्त केले. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *