महाराष्ट्रातील ३४० गावांमध्ये होणार स्वच्छता सर्वेक्षण

नवी दिल्ली:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्यांना तसेच जिल्ह्यांना २ ऑक्टोबर या गांधी जयंतीदिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत “स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण २०१८” ची घोषणा विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे संयुक्त सचिव अरूण बरोका आणि स्वच्छता पेयजल विभागाचे महासंचालक अक्षय राऊत उपस्थित होते.

“स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण २०१८” मध्ये देशभरातील सर्वच ६९८ जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्ह्यामधून १० गावे याप्रमाणे ६ हजार ९८० गावांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील ३४० गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. तसेच, देशभरातील एकूण ३४ हजार ९०० सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सरकारी शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत भवन आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल.

स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण २०१८ अंतर्गत प्रत्येकी ३ ते ४ गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी ७ ते ८ गावांमध्ये सामान्य नागरिक तसेच सामूहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल.

अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी

उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसित केली आहे. या माध्यमातून ३५ टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, ३५ टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती, ३० टक्के प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.

आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण’ अंतर्गत स्वच्छतेसाठी निवडलेले गावे, हागणदारी मुक्त गावांची स्थिती, हागणदारी मुक्त गावांची पडताळणी, जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली जाईल.

प्रत्यक्ष पाहणी माहितींतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता या सर्व बाबींचा विचार केला जाईल.

प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमांतर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती गोळा केली जाईल. यांतर्गत स्वच्छताग्रही खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी गेली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागरुकता, स्वच्छ भारत मिशनबद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाची विल्हेवाट कशी लावता येईल याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *