`वैचारिक चळवळीचा वारसा कायम ठेवणार!’ गोपुरी आश्रम वाचनसंस्कृतीच्या युवाईचा संकल्प
वाचन संस्कृती विकास उपक्रमासाठी नूतन कार्यकारिणीची निवड
कणकवली:- “युवकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी वाचन संस्कृती उपक्रम उपयुक्त आहे. युवाईला वाचनाची आवड जोपासण्यासाठी व त्यांच्यात सकस वैचारिक बैठक निर्माण करण्यासाठी गोपुरी आश्रमात गेली सलग तीन वर्षे युवा वर्गासाठी वाचन संस्कृती विकास कार्यक्रम राष्ट्रसेवादलामार्फत सुरू आहे. हा वारसा आम्ही पुढे चालू ठेवून युवा वर्गाला वैचारिकदृष्ट्या सजग बनवण्यासाठी प्रयत्न करू!” असा संकल्प गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास ग्रुपने केला.
दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी गोपुरी आश्रमात वाचन संस्कृती विकास उपक्रम व सन २०१९-२० सालाकरिता नवीन कार्यकारणीची निवड असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यात सहभागी युवा युवतीनी हा संकल्प केला. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव मंगेश नेवगे, संचालक अर्पिता मुंबरकर, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, मावळते अध्यक्ष पूजा राणे, उपाध्यक्ष प्रथमेश लाड, सचिव सिद्धी गुडेकर, संघटक सागर कदम, प्रज्ञा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
आज झालेल्या वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात रेष्मा पवार यांनी विजय तेंडुलकर यांच्या ‘कन्यादान’ या नाटकाचे विवेचन करताना सद्यकाळातील युवा- युवतीमधील प्रेमसंबंध व त्यातून होणारी लग्ने आणि पुढे संसारिक आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर परखडपणे प्रकाश टाकला.
सुरज ठेंगील यांनी हेलन केलर यांच्या ‘माय लाईफ’ ह्या चरित्राविषयी माहिती सांगितली. हेलन केलर यांना मल्टी डिस्याबिलिटी येऊनही त्यांनी खचून न जाता जागतिक पातळीवर अपंग बांधवांच्या पुनर्वसनासाठी वेचलेले मूर्तिमंत जीवन उपस्थितांसमोर ठेवले.
सिद्धान्त काळसेकर यांनी डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ या पुस्तकाचे विवेचन केले.
प्राजक्ता गुरव यांनी नसिमा हुरजूक यांच्या ‘चाकाची खुर्ची’ या आत्मचरित्राचे विवेचन करताना नसिमा दीदींनी पराकोटीचे अपंगत्व येऊनही स्वतःच्या पायावर उभे राहून कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंग पुनर्वसनाचे केलेले कार्य उपस्थितांना सांगितले. आपण नसिमा दीदी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यायला हवी, असेही आवाहन केले.
पूजा विश्वकर्मा त्यांनी राजा शिरगुप्पे यांच्या ‘न पेटलेले दिवे’ या पुस्तकाचे विवेचन करताना शिरगुप्पे यांनी आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक मुलांना शिक्षण घेता आले नाही. याविषयी संशोधनात्मक माहिती लिहिली आहे. ही माहिती प्रत्येक संवेदनशील माणसाला आणि युवाईला अंतर्मुख करणारी आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे, असे सांगितले.
शुभम मटकर यांनी श्री.दीक्षित यांच्या ‘नेपोलियनचे चरित्र’ या पुस्तकाचे उपस्थितांसमोर विवेचन केले.
सातवीत शिकणारा सतेज शेट्टी याने ‘Danny the Champion of the World’ या Rohald Dhal यांच्या पुस्तकाचे विवेचन करताना पालकांनी मुलांमध्ये कुतूहल आणि उत्सुकता निर्माण करायला हवी. त्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन द्यायला हवे. असा संदेश या पुस्तकाच्या रूपाने जगातील सर्व पालकांना दिल्याचे सांगितले.
प्राजक्ता कदम या सातवीत शिकणार्या विद्यार्थिनीने अशोक कोतवाल यांच्या ‘स्वप्न विकणारा माणूस’ या पुस्तकाची माहिती सांगितली.
पल्लवी कोकणी यांनी ज्येष्ठ पत्रकार लेखक २०१० च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या साधना साप्ताहिकातील डिसेंबर २०१० ला छापून आलेल्या ‘माझ्यात एक समाज तयार झाला आहे.’ या मुलाखतीचे विवेचन करताना उत्तम कांबळे यांचे आयुष्य उपस्थितांसमोर मांडून सर्वांना अंतर्मुख व्हायला लावले.
मिळून सार्याजणी मासिकातील ‘मुस्लिम मुलींचे शिक्षण’ या तमन्ना इनामदार यांच्या लेखाचे विवेचन सोनाली भिसे हिने तर सातवीत शिकणारी, फोंडाघाट येथील संजना भिसे हिने प्रतिभा राऊत-सोनावणे यांच्या ‘स्त्रियांमधील वाढती व्यसनाधीनता’ या लेखाचे विवेचन करून अल्पवयातील ही मुलगी असूनही समाजाच्या या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहायला हवे; असे उपस्थितांना सांगितले. स्वेता ढवळ हिने मिळून साऱ्याजणी च्या अंकातील ‘यल्लो पेपर’ या लेखाविषयी विवेचन केले.