त्रिविक्रमावरील दृढ विश्वासानेच जन्मोजन्मीची चुका दुरुस्त होतात!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्वास ।
त्याच्या चुका दुरुस्त करीन खास॥
त्रिविक्रमावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्या चुका तो निश्चितपणे दुरुस्त करतो. विश्वास हा पूर्ण हवा. कारण विश्वास असतो किंवा नसतो. विश्वास आहे याचा अर्थ पूर्ण विश्वास आहे. जिथे विकल्प आहे तिथे विश्वास अजिबात नाही. बाबा नेहमी श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व सांगतात. या श्रद्धेची व्याख्या काय
श्रद्धालो: गुरुवेदान्तवाक्येषु विश्वासः श्रद्धा
– वेदान्तपंचदशी कल्याणपीयूषव्याख्या प्रकरण ९ श्लोक २२
श्रद्धावानाचा गुरुवाक्यावर असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.
देव आमच्यासारख्या सतत चुका करणाऱ्या, त्याला विसरणा-या माणसावर विश्वास ठेवतो आणि आमच्या प्रार्थना, मागण्यांना कृपेचे उत्तर पाठवतो. इतके त्याचे प्रेम आहे. मग त्याच्यावर विश्वास ठेवणे जड का जावे? बाबा आणखीन एक उपदेश करतात,
एक विश्वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा ।।१९/७४।।
हा विश्वास नुसता बोलण्यात असून उपयोग नाही. तो प्रत्यक्ष कृतीतून दिसायला हवा. बायबल म्हणते, म्हणून, शरीर ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय निर्जीव आहे, त्याप्रमाणे विश्वाससुद्धा कार्याशिवाय निर्जीव आहे. (याकोब २:२६)
हा विश्वास आमच्या मनात आणि आचरणात कसा उतरेल ? सोपे आहे… त्यासाठी अभ्यासायचे श्रीसाईसच्चरितातील विविध भक्तांचे आचरण आणि करायचे त्याचे अनुकरण.
एखाद्या व्यक्तीचं जवळून निरीक्षण केल्याशिवाय आपण तिचं अनुकरण करू शकत नाही. वैयक्तिक अभ्यास करताना, श्रीसाईसच्चरितातील कथांच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करायला हवा. वाचलेल्या अध्यायावर मनन करताना कथेत वर्णन केलेल्या दृश्याचं आणि तेव्हाच्या परिस्थितीचं चित्र डोळ्यांपुढं उभं करण्याचा प्रयत्न करायचा. त्या दृश्यात काय काय घडत असेल, कोणकोणते आवाज ऐकू येत असतील, कोणकोण कुठेकुठे उभे असेल याची कल्पना करायची. पण, याहून महत्त्वाचं म्हणजे त्या कथेतील व्यक्तींच्या मनात त्या वेळी कोणत्या भावना आल्या असतील यावर विचार करायचा.
जेव्हा आम्ही या श्रध्दावान भक्तांच्या भावना समजून घेऊ, तेव्हा आम्हाला त्या अगदी खऱ्याखुऱ्या, ओळखीच्या व्यक्ती वाटू लागतील. कोण जाणे, कदाचित त्यांपैकी काही जण आम्हाला बऱ्याच वर्षांची ओळख असलेल्या जुन्या मित्रांसारखेदेखील वाटू लागतील!
जेव्हा आम्हाला या व्यक्तींची अशी चांगल्या प्रकारे ओळख होईल, तेव्हा आम्हाला आपोआपच त्यांचं अनुकरण करावंसं वाटू लागेल. आम्ही अनुकरण केले म्हणजे आमचा विश्वास कमी ठरतो का? या ग्रंथात दिलेल्या काही व्यक्तींनीही इतर श्रध्दावानांचे अनुकरण केले होते. उदाहरणार्थ, भिमाजी पाटीलने नानासाहेबांच्या शब्दाचे अनुकरण करुन बाबांवर विश्वास ठेवला. त्याला अनुभव आला. त्याचीही भक्ती वाढत गेली. श्रेष्ठ श्रध्दावानांचे अनुकरण करुन विश्वास ठेवायचा , पण हेही लक्षात ठेवायचे की प्रत्येकाची रांग वेगळी आहे.
विश्वास ठेवला की अनुभव येत जातात, घटनांमागचा त्याचा अदृश्य हात दिसू लागतो, विश्वास ठाम होत जातो. मग हे अनुभव इतरांना सांगावेत, त्यांच्या जीवनात त्रिविक्रमाच्या प्रवेशाचे साधन बनावे.
स्वयंभगवान त्रिविक्रम आमच्या चुका दुरुस्त करणार म्हणजे नक्की काय? आमच्या चुका म्हणजे काय हे आधी आम्हाला कळायला हवे. सत्य, प्रेम, आनंद आणि पावित्र्य ह्याची चौकट सोडून आमच्याकडून जे काही होते त्या आमच्या चुका. या का होतात? तर प्रज्ञापराधामुळे. धि धृती स्मृति यापासून भ्रष्ट झालेला माणूस जे वाईट कर्म करतो त्याला प्रज्ञापराध म्हणतात. हा सर्व शारीरिक व मानसिक दोष वाढवतो.
धी धृति स्मृति विभ्रष्ट: कर्मं यत्कुरुतेऽशुभम्।
प्रज्ञापराधं तं विद्यात् सर्वदोषप्रकोपणम्॥
आता सत्य, प्रेम, आनंद, पावित्र्य या चौकटीबाहेर न जाण्याची काळजी आम्ही घ्यायची. पण आमच्या चुका होणारच आहेत, आमची ताकत अपुरी पडणार आहे; हे सर्व तो त्रिविक्रम जाणतो. ज्याचा त्याच्यावर विश्वास आहे त्याच्या चुका झाल्या म्हणून त्रिविक्रम त्याला सोडत नाही. एवढेच माहित हवे.
त्रिविक्रम चुका दुरुस्त कशा करतो? हा त्याचा प्रांत आहे. ते आमच्या बुद्धीच्या कक्षेबाहेर आहे. ते नाही कळले तरी काही अडणार नाही.
ज्याने धरिले हे पाय, आणि ठेविला विश्वास
त्यासी कधी ना अपाय, सदा सुखाचा सहवास
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
(क्रमशः)
-डाॅ आनंदसिंह बर्वे