पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक अकरावा
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
पूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम।
पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥
वेदकाळापासून मानवाने परमेश्वराला काहीतरी अर्पण करणे ही प्रथा सुरू आहे. सुरवातीच्या काळात हवनासारखी कर्मे करून अग्निच्या माध्यमातून देवतांसाठी आहुती अर्पण करणे; यासारखे विधी होते. यामध्ये नित्यकर्म म्हणून भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही अर्पण करणे अशी पद्धत होती. त्यानंतर यज्ञसंस्थेला आखीव स्वरूप मिळाले. बायबलमध्येही यज्ञांचे सविस्तर वर्णन आहे. गणना ( जुना करार ) २८ व २९ या अध्यायांत कोणती अर्पणे केव्हा दिली जावीत याचे जणू एक वेळापत्रकच दिले आहे. दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला आणि वार्षिक उत्सवांच्या वेळी कोणती अर्पणे द्यावीत हे या अध्यायांत सांगितले आहे.
अजून काही काळानंतर हे यज्ञ नित्यकर्म म्हणून तर सुरु राहिलेच; पण काम्य स्वरूपाचे यज्ञही होऊ लागले. यात विशिष्ट इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवतांना काही अर्पण करण्यात येई. आणखी काही काळानंतर व्रते ही संकल्पना आली. यामध्ये आधी काही गोष्टी करण्यात येत, विशिष्ट नियमपालन केले जाई आणि त्याबदल्यात परमेश्वराकडून काही मिळेल अशी प्रार्थना/ कामना केली जात असे. नवस ही संकल्पना मात्र यापेक्षा वेगळी आहे. आधी भगवंताने अमुक एक गोष्ट माझ्यासाठी केली तर मी मी अमुक अमुक करीन अशा भावाने नवस बोलले जाऊ लागले.
हरिश्चंद्राने पुत्र झाल्यास तो वरुणाला अर्पण करण्याचा नवस केला होता; परंतु नवस फेडण्याची टाळाटाळ केल्यामुळे त्याला जलोदर झाला व शेवटी त्याने पुत्राऐवजी शुनःशेपाला बळी देण्याचा प्रयत्न केला, अशी कथा ऐतरेय ब्राह्मणात आहे.
सर्व नद्यांचे जल ज्याप्रमाणे अखेर सागरालाच जाऊन मिळते, त्याप्रमाणे हवन यज्ञ व्रत नवस या सगळ्या मधील प्रेमभाव अखेर परमात्म्याच्या चरणी जाऊन मिळतो आणि तोही त्याचा प्रेमाने स्वीकार करतो. श्रीसाईसच्चरितात आपण पहातो – नवस विसरणारा गोमांतकस्थ, गरिबीमुळे नवस फेडायला विलंब झालेला चोळकर, चोरीला गेलेले रुपये मिळावेत म्हणून फकिराच्या सांगण्यानुसार आवडत्या वस्तूचा त्याग केलेला भक्त, बाबांच्या अनुग्रहाचा हट्ट धरुन अन्नत्याग करुन बसलेली राधाबाई; सगळेच अखेर बाबांप्रत येतात आणि बाबाही प्रेमाने या सगळ्यांचा स्वीकार करतात.
आपला तसा भाव असेल तर नवस करायला हरकत नाही. पण त्यात सौदेबाजीसारखी भावना नको. अर्पण करायचे ते प्रेमाने. कारण माझ्या नवसाचा मोह धरून परमात्मा मला काहीही देत नाही. तो देतो ते केवळ त्याच्या माझ्यावरच्या निरपेक्ष प्रेमामुळे.
🌸🌸🌸🌸
भक्ती करणं, जप-तप करणं, ग्रंथ वाचणं आवश्यक आहेच. मी हे सगळं करतो म्हणून हे घडलं हा विचार करणं पाप आहे. त्याची कृपा आहे म्हणून सगळं घडतं हा विश्वास आवश्यक आहे.
आम्ही दादांनी सांगितलेले जपजाप केल्यामुळे आमचं काम झालं हा गैरसमज आहे. जेव्हा जग निर्मिती झाली तेव्हा तुम्ही कोणी प्रार्थना केली होती का ?
त्याची कर्तुम् शक्ती आकलनाबाहेरची आहे. दादा आम्हाला जी उपासना देतात ती दादा आम्हाला त्याची कृपा स्वीकारण्यासाठी (जी असतेच) समर्थ बनवण्याचा मार्ग दाखवितात.
त्याच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर अतिशय प्रेमाने त्याला I Love You म्हणता यायला पाहिजे. काम होईपर्यंत आम्ही जपजाप regular करतो. खरंतर काम झाल्यानंतर जपजाप अधिक वाढले पाहिजे.
– परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन ( ०९ जानेवारी २०१२ )
🌸🌸🌸🌸
या वचनातील सुरुवातीचे पूर्ण श्रद्धेने हे शब्द पुढील प्रत्येक क्रियेला लावल्यास अर्थ आणखीन स्पष्ट होतो.
पूर्ण श्रद्धेने करा नवस
पूर्ण श्रद्धेने करा भक्ती
पूर्ण श्रद्धेने गाळा घाम
नवस केला म्हणजे आता पुढचे काय ते देव पाहून घेईल असे नाही. आमची भक्ती आम्ही पूर्ण श्रद्धेने सुरू ठेवायला आली. आमचे परिश्रम आम्ही पूर्ण श्रद्धेने सुरू ठेवायला हवेत.
साईनाथसुध्दा सांगतात
तुम्ही जोर काढू लागा | दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा ||
वाटी घेउनी उभाच मी मागा | पृष्ठभागा आहे की ||
पावेन तुमच्या श्रद्धेनुसार यातला ‘ पावेन ‘ हा शब्द आम्ही फार मनापासून लक्षात ठेवतो. आम्हाला वाटते “पावेन” असे वचन मिळाले म्हणजे आता काम झाले. मग ते काम झाले नाही की त्याला ‘ न पावणारा देव ‘ म्हणायचे का? पावणे हा शब्द समजायला अवघड आहे. पण श्रद्धावानांना तो सहज समजू शकतो. मला ज्यात सुख वाटते ते झाले म्हणजे देव नवसाला पावला असे नाही. माझ्या सुखापेक्षा देवाला ‘ माझ्यासाठी हितकर काय आहे ‘ याची काळजी असते. माझ्यापेक्षा माझी काळजी माझ्या देवाला जास्त असते; हे कायम लक्षात ठेवायला हवे. नवस करून मी जे मागत आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का? माझ्या हिताचे आहे का? पुढच्या काळातही ते हितकरच राहील ना? हे मागणे पूर्ण होताना ऋण वैर हत्या यांची काही चुकीची कर्म शृंखला तर निर्माण होणार नाही ना? इत्यादी इत्यादी अनेकानेक गोष्टींचा विचार करून परमात्म्याला माझे मागणे पूर्ण करायचे असते. या सर्व गोष्टी माझ्या बुद्धीबाहेरच्या आहेत. त्यामुळे परमात्म्याने मला हवे ते दिले किंवा न दिले तरी माझ्यासाठी योग्य तेच केले आहे हा भाव अंतरी असल्यास प्रत्येक नवस पूर्ण झालेला दिसेल.
जे जे मजसाठी उचित
तेचि तू देशिल खचित ।
हे मात्र मी नक्की जाणत ।
नाही तकरार राघवा ॥
त्रिविक्रम म्हणतो ‘ मी सर्वकाळ सुखधाम ‘. सुख म्हणजे काय ? आपल्याला ज्या सुखाची अपेक्षा असते ते इंद्रियांना आवडणाऱ्या विषयांची पूर्ती होण्यासंबंधी असते. पण ते खरे सुख नाही. कारण हे सुख सापेक्ष आणि परिवर्तनशील असते. तरीही आम्ही त्याच्याच मागे फिरत असतो. त्यामुळे भगवंतही आश्चर्याने म्हणतात ,
ऐसा ह्रदयामध्ये मी रामु। असतां सर्व सुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासि कामु। विषयावरी ॥
– ज्ञानेश्वरी ९/६०
ते सुखही ‘ हा ‘ आम्हाला देतोच. पण मग खरे सुख कोणते?
किंबहुना सोये। जीव आत्मयाची लाहे।
तेथ जें होये। तया नाम सुख ॥
– ज्ञानेश्वरी ११/१३१
जेव्हा जीव आत्मस्वरूप होतो, अंत:करण वृत्ती शांत होऊन आत्मरूप होते, तेव्हा जे काही होते त्यालाच सुख म्हणतात.
त्या सुखाचे धाम असा हा त्रिविक्रम आहे. तोही सर्वकाळ !! या सुखधामाकडून हे सुख आम्हाला मिळावे यासाठी कशाचा नवस करायचा ? कशी भक्ती करायची ? कुठले श्रम करायचे ? आम्हाला या अवघड गोष्टी जमतील का ?
काळजी करायची नाही. आपल्यासाठी सोपा मार्ग आहे. सर्व सुखांना जिथे सुख वाटते ते या अनिरुद्धहरीचे मुख प्रेमाने पहायचे. जास्तीत जास्त वेळा! जास्तीत जास्त वेळ!! जास्तीत जास्त प्रेमाने!!! बाकी सगळे काय असते ते ‘तो’च करेल……
सुखाचें हें सुख श्रीहरि मुख ।
पाहतांही भूक ताहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माउली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दुःख गेलें ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
– डाॅ आनंदसिंह बर्वे
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!