संपादकीय- मी माझे `मत’ कोणाला देऊ?
राजकीय पक्षांची हेराफेरी, राज्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा, जातीय, धार्मिक, प्रांतिक मुद्दयांना नको तेवढे महत्व, लोकशाही अबाधित राखण्यासाठी ज्या यंत्रणांनी आवश्यक त्या जबाबदारीने व कार्यक्षमतेने कार्य केले पाहिजे ते अयशस्वी होणे, स्वस्वार्थसाठी व पक्षीय स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असल्याने आम्हा मतदारांना नेहमीच निवडणुकीत मी माझे मत कोणत्या उमेदवाराला- कोणत्या राजकीय पक्षाला देऊ? हा खूप मोठा प्रश्न पडतो.
देशासमोर – जगासमोर अशा अनेक समस्या आहेत की, त्यावर राज्यकर्त्यांनी कार्य केले नाही तरी देशाचाच नाही तर जगाचाच विनाश होऊ शकेल. खरे तर ह्या मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा, संवाद होणे गरजेचे असते. पण आपल्या राजकीय नेत्यांना ह्याचं ज्ञान नसतं. असलं तरी ती प्रगल्भता त्यांच्याकडून दाखविली जात नाही. एवढेच नाहीतर आम्हा मतदारांना त्या महत्वाच्या समस्यांबाबत स्वारस्य वाटत नाही. त्याचाच फायदा राजकारणी घेत असतात. ज्या गोष्टीला मागणी ती गोष्ट चढ्या भावाने आणि जास्त विकली जाते. ज्याला टीआरपी मिळतो तोच मुद्दा चर्चिला जातो. दुर्दैवाने महत्वाच्या विषयांना आपणच मतदार प्राधान्य देत नाही म्हणून कदाचित राजकीय पक्षही त्याकडे दुर्लक्ष करीत असतील किंवा आम्हा मतदारांमध्येच त्याबाबत अज्ञान असू शकेल.
ह्यासंदर्भात आचार्य प्रशांत यांनी मांडलेले मत- केलेला संवाद अतिशय उपयुक्त ठरतो. आचार्य प्रशांत हे सामाजिक सभानता बाळगणारे, भूतकाळाचा आणि वर्तमानकाळाचा सखोल विचार करून भविष्यात वसुंधरेला सुरक्षित ठेवण्यासाठी अध्यात्मातील सूक्ष्म विचारांना प्रकट करीत असतात. प्रशांत त्रिपाठी , ज्यांना आचार्य प्रशांत म्हणून ओळखले जाते ते एक भारतीय तत्त्वज्ञ, लेखक आणि अद्वैताचा सिद्धांत मांडणारे तपस्वी आहेत. ते अद्वैत फाउंडेशन नावाच्या संस्थेचे संस्थापक आहेत. प्रशांत त्रिपाठी यांनी आयआयटी दिल्ली येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि नंतर २००३ मध्ये आयआयएम अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वेदांत शिक्षक आणि लेखक म्हणून सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी भारतीय नागरी सेवांसाठी काही काळ काम केले. २०२३ मध्ये त्यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. अशा तत्वज्ञानी तपस्व्याचं मत खूप महत्वाचे वाटते. मतदारांनी मतदान करताना नेमक्या कोणत्या मुद्दयांनां प्राधान्य दिले पाहिजे, त्यावर ते स्पष्ट बोलले आहेत. आपणही बघूया, ऐकुया आणि चिंतन करूया!
जिथे मतदार ज्ञानी अभ्यासू आणि प्रामाणिकपणे देशाचा विचार करणारे असतात तिथून निवडून येणारे लोकप्रतिनिधीही त्याच तोलामोलाचे असतील. `जसे मतदार तसे राज्यकर्ते’ हे साधारणपणे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-नरेंद्र हडकर