स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढल्यास डॉलरचे अवमूल्यन होऊन देशात पुन्हा सुवर्णयुग!- जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण
कोरोना महामारी खरं तर आपल्या देशाला इष्टापत्ती ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. स्वदेशीचा वापर वाढावा म्हणून देशात सर्वच थरामध्ये जोमाने प्रयत्न सुरु झाले आहे. भारतवासियांनी मनात आणले तर रूपयांच्या तुलनेने डॉलरचे वाढलेले मुल्य घसरायला फारसा वेळ लागणार नाही. आपल्या देशात पुन्हा एकदा सुवर्णयुग अवतरले, असा विश्वास कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.
अलिकडे कोल्हापूरच्या विविध व्यापारी संस्थांनी एकत्र येऊन चीनी मालाची होळी करून चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे सत्र सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा कर्ता करविता चीनच असल्याचे जगजाहीर झाले आहे. त्यामुळे आपल्या देशासह जागतिक स्तरावर चीनच्या विरोधात सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील निम्म्या संख्येने असलेल्या तरूणांनी आता आपल्या देशाच्या भवितव्यासाठी कशा प्रकारचे योगदान देता येईल? या दृष्टीने मानसिकता बदलायला हवी, असे विचार व्यक्त करून श्री चव्हाण यांनी आपल्या देशामध्ये कशाचीही कमतरता नाही. निसर्गाने आपणांस भरभरून दिले आहे. प्रचंड साधनसामग्री आहे. अगदी शेती, पशू, मत्स अशा क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अधिकाधिक उत्पादन घेतले पाहिजे. जगामधील अन्न-धान्य, मासे-मांस आदी खाद्याची भूक कधीही संपणारी नाही. या सर्व बाबींचा अभ्यास करून प्रक्रिया उद्योगाद्धारे अधिकाधिक निर्यात वाढविली पाहिजे.
चीनने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कमीतकमी उत्पादन खर्चात वस्तू तयार करून जागतिक बाजारपेठे काबीज केला आहे. मात्र चीनच्या वस्तू किती तकलादू आणि अल्पजीवी असतात; हे आता जगाला समजून आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांनी दर्जेदार वस्तूंची निर्मिती केल्यास आपण निर्यातीद्धारे जागतिक बाजारपेठे काबीज करू शकतो. सुदैवाने केंद्र शासनाकडून या दृष्टीने सर्वच क्षेत्रात चांगल्या योजना राबविण्यात येत आहेत.
भारतामध्ये बेरोजगारी हटविण्यासाठी डायरेक्ट मार्केटिंगमध्ये काम करण्यासाठी तरूणांना सुवर्णसंधी आहे. त्यादृष्टीने केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत, अशी माहिती देऊन श्री. चव्हाण यांनी २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्गचे सुपुत्र रमाकांत गायकवाड यांनी डॉलरचे मुल्य रूपया बरोबर आणण्याच्या उद्धेशाने स्वदेशीचा वापर वाढावा, यासाठी स्वदेशी मार्केटिंग या नावाने डायरेक्ट मार्केटिंगची एक अभिनव कल्पना राबवली होती. त्यावेळी स्वदेशी कंपन्याच्या आणि विदेशी कंपन्यांच्या उत्पादीत मालाची जाणकारी सर्वसामान्यांना होऊ लागली होती. लोकांचा कल स्वदेशी उत्पादनाकडे वाढू लागला होता. त्यामुळे विदेशी कंपन्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली होती. त्यामुळे अशा कंपन्यांनी राज्यकर्त्यांना हाताशी धरून ही व्यवसायिक चळवळ मोडून काढली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेमध्ये फिरून एकदा स्वदेशीची जागृती निर्माण झाली आहे. याचा फायदा तरूणांनी उठविला तर देशामध्ये पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू शकेल. आपला देश जगात महासत्ता होईल.