गावाशी ‘नाळ’ जोडली; रायगडच्या भूमिपुत्रांचे यशस्वी ‘पुनरागमन’

६३ कुटूंबांचे यशस्वी पुनर्स्थलांतर, ११२ कुटूंब गावच्या वाटेवर

मुंबईसारख्या महानगरात केवळ रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या रायगडच्या भुमिपुत्रांनी पुन्हा आपल्या गावाशी ‘नाळ’ जोडून घेत आपल्याच गावी यशस्वी ‘पुनरागमन’ केलंय. आपल्या गावी परतू इच्छिणाऱ्या या भूमिपुत्रांना पाठबळ देण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र कक्ष स्थापन केलाय. या कामी जिल्हा प्रशासनाला स्वदेस फाऊंडेशन सक्रिय सहभाग देत मदत करीत आहे. मार्च २०१८ पासून सुरु झालेल्या या अनोख्या अभियानामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६३ कुटूंबांचे यशस्वी पुनरागमन झाले आहे. तर ११२ कुटूंब पुन्हा आपल्या गावी परतण्याच्या वाटेवर आहेत.

रोजगारासाठी महानगरांकडे स्थलांतर ही तशी एक स्वाभाविक प्रक्रिया मानली जाते. रायगड जिल्ह्यातल्या ग्रामिण भागातूनही अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होत असते. त्यामुळे खेडी ओस पडली आणि शहरे बकालपणे फुगू लागली. शहरात राहून धकाधकीचे जीवन जगून पैसा मिळत असेलही पण स्वास्थ्य समाधानाचे काय? हा प्रश्न आणि या प्रश्नाचे गमक उमगलेल्या काही भूमिपुत्रांनी योग्य वेळी निर्णय घेतला आणि पुन्हा आपल्या गावच्या मातीशी नाळ जोडून घेत जिल्हा प्रशासन आणि स्वदेस फाऊंडेशनच्या मदतीने आपल्या गावी पुनरागमन केले. गावीच शेती, शेतीपूरक व्यवसाय करीत त्यांनी आपले आर्थिक उत्पन्न तर वाढवलेच शिवाय आता जगण्यातलं खरं सुख समाधान प्राप्त करत आहेत.

पुनरागमनाची चळवळ

खरं तर शहराकडे स्थलांतरीत होणं ही सुद्धा एक जटील प्रक्रिया असते. एवढ्या मोठ्या शहरात खेड्यागावातून गेलला व्यक्ती साहजिकपणे गोंधळतो. तिथं त्याला स्वतःच्या निवासापासून ते रोजगारापर्यंत सर्व व्यवस्था खस्ता खात निर्माण कराव्या लागतात. शिवाय तिथली दररोजची धावपळ, दगदग, मुलांचे शिक्षण, आरोग्य इ. विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा अवस्थेत अनेकांना ‘गड्या आपुला गाव बरा’ याची प्रचिती मनोमन येत असतेच. ही गावी परतण्याची उर्मी मनात दाबूनच जगावं लागतं. हीच उर्मी ओळखून गावी परतू इच्छिणाऱ्या भूमिपुत्रांचा स्वदेस फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांशी संपर्क आला आणि त्यातून उभी राहिली ही ‘पुनरागमनाची चळवळ’

परतीचा प्रवास

आपल्या गावी परतू इच्छिणाऱ्या रायगडच्या भूमिपुत्रांची मुंबईत दर महिन्याला एक बैठक घेतली जाते. त्यात जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही सहभागी होतात. गावी परतून त्यांनी कोणता व्यवसाय करावा हे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार ठरविले जाते. व्यवसायाची निवड झाल्यानंतर संबंधितांचे आवश्यक प्रशिक्षण, संबंधित व्यवसायाच्या भेटी इ. प्रक्रिया करुन त्यांना गावी आणून व्यवसायाची सुरुवात केली जाते. त्यासाठी जिल्हा प्रशासन हे आवश्यक दाखले, अर्थसहाय्य यासाठी सहकार्य करतं. आणि व्यवसाय सुरु होतो. यादरम्यान कुटूंब सोईनुसार स्थलांतरीत करुन मुलांना शाळा प्रवेश आदी सुविधा दिल्या जातात. आतापर्यंत असे ६३ कुटूंब रायगड जिल्ह्यात यशस्वीरित्या स्थलांतरीत झाले आहेत. तर ११२ जणांची प्रतिक्षा यादी तयार आहे. पुनर्स्थलांतरीत झालेल्या ६३ कुटूंबांपैकी १३ महाड तालुक्यातील, २१ माणगाव, ६ म्हसळा, ८ पोलादपूर, १३ तळा आणि २ श्रीवर्धन तालुक्यातील कुटूंबे आहेत.

जिल्हा प्रशासनाने स्थापलाय स्वतंत्र कक्ष

आपल्या मूळ गावी पुन्हा स्थलांतरीत होऊ इच्छिणाऱ्या (Reverse Migration) व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वतः अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक सदस्य, उपजिल्हाधिकारी रोहयो हे संयोजक, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, संचालक खादी ग्रामोद्योग मंडळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे सदस्य असून स्वदेस फाऊंडेशनचे व्यवस्थापक हे सदस्य सचिव आहेत. ही समिती भूमिपुत्रांना मूळ गावी पुन्हा स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन, मदत व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करते. अनेकदा पुनर्स्थलांतरीतांसाठी रेशनकार्ड पासून अन्य महत्त्वाची कागदपत्रे व दाखले लागत असतात ती तातडीने उपलब्ध करुन दिली जावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत. शिवाय बॅंकांकडून अर्थसहाय्य मिळविणे, जिल्हा उद्योग केंद्र, कृषि, पशुसंवर्धन यासारख्या विभागांच्या विविध योजनांचा लाभ या लोकांना मिळवून देण्यात सहाय्य केले जाते. मुंबईत होणाऱ्या या भूमिपुत्रांच्या बैठकीस जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित राहतात. गावाकडे स्थलांतरीत होऊ इच्छिणाऱ्या बांधवांना आश्वस्त करतात, हे विशेष.

स्वयंरोजगाराचे यश
आपल्या गावी परतून अनेकांनी स्वयंरोजगाराची कास धरली आहे. स्वतःची जमीन असणारे लोक शेतीचा वापर करु लागले आहेत. कुणी भाजीपाला उत्पादन, फुलांची शेती करुन स्वतः विक्री करताना दिसतायेत, तर कुणी शेळीपालन, कुक्कुटपालन, हॅचरीज सारखे युनिट टाकून इतरांना कोंबड्यांची पिले पुरवठा करुन व्यवसाय करीत आहेत. काजू प्रक्रियासारखे उद्योग करण्यातही अनेकांनी रस दाखवलाय. या व्यवसायात स्वदेश फाऊंडेशन सहकार्य करीत असते. बरीच उत्पादने उदा. प्रक्रिया केलेले काजू. शेळ्या, कोंबड्यांची मार्केटींग आदी व्यवस्था स्वदेश मार्फत पुरविल्या जातात. त्यामुळे व्यवसायात स्थिरावण्यात मदत मिळते.

काही यशकथा

नथुराम धासाडे रा. भांदेरे ता. माणगाव-अशा प्रकारे पुन्हा गावात येऊन शेती, व्यवसाय करणे तसे सोपे नव्हते. गावी चार दिवस विरंगुळ्यासाठी सुटीत येणं वेगळं आणि कायमचे स्थायिक होणे वेगळं. पण गावकऱ्यांनी या परत आलेल्या आपल्या बांधवांना स्वीकारलं. त्यांना सर्वोतोपरी मदतही केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नथुराम धासाडे. नथुराम धसाडे अशाप्रकारे मुंबईहून आल्यानंतर भांदेरे गाव- मांगरुळ ग्रामपंचायत ता. माणगाव येथे परतले. शेळीपालन व्यवसाय व शेती सुरु केली. त्यांना गावकऱ्यांनी इतके प्रेम दिले की आज ते या ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. आणि उत्तम पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभारही करीत आहेत. मुंबईत एका बिल्डरकडे ते काम करीत होते. 15 हजार रुपये प्रति महिना पगार होता. त्यांना एक मुलगी आहे. नुकताच मुलगाही झालाय. त्यांच्या पत्नीनेही साथ दिली आणि हे कुटूंब गावी परतलं. अंगीभूत हुशारीमुळे गावातल्या मित्रांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करण्याचा आग्रह केला, आणि निवडणूक जिंकून सरपंच झाले. त्यांच्या हुशारीची चमक आता गावही पाहतंय. गावात 14 व्या वित्त आयोगाची कामे, शाळांना संगणक देणे आदी तसेच विविध विकासकामे मार्गी लावतायेत. शेवटी मुंबई पेक्षा गावचं जीवन श्रेष्ठच आहे. स्वतःच्या दीड एकर शेतीच्या आधारावर दुग्धोत्पादन, शेळी पालन व्यवसाय करीत आहेत. सध्या वाल व अन्य कडधान्यांची लागवड केली आहे.

अनिकेत खेडेकर रा. बोरीचा माळ, ता. तळा- माझं शिक्षण MA पर्यंत झालंय. मी मुंबईत जॉब साठी आलो खरा, पण माझं मन मुंबईमध्ये रमत नव्हतं. मी विरारला राहत होतो आणि नोकरी दादरला. दररोज विरार वरून दादरला ये- जा करणं हे अधिक त्रासदायक होतं. काय करावे? या विवंचनेत मी होतो. मी स्वदेस फाऊंडेशनला मुंबईतल्या रिव्हर्स मायग्रेशन अर्थात ‘चला गावाला जाऊ या!’ या मिटिंगला उपस्थित झालो व त्या मिटिंगमध्ये मी स्वदेस फाऊंडेशनच्या गाव विकासाच्या सर्व योजनेबद्दल मी माहिती घेतली. मी ठरवलं की, गावाकडे परत यायचे. गावाला माझी शेती होतीच. आल्यानंतर मी स्वदेस मार्फत १००० झेंडूची रोपे आणि ३०० हळदीच्या रोपांची लागवड केली. कमीत कमी खर्चात व्यवसाय करता यावा हे माझं नियोजन आहे. जेव्हा माझे झेंडू आणि हळद उत्पादन आले तेव्हा गावातील इतर शेतकऱ्यांनीही पुढच्यावर्षी झेंडू आणि हळद लागवड करायची असं ठरवलंय. मी मुंबईहून परत आल्याने आधी लोक माझ्यावर टिका करीत मात्र आता तिच माणसे मला चांगल्या नजरेने पाहतात व मला सन्मानाची वागणूक गावात मिळते. इकडे गावाला मी स्वतंत्र आहे, मी कधीही शेतात जाऊ शकतो. मी मनाचा राजा आहे.

संजीव धसाडे, रा. भांदेरे गाव, मांगरुळ ग्रा.पं. ता. माणगाव- सन २००३ पासून मी मुंबईत होतो, भरपूर दिवसापासून माझ्या मनात होते की, गावाकडे जायचं, माझ्या वडिलांची ५ एकर शेती आहे. पाण्याची उपलब्धता आहे. गावी जाऊन करून काहीतरी करूया. त्यानंतर रिव्हर्स मायग्रेशन ह्या प्रकल्प अंतर्गत मुंबईतील मिटिंगमध्ये मी सहभागी झालो. स्वदेस फाऊंडेशनमार्फत मला ११ शेळ्या आणि २२ करड दिले. त्यावर मी माझा शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. गेल्या एका वर्षात शेळ्यांच्या विक्री व्यवसायामधून रु. १ लाख मिळाले. शेती व्यवसायबद्दल मला काही अनुभव नव्हता. मी माझ्या शेतीची मशागत अवघ्या 6 महिन्यात अडीच एकर शेतीमध्ये दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. आता मी शेतीत पूर्ण लक्ष केंद्रीत करतोय आणि अनुभव आल्यामुळे शेतीतून मी अधिक उत्पन्न मिळवेल असा मला आत्मविश्वास आला आहे. आता माणगावला आम्ही भाजीचे दुकान लावले. त्यात आम्हाला दररोज रु 400 – 500 नफा मिळतो.

स्वदेसचे आवाहन

मुंबईतील ज्या बंधूना रायगड मधील वरील तालुक्यामध्ये गावाला व्यवसाय/उद्योग व शेती आधारित प्रकल्प सुरु करायचा आहे त्यांनी स्वदेसच्या अधिकाऱ्यांना या 9821612298/ 8652320523 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन स्वदेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाची जबाबदारी स्वदेस मार्फत महाव्यवस्थापक तुषार इनामदार हे पाहतात.

डॉ.मिलिंद दुसाने (जिल्हा माहिती अधिकारी, रायगड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *