सर्वाधिक मजूरीचे दर कोकणात परप्रांतीयांना आकर्षणाचे कारण -भाई चव्हाण

कणकवली:- कोकणातील स्थानिक कामगारांची पडेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचाच फायदा परप्रांतीय मजूर वर्ग गेली अनेक वर्षें घेत आहेत. महाराष्ट्रापूरता विचार करता कोकण वगळता उर्वरित भागात पुरुषांची मजूरी २५० तर महिलांची मजूरी १५० रूपये दरम्यान आहे. कोकणात हा दर अनुक्रमे सद्या ५०० आणि ३५० रुपये एवढा आहे. त्यामुळे कोकणात मजूरीचे दर जास्त असल्याने या आकर्षणापोटी नजीकच्या कोल्हापूर जिल्हापासून ते अगदी नेपाळपर्यतचा मजूर वर्ग कुटुंब काबिल्यासह मुंबई सह कोकणात मजूरीसाठी येतो. कोकणातील स्थानिक मजूरांनी पडेल ते काम प्रामाणिकपणे करण्याची मानसिकता बदली तर तो शहरांच्या तुलनेने गावातच राहून वर्षाला समाधानकारक उत्पन्न मिळवू शकतो; असे प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील महाराष्ट्रसह कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, नेपाळ आदी भागातील हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावांकडे रवाना झाले. त्यापैकी काही जणांशी श्री चव्हाण यांनी संवाद साधला. त्यावेळी मजूरीचा हा फरक ठळकपणे लक्षात आला. रोजगार हमी योजनेखाली शासनाचा मजूरीचा अलिकडचा दर २१२ रुपये झाला आहे. तर खाजगी क्षेत्रात या प्रांतामध्ये मजूरीचे दर वरीलप्रमाणे आहेत, अशी माहिती देऊन श्री. चव्हाण यांनी कोकणामध्ये काही वर्षांपूर्वी असेच दर होते. मात्र दारिद्रय रेषेखालील रेशनकार्डधारकांना अगदी स्वस्त दरात गहू-तांदूळ मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बहुतांशी स्थानिकांनी मजूरीची कामे करणेच सोडले. त्यामुळे सर्वच क्षेत्रात कामगारांचा तुटवडा जाणवू लागला. त्याचमुळे परप्रांतीयांना जादा मजूरीच्या आमिषाने कोकणात आणण्यात येऊ लागले. परिणामी हळूहळू या मजूरांनी संबधितांची अडवणूक करून मजूरीचे दर वाढवायला सुरुवात केली. काहीवेळा ते अंगावर कामे घेऊ लागलेत. दोन दिवसांची कामे एकाच दिवसात उरकू लागलेत. त्यांचे वाढलेले मजूरीचे दर स्थानिक मजूर मागू लागलेत. मात्र एकंदरीत त्यांच्याकडून प्रामाणिकपणे अपेक्षित कामे होईनात. त्यामुळे या परप्रांतीयांना पसंती मिळू लागली. कोकणातील पैसा परप्रांतात जावू लागला.
मजुरी व्यतिरिक्त बांधकामाशी संबधित सर्व प्रकारची कामे, तसेच फळे, भाजीपाला, मासेविक्री आदी क्षेत्रांत पुरूषांसह महिला वर्ग पाय रोऊन उभे राहिलेत. समुद्रातील माशांची चव माहिती नसलेल्यानी इथे येऊन अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये संपत्ती निर्माण करण्यास सुरूवात केली.

आज कोकणातील जांभा दगड घरबांधणीसाठी कर्नाटकातील मजूर नेऊन स्वत:ची घरे इथल्या पैशातून बांधतो. शेतजमिनी खरेदी करतो. मात्र कोकणवासिय आपल्या जमीनी परप्रांतीयांना विकतो, असे निरीक्षण नोंदवून चव्हाण यांनी कोरोनामुळे चाकरमानी गावी परतला आहे. या चाकरमान्यांसह स्थानिकांनी आपली मानसिकता बदली तर ते कोकणातच राहून वैभव निर्माण करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *