सह्याद्रीचे प्रभू-त्व- सन्मा. सुरेश प्रभु
(श्री. विजय केनवडेकर हे भाजप सिंधुदुर्गचे जिल्हा चिटणीस आणि सिंधुदुर्ग जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी २०१६ साली सन्मा. सुरेश प्रभु यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख लिहिला होता. तो पुन्हा सन्मा. सुरेश प्रभु यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्ध करीत आहोत! ह्या लेखातून मालवणचे सुपुत्र आणि भारताचे शेरपा सन्मा. सुरेश प्रभु यांच्या कार्याची थोडक्यात ओळख होते आणि त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. सन्मा. सुरेश प्रभु यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! -संपादक)
सह्याद्रीचे प्रभू-त्व- सन्मा. सुरेश प्रभु
विपत्काळी धैर्य, प्रभुपणि सहिष्णुत्व बरवें।
सभे पांडित्याचा प्रसर, समरी शौर्य मिखे।।
स्व-किर्तीच्या ठायी प्रचुर, रति विद्या-व्यसनजें।
तयाचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष जे।।
ज्येष्ठ पंडित कवी वामन पंडितांनी वरील श्लोकात सत्पुरुषाचे, सज्जनाचे सहा सद्गुण सांगितले आहेत. हे सर्व गुण तंतोतंत लागू पडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच केंद्रिय रेल्वे मंत्री मा. श्री. सुरेशजी प्रभू होय.
नररत्नांना वसवून जन्मभूमी धन्य होते तिचा लौकिक वाढतो. यानुसार मा. प्रभू साहेबांमुळे या लाल मातीचा गौरव सातासमुद्रापार गेला आहे.
“विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.” जगप्रसिद्ध लेखक शिव खेरा यांच्या ‘यश तुमच्या हातात’ या गाजलेल्या पुस्तकातील हे वाक्य केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंना तंतोतंत लागू पडते.
१) अलीकडेच मोदी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे आपल्या सरकारविषयी असलेले मत जाणून घेण्यासाठी देशव्यापी सर्व्हे केला. त्या सर्व्हेत मोदी सरकारमधील ‘सर्वोत्कृष्ट मंत्री’ म्हणून जनतेने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंची निवड केली, असे वृत्त काही दिवसांपुर्वी ‘बिझनेस स्टैंडर्ड’ या नामांकित वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. ‘मिनिस्टर नंबर वन’ ठरलेल्या सुरेश प्रभूनी गेली दीड वर्षे भारतीय रेल्वेत सुधारणा घडवून आणण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांना भारतीय जनतेने दिलेली ही पोचपावतीच म्हणावी लागेल.
२) याअगोदरही वाजपेयी सरकारच्या काळात इंडिया टुडेने देशातील मंत्र्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करुन चांगली कामगिरी करणा-या केंद्रीय मंत्र्यांच्या यादीत सुरेश प्रभुना दुस-या क्रमांकांचे स्थान दिले होते.
३) ‘आज तक’ सारख्या नामांकित व्रतवाहिनीने तेराव्या लोकसभेतील ‘सर्वोत्कृष्ट खासदार’ पुरस्कार बहाल करुन त्यांचा यथोचित गौरव केला होता.
४) अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘एशिया वीक’ साप्ताहिकाने त्यांना भारतातील सर्वोत्क्रुष्ट तीन मंत्र्यांमध्ये स्थान दिले होते.
मंत्रीपद कोणतेही असो, त्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविण्याच्या सुरेश प्रभूच्या कर्तबगारीमुळे त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळत आहे. सुरेश प्रभूचे कर्तुत्व जाणून घेण्याआधी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना भेटणा-या प्रत्येकाला त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा अनुभव येत असतो. कोणताही विषय दिला तरी त्यावर अभ्यासपूर्ण भाष्य करण्याची क्षमता असलेले सुरेश प्रभू ‘चालता-बोलता विश्वकोश’च आहेत. आज त्यांच्या ६३ व्या वाढदिवशी ‘Transforming India Through Transforming Railways’ हे उद्दात ध्येय प्रत्यक्षात साकारताना त्यांनी भारतीय रेल्वेत केलेल्या सुधारणांची संक्षिप्त माहिती मी सर्वांसमोर मांडणार आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान-:
“Imperium in Imperio’ म्हणजेच ‘साम्राज्यात सामावलेले आणखीन एक साम्राज्य.
अशी ख्याती असलेल्या भारतीय रेल्वेत अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे ‘शिवधनुष्य’ सुरेश प्रभूनी नोव्हेंबर २०१४ साली हाती घेतले. शिक्षण आणि राजकारण या दोन्ही गोष्टींचा तसा फारसा संबंध नाही पण तरीही भारतीय जनतेला उच्चविद्याविभूषित नेत्यांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. ‘बी.कॉम’ सोबत ‘वकीली’ची पदवी घेऊन ‘सी.ए.’ परीक्षा देशात अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले, ‘वातावरणीय बदल’ व ‘अर्थशास्त्र’ या विषयात अनुक्रमे जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची आणि मुंबई विद्यापीठाची ‘पी.एच.डी’ डिग्री मिळवत असलेले आणि अमेरिकेतील लॅटिन विद्यापीठाने ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन गौरविलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान सुरेश प्रभू लोकसभा किंवा राज्यसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना, अगदी आश्चर्यकारकरीत्या थेट केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी विराजमान झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या.
१) सुरेश प्रभूनी याअगोदर केंद्रीय मंत्रीपदासोबल युनोसारख्या बड्या संघटनेत वरिष्ठ सल्लागार,
२) जागतिक बँकेच्या नेटवर्कचे सदस्य,
३) ब्रिटनस्थित वर्ल्ड फोरम फॉर ग्लोबल गव्हर्नन्सचे अध्यक्ष,
४) ई-संसदेचे उपाध्यक्ष,
५) G8+5 लेजिस्लेटर अँण्ड बिजनेस लीडर फोरममध्ये स्थान,
६) आफ्रिकन देशातील पाण्याबाबतच्या धोरणाचा अभ्यास करणा-या संदर्भ गटाचे सदस्य अशी अनेक पदे भूषविली होती.
७) सार्क फार्मर फोरमचे अध्यक्ष,
८) भारताच्या अमेरिकेबरोबर व्यूहरचनेबाबतच्या गटाचे सदस्य,
९) भारत-चीन, भारतजर्मनी संघटीत समितीचे अध्यक्ष,
१०) भारत-अमेरिका आणि भारत-ब्रिटन संसदीय समितीचे सदस्य
अशा अनेक पदांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या या प्रगल्भ अनुभवाचा उपयोग देशहितासाठी करता यावा, यासाठी त्यांना एका मोठ्या संधीची गरज होती.
रेल्वेत मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील-:
नेपोलियन बोनापार्ट म्हणाला होता की, संधीशिवाय कर्तुत्व सिद्ध करता येत नाही…! Ability is nothing without opportunity…!! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फार मोठ्या विश्वासाने केंद्रीय रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे सुरेश प्रभूच्या हाती सोपवून, देशाची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून दिली. सुरेश प्रभूनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा ‘देशाची लाईफलाईन’ म्हणून प्रसिद्ध असलेली भारतीय रेल्वे गुंतवणुकीअभावी ‘व्हेंटिलेटर’वर होती. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम रेल्वेची श्वेतपत्रिका काढून त्यात २०१५ ते २०१९ या कालावधीत १३० बिलियन डॉलरपेक्षा जास्त निधी रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण आणि अतिशय दाट असलेले रेल्वेमार्ग तुलनेने सुलभ करून भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी खर्च केला जाईल, असे स्पष्टपणे नमूद केले. रेल्वेच्या डब्यांचा दर्जा सुधारण्यासाठी, सिग्नलिंग यंत्रणा आधिक प्रभावी करण्यासाठी आणि जास्तीचे उत्पन्न मिळवून देणा-या रेल्वेमार्गांची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये पुढील पाच वर्षात ८.५६ लाख कोटी गुंतवणूक मिळवण्याचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले. तसेच निधी उभारण्यासाठी नवनवीन उपाय शोधून काढले. भारतीय रेल्वेने ३० वर्षांसाठी एलआयसी कडुन २५ बिलीयन डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. जागतिक बँकेने ३० बिलीयन डॉलर्स कर्ज देण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिलेला ‘मेक इन इंडिया’चा नारा भारतीय रेल्वेमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविताना रेल्वेमंत्र्यांनी डिझेल आणि विद्युत रेल्वे इंजिन बनविण्याच्या ४२ हजार करोड़ रुपयांच्या प्रकल्पासाठी GE, EMD, Alstom, Bombordier आणि Siemens सारख्या जगातील नामांकित कंपन्याना आमंत्रित केले. भारतीय रेल्वे थेट परकीय गुंतवणुकीतून रेल्वेइंजिन निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प बिहारमध्ये साकारत आहेत. पहिल्या प्रकल्पात ४५०० आणि ६००० हॉर्स पॉवर क्षमतेची १००० डिझेल इंजिन पुढील १० वर्षे पुरविण्यात येतील. त्यासाठी अमेरिकेतील GE कंपनीने २००० कोटींचा प्लांट बिहारमधील मर्होर्वा येथे स्थापिला आहे. दुसरा प्रकल्प १२००० हॉर्स पॉवर क्षमतेची ८०० विद्युत इंजिन पुरविण्यासाठी १३०० कोटी रुपये खर्चुन फ्रांसमधील Alsthom कंपनीने बिहार मध्येच माधेपुरा येथे निर्माण केला आहे.
अधिकारांचे विकेंद्रीकरण व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन-:
सुरेश प्रभू एक गोष्ट स्वतःहून मान्य करतात की, भारतीय रेल्वेसारख्या महाकाय संघटनेचा रहाटगाडा हाकताना निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान होणे आवश्यक आहे. त्यासाठीच रेल्वेमंत्र्यांनी निधीच्या निगुंतवणूक अंमलबजावणी संदर्भातील निर्णय घेण्याचे आधिकार रेल्वेभवनापुरते मर्यादित न ठेवता, त्या अधिकारांची अंमलबजावणी काही प्रमाणात विभागीय पातळ्यांवर केली. अशाप्रकारे अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याने निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक बनली आहे. त्यांनी देशभरातील गुणवंत तरुण-तरुणींना समान संधी उपलब्ध होण्याकरिता रेल्वेभरती प्रक्रिया ऑनलाईन करुन त्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेभवनात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आणि भारतीय रेल्वेशी निगडीत सर्व प्रकारची खरेदी ऑनलाईन टेंडर्सच्या माध्यमातून करण्यासाठी e-procurement ही नवीन कार्यप्रणाली सुरू करून रेल्वे खात्यातील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर लगाम लावला आहे.
सोशल मीडिया फ्रेंडली रेल्वे मंत्री-:
भारतीय रेल्वेचा विचार करता दररोज २.३ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात म्हणजेच दररोज ऑस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्येएवढे लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूनी ट्विटरचा वापर जादुच्या कांडीसारखा करून महाकाय रेल्वे प्रशासनचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी उपाययोजना सुनिश्चित केली आहे. त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रेल्वेची तक्रार निवारण यंत्रणा सोशल मीडिया फ्रेंडली झाली असुन, सर्व तक्रारी अधिक तत्परतेने, अधिक वेगाने हाताळल्या जात आहेत. भारतीय रेल्वेला सोशल मीडियावरून प्रत्येक दिवशी सरासरी १५०० तक्रारी येतात. त्यातील बहुतांश तक्रारी या सामान्य स्वरुपाच्या असल्या तरी दिवशी ८ ते १० गंभीर स्वरूपाचे संदेश भारतीय रेल्वेला प्राप्त होतात. त्यातही महिलांच्या छेड़छाडीसंदर्भातील तक्रारी अधिक असतात आणि त्या सर्वच्या सर्व तक्रारी संबंधित विभागांकडुन तातडीने दुर केल्या जातात. यापैकी बहुतेक तक्रारींमध्ये स्वतः रेल्वेमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष पुरविले होते. या तक्रारी निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेने खास कार्यपद्धती निर्माण केलेली आहे. तक्रारीचा संदेश स्क्रीनवर प्राप्त होताच त्या तक्रारीसंबंधी सर्व विभागीय अधिका-यांना माहिती दिली जाते. त्यानंतर संबंधित अधिकारी योग्य ती कार्यवाही करून तक्रारीचे तात्काळ निवारण करतात. आता या कार्यप्रणालीमध्ये अधिक सुधारणा करून भविष्यात प्रवाशांनी PNR नंबर सोबत मोजक्या शब्दात तक्रार केली असेल तरी त्याचे तातडीने निवारण केले जाईल.
रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे पर्व-:
रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्वाच्या ४०० रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आश्वासक पावले उचलली आहेत. भविष्यात प्रवाशांना भारतीय रेल्वेसोबल कायम टिकवायचे असेल तर त्यांनी रेल्वे प्रवासावर खर्च केलेल्या पैशांचे योग्य मूल्य त्यांना मिळवून द्यावे लागेल. महत्वाच्या शहरांमध्ये प्रवासी आरक्षण केंद्रांमुळे प्रवाशांना सुलभपणे आणि तातडीने रेल्वेच्या तिकिटी मिळत आहेत. गेल्या काही वर्षात ऑनलाइन तिकीट बुकींग लोकप्रिय होत असतानाच सुरेश प्रभूनी मोबाईल फोनवरून रेल्वेतिकीट बुक करण्याची सेवा प्राधान्याने सुरू केल्याने आजकाल मोबाईलवरून दररोज ५० हजार तिकिटे बुक केली जातात. त्याशिवाय नवीनोत्तम संशोधन म्हणुन स्मार्ट कार्डद्वारे तिकीट बुक करणा-या मशीन किंवा स्वयंचलित तिकीट मशीनची सुविधा काही स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यानी प्रवाशांच्या मदतीसाठी ऑल इंडिया २४*७ हेल्पलाईन नंबर ‘१३८’ आणि ऑल इंडिया सिक्युरिटी हेल्पलाईन ‘१८२’ सुरू केली. प्रवाशांना त्यांचे उतरण्याचे ठिकाण आल्यावर रात्री-अपरात्री किंवा पहाटे झोपेतून जागे करण्यासाठी अलार्म सुविधा ‘१३९’ नंबरवर सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ भारतीय रेल्वेमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवताना रेल्वेमंत्र्यांनी स्वच्छ रेल, क्लीन माय कोच यांसारख्या नवनवीन सुविधा सुरू केल्या. सर्व डब्यांमध्ये कचरापेटी बसवली. तसेच त्रयस्थ यंत्रणेकडून रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेचे ऑडिट करण्यात आले. १५५ रेल्वेस्थानकांवर शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले आहे. १५०० रेल्वेमध्ये e-catering सुविधा सुरू करून जेवणाच्या निवडीबाबत प्रवाशांना मोठा विकल्प निर्माण करून दिला आहे. मोबाईल catering साठी २०० पेक्षा जास्त कंत्राटे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवाशांना रेल्वेत ब्रांडेड जेवण मिळेल. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांचाही आस्वाद घेता येईल. रेल्वेमंत्र्यानी १०५२ रेल्वेस्थानकांची ‘आदर्श रेल्वेस्थानक’ म्हणुन निवड केली असुन त्यापैकी ९५६ रेल्वेस्थानके जुलै २०१६ पर्यंत विकसित करण्यात येतील आणि उरलेली ९६ रेल्वेस्थानके यंदाच्या आर्थिक वर्षात विकसित केली जातील. त्याव्यतिरिक्त आणखी १४३ रेल्वेस्थानकांची आदर्श रेल्वेस्थानकासाठी निवड केली जाईल. वाय-फायची सुविधा सर्व A1, A आणि B प्रकारच्या रेल्वेस्थानकावर पुरवण्यासाठी रेलटेलने गुगलशी करार देखील केलेला आहे. सध्या बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, सीएसटी मुंबई, अहमदाबाद, आग्रा, वाराणसी, सिकंदराबाद, हावड़ा, गाजिपुर आणि मडगांव या ११ रेल्वेस्थानकावर वाय-फायची सुविधा पुरविण्यात आली आहे. काही रेल्वेस्थानकावर स्वयंचलित लॉकरची सुविधा पुरविण्यात आली असून प्रवाशांना स्वस्त दरात स्वच्छ पाणी पुरवणा-या स्वयंचलित मशीन देखील बसविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना स्वच्छ चादरी आणि कापड मिळण्याकरीता ७ नवीन लॉड्री उभारल्या आहेत. नेहमी सर्वसामान्यांचा विचार करणाया सुरेश प्रभूनी जनरल डब्यात मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा पुरवण्यासंदर्भात सुचना केल्या आहेत.
गतिमान एक्स्प्रेस-:
आधीच्या सरकारमधील रेल्वेमंत्र्यांना जी गोष्ट गेली ६०-६५ वर्षे जमली नाही, ती गोष्ट अंमलात आणायला सुरेश प्रभूनी ६० महिने देखील घेतले नाहीत. दिल्ली ते आग्रा हा १८८ किलोमीटरचा प्रवास अवघ्या १०० मिनिटात पुर्ण करणारी ‘गतिमान एक्स्प्रेस’ ही भारतातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे सुरेश प्रभूनी सुरू केली आहे. गतिमान एक्स्प्रेस विक्रमी अशा १६० किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. दिल्ली-आग्रा रेल्वेमार्गाप्रमाणे मुंबई-गोवा, नागपूर-बिलासपुर, नागपूर-सिकंदराबाद, दिल्ली-कानपूर, दिल्ली-चंदीगढ, चेन्नई-हैदराबाद यांसह आणखी आठ मार्गावर भविष्यात ‘गतिमान एक्स्प्रेस’ आपल्या सुसाट वेगाने धावेल. गतिमान एक्स्प्रेसला गती देण्यासाठी १२ डब्यांचा नवा ट्रेन सेट वापरण्यात आला आहे. फक्त वेग हेच गतिमान एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य नाही. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात ‘गतिमान एक्स्प्रेस’ ही मैलाचा दगड ठरणार आहे. गतिमान एक्स्प्रेसमध्ये दोन एक्झिकेटिव्ह वातानुकूलित चेयर कार आणि आठ सामान्य एसी चेयर कार यामधून ७१५ प्रवासी प्रवास करतील. या गाडीसाठी सर्वात शक्तिशाली ५४०० हॉर्सपॉवर क्षमतेचे पी-५ इंजिन जोडण्यात आले आहे. ‘एअर होस्टेस’च्या धर्तीवर ‘ट्रेन होस्टेस’ ही संकल्पना ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्याची सवय असलेल्या सुरेश प्रभूनी प्रथमच गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रत्यक्षात साकारली आहे. या एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांचे सुरुवातीलाच ट्रेन होस्टेस गुलाबाचे फुल देऊन स्वागत करतील. त्याचप्रमाणे या एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना कार्टून, चित्रपट, बातम्या पाहणे यांसारख्या मल्टीमिडीया सेवा आणि इंटरनेटचा अमर्याद वापर करण्यासाठी वाय-फाय सेवा मोफत पुरविण्यात येईल. या एक्स्प्रेसमधील खाण्याची सुविधा इतर गाड्यांपेक्षा उत्कृष्ट दर्जाची असणार आहे. या रेल्वेतील सफाई व्यवस्थेत ‘मराथोन सील’ नावाचा प्रयोग केल्याने सर्व प्रवाशांना गाडीतील पॉलीश केलेली फरशी अधिक चमकदार वाटेल. यात विशेष प्रकारचे ‘कपलिंग बैलेंस ड्राफ्ट गेयर’ वापरण्यात आल्याने चालकाने ब्रेक लावल्यावर गाडीचा झटका प्रवाशांना लागणार नाही आणि त्यामुळे चहा किंवा पाणी प्रवाशांच्या अंगावर सांडणार नाही. पर्यावरणप्रेमी प्रभूनी गतिमान एक्स्प्रेसमध्ये पुर्णपणे ‘बायोटोयलेट’ची संकल्पना पहिल्यांदाच राबवली आहे. या रेल्वेच्या बाहेरच्या भागात पिवळ्या रेडियमची पट्टी वापरल्याने रात्रीच्या वेळी फार दुरून ही गाडी येत असल्याचे लक्षात येते आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था सतर्क राहते. अशा प्रकारे नानाविध सुविधांनी सज्ज असलेली ‘गतिमान एक्स्प्रेस’ हे भारतीय रेल्वेने कात टाकली, याचे जिवंत उदाहरण आहे.
रेल्वे बजेटमधील घोषणांची पूर्तता-:
आजपर्यंत रेल्वेबजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करायच्या, बजेट संपल्यावर त्या विसरून जायच्या आणि पुढच्या वर्षी नवीन बजेट आणि नव्या घोषणा करायच्या, असाच पायंडा आपल्या देशात पडला होता. ‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ या मानसिकतेमुळेच भारतीय रेल्वे डबघाईला आली. सुरेश प्रभूनी यावर्षी आदल्या बजेटमधील घोषणांचा हिशेब देण्याचा नवीन पायंडा पाडला. युपीए सरकारच्या काळात २००९-१४ साली पाच वर्षात सरासरी १६२६ किमीचे नवीन रेल्वेमार्ग बांधण्यात आले होते. सुरेश प्रभूनी एका वर्षात तुलनेने तब्बल ८५ टक्के अधिक अशा २८२८ किमी नवीन रेल्वेमार्गाचे बांधकाम करून आपली कार्यक्षमता सर्वांना दाखवून दिली. २००९-१४ साली पाच आतषबाजीचे विश्लेषण करण्यापेक्षा त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये सुधारणांचे पर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेला दृढसंकल्प मला महत्त्वाचा वाटतो. अर्थात हा संकल्प पूर्णत्वास जाण्यावर त्याची गुणवत्ता विसंबून असते पण प्रामाणिक प्रयत्न व प्रचंड इच्छाशक्ती जोडीला असतील तर या जगात काहीही अशक्य नाही. भविष्यात मंत्रीपदी सुरेश प्रभूपेक्षा चांगला नेता पहायला मिळेलही पण रेल्वे प्रशासनावर मजबुत पकड असलेला त्यांच्यासारखा उत्तम प्रशासक आपल्या देशाला मिळणे फार दुर्लभ आहे.
एखादे व्यक्तिमत्त्व आपले अंगभूत गुण आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची अशी शिखरे वादाक्रांत करतात की एखाद्या लेखात अथवा काही पानांत त्याचा आढावा घेणे केवळ अशक्य ठरते.
कीटः सुमनसः सद्दारोहति सतां शिरः।
अश्मापि याति देवत्वं महद्भिः सुप्रतिष्ठितः।।
परंतु वरील श्लोकाच्या अन्वयर्थानुसार मला गेले वीस वर्ष प्रभु साहेबांचा दिर्घ सहवास सातत्याने लाभला या काळात विविध प्रसंगानुरुप त्यांच्या अजोड व्यक्तिमत्त्व तीव्र बुद्धिमत्ता, सामाजिकता, दूरदृष्टी, नियोजन, धैर्यशिलता आणि आशावाद अशा असंख्य पैलूंचा परिचय मला झाला व ‘प्रभूच्या’ प्रभाव प्रतितच होत राहिला आणि म्हणूनच वरील दोन शब्द मी लिहू शकलो.
-श्री. विजय केनवडेकर