पर्यावरणाशी कृतज्ञता जपायला हवी! पर्यावरणाचे व्यवस्थापन संपूर्ण जगाची गरज!!

उंच उंच डोंगर भवती। चढले नील नभांत भिरभिर वारा व्यापुनियां । टाकी सारा प्रांत। । १।।
तरुवेलींनी फुललेल्या। त्या खोऱ्यांत सुरेख
झुळझुळ वाहे निर्झरिणी। स्फटिकावाणी एक।। २।।

पर्यावरण म्हणजे निसर्ग…..

लोकसंस्कृतीचा, तिथल्या माणसांचा अविभाज्य घटक म्हणजे निसर्ग!
निसर्गाशी एकजीव होऊन जगणं हे अनादिकाळापासून- ऋग्वेद, तसेच आणखी किती तरी ग्रंथांमधून भक्कमपणानं सांगितले गेले आहे.

आणि म्हणूनच पर्यावरण म्हटल्यावर निसर्ग डोळ्यासमोर येतो, आणि अशी सुंदर कडवी ओठांवर येतात…

पर्यावरण म्हटल्यावर हे असे अपेक्षित असायला हवे..

आज मात्र ह्या साऱ्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या आहेत यापेक्षा दुर्दैव ते कोणते!

दुर्दैवाने आज `पर्यावरण’ हा शब्द कानावर पडल्यावर मनात एक अनामिक भीती आणि निसर्गाचे छिन्नविच्छिन्न झालेलं चित्र दिसू लागते…तुटलेले, कुरतडलेले, खोदलेले डोंगर, कापलेली झाडे, भुईसपाट झालेली जंगले, सुकलेले नदी, झरने, नष्ट झालेले जीव, जंतू, पशु-पक्षी, आणि भरमसाठ संख्येने वाढलेला पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान असणारा प्राणी म्हणजेच मनुष्य प्राणी…

हे आजचे चित्र निसर्गाचे….पर्यावरणाचे
किती हा विरोधाभास…. आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरू आहे…?

आपण स्वतःला सर्वात बुद्धिमान समजतो आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा वापर करून आपला विकास साधून घेतला आणि घेतच आहोत.

मात्र परतफेड करण्याचे साफ विसरून गेलो आहोत. एखाद्या व्यक्तीकडून का समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रति नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही. हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. त्यामुळेच आज “पर्यावरण वाचवा …पृथ्वी वाचवा” यासारखे वाक्ये कानी पडत आहेत.

आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. साऱ्या जगामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. आपण बोअरमधून लाव्हा येत असेलेल्या बातम्या ऐकत आहोत, अॉस्ट्रेलियात सलग चार महिन्यांत तापमानाचा झालेला विक्रम व वाळवंटातील ‘सीरिया’ देशात पडलेला अभूतपूर्व मुसळधार पाऊस अश्या कितीतरी घटना आपल्या कानांवर पडत आहेत.

निसर्ग म्हणजेच प्रकृती सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग. आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत.

माणूस हा निसर्गामधला असा घटक आहे जो नैसर्गिकसुद्धा असतो आणि अनैसर्गिकसुद्धा असू शकतो. जर मानवाने बुद्धत्व प्राप्त केलं तर तो अतिशय वर पोहचू शकतो तसाच तोच माणूस जर पाशवी पातळीवर खाली उतरला तर जगाची राखरांगोळी ही करू शकतो. ह्याचा अर्थ हासुद्धा आहे की, मानव आणि प्रकृती ह्यांच्यामध्ये खूप मोठा पारस्परिक संबंध आहे. जसा सूक्ष्म अर्थाने एक दवबिंदूसुद्धा हिमालयाशी जोडलेला आहे. किंबहुना हे सर्व नैसर्गिक घटक एकमेकांशी अतिशय जवळून जोडलेले आहेत आणि एक दुस-यांना प्रभावितही करतात. विज्ञानही हीच गोष्ट सांगतं.

आपण ज्या समस्यांना आज सामोरे जात आहोत ह्या समस्याकडे आपण माणूस म्हणून न बघता प्रकृतीतील एक घटक म्हणून बघायला हवं.

प्रकृतीमध्ये प्रत्येक व्यवस्थेचे नियम असतात. सर्व काही नियमांनुसारच होत असतं. ह्या नियम प्रणालीलाच निसर्गाचा नियम- प्रकृतीचा गुणधर्म म्हटले जाते. हे नियम छोट्या कणापासून मोठ्या ता-यापर्यंत आणि दोन ता-यांमध्ये असलेल्या विराट पोकळीलाही लागू होतात.

संतुलन टिकवून ठेवण्यासाठी त्या चौकटीत रहावं लागेल. जर मानव त्याच्या बुद्धीमुळे त्या चौकटीचे उल्लंघन करत असेल, तर त्यामुळे पूर्ण संतुलन बाधित होईल आणि हळु हळु त्याचे परिणाम होऊ लागतील. आणि हेच खरे ह्या समस्यांचे मूळ आहे.

म्हणूनच आपल्याला पूर्वीच्या काळी मानव- प्रकृती संतुलनाच्या स्थितीचा विचार करावा लागेल.

सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो त्यामुळेच त्या कुंटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागली तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे.

तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असू द्यावे.

पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की त्यांचे घर वाढतात आणि घरे बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यासाठी कुटुंब नियोजनसारख्या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अधिक वेगात करणे आवश्यक आहे. लोकसंख्येला आळा घालणे अनिवार्य झाले आहे.

आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो, मात्र हवतील ऑक्सिजनशिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि हवेतील कार्बनडायऑक्साईड म्हणजे खराब हवा कायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.

जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. वृक्षांचे महत्त्व अपरंपार आहे, हे आपले पूर्वजसुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ‘वृक्षकल्ली, आम्हां सोयरे, वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.’’ खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे का?

वृक्षांच्या महत्त्वाविषयी आपले पूर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.

आपल्या देशाब बोलायचेच झाले तर आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. येथील एकतृतीयांश जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अधिक उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीची जुनी पद्धत बंद करून, रासायनिक औषध व खताचा बेसुमार वापर करीत आहेत. रासायनिक औषध व खताचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रिय खताचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे.

नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर उर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर लकरण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अशा सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. आज ज्या सौर उर्जेचा वापर नगण्य स्करूपात आहे, म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनांच्या मदतीने कापर करता येऊ शकतो आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकेल. सौर बंब, सौर चूल, आणि सौर उर्जेकर चालणाऱ्या विविध उपकरणांचा जास्तीत जास्त वापर कसे करू शकतील? याविषयी शासनाने महत्त्वाचे फायदेशीर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

केरळच्या महापूरानंतरही नद्या सुकल्या, विहिरी आटल्या, भूजल स्थर खाली गेले, पाणी समस्या वाढली. केरळातील या घटनांमुळे सर्वांना धक्का बसत आहे.

सुमारे १०० वर्षांपूर्वी मातृभूमीबद्दल ‘वंदे मातरम्’ गीतात ‘सुजलाम् सुफलाम्’ म्हटले आहे. ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत स्थिती अशी होती. शुध्द पाण्याच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. झरे, ओढे, तलाव, विहिरी भरलेल्या होत्या. मासळी होती. प्रत्येक गावात किमान २ ते ३ नैसर्गिक कमळाच्या फुलांनी युक्त, बदके, हंस विहरणारे सुंदर स्वच्छ तलाव होते. भूजल पातळी भूपृष्ठालगत होती. देशात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेली गावे फक्त सुमारे २५० होती. पर्वतांवरून येणारे सुगंधी थंडगार वारे वाहत होते. राजस्थानातील जैसलमेर बिकानेर सारख्या काही ( ४ – ६ ) इंच पाऊस पडणार्या विभागांतील गावेही पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण होती. शेतकऱ्याने कधीही आत्महत्या केली नव्हती.

आज देशात २ लाख ७५ हजार गावांमधे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ९३% नद्या प्रदूषित आहेत. भूजल स्थर खोलवर गेले आहेत, सुक्या दुष्काळाला सामोरं जावं लागतं आहे.

तर काही ठिकाणी ओला दुष्काळ…अशी विरोधाभासी चित्रे दिसत आहेत.

तसेच हरितद्रव्याने अविरत सुमारे २५० कोटी वर्षे कार्बन शोषला. जीवनाचा विकास करणारे सुयोग्य तापमान त्यामुळे मिळाले. म्हणून मानवप्राणी व जैविक विविधता आली. मानवाने जीवन फुलवणार्या पृथ्वीला आपल्या यंत्रावर आधारित जीवनविरोधी जीवनशैलीमुळे फक्त २५० वर्षांत जीवनास प्रतिकुल बनवले. आपल्या देशात तर ५० – ६० वर्षांत. निसर्गाशी विनाकारण स्पर्धा करून उत्तुंग पर्वत तोडून खुजे टाॅवर उभे केले.

औद्योगिकरणासाठी तंत्रज्ञानाने केलेल्या वस्तू विकत घेऊन वापरणारा माणूस घडवते. हे जगणेच नाही. यंत्राचा भाग म्हणून वापरले जाणे आहे. प्रत्येकाला मोटारीचे स्वप्न दाखवले जाते; परंतु त्यामुळे मान्सून गमावला जाईल आणि काही दशकांत आपण उष्णतेने भाजून मरू हे सांगितले जात नाही.

पृथ्वीच्या सरासरी तापमानात पाच वर्षांत १° से अशी भयंकर, अभूतपूर्व व महाविस्फोटक वाढ गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाली आहे.

वाहने व त्यातही मोटारीचे वायूप्रदूषण, खनिज इंधने जाळून होणारी वीजनिर्मिती, अन्नात शीतपेयांत येणारी रासायनिक खते, कीटक- तण- बुरशीनाशके, अणुभट्ट्या व अणुकार्यक्रमातुन होणारा किरणोत्सार ही प्रमुख कारणे व एकूणच उद्योग, वीजनिर्मिती, वाहतुक, बांधकाम, रासायनिक शेती म्हणजे औद्योगिकरण हे कॅन्सरचे कारण आहे. हीच कारणे झाड- जंगल, पाणी गमावण्याची, तापमान वाढण्याची आहेत.

जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले आहे की, तापमान आता वाढत राहणार आहे कारण वातावरणातील कार्बनने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हजारो वर्षांच्या स्थैर्यानंतर फक्त काही दशकांत मुंबईत ४५° तर विदर्भात व युरोपचा काही भाग व आॅस्ट्रेलियात ते ५० ° से च्या वर जात आहे. ५०°से वरील तापमानात माणुस प्राणी म्हणून जगू शकत नाही. पॅरिस करारात मानवजात वाचवण्यासाठी नमूद केलेली २°से ची धोक्याची पातळी आपण दोन वर्षांत ओलांडत आहोत. तरीही आपण बेफिकीर आहोत.

याचे गांभीर्य कधी लक्षात येणार आपल्या?

मानवाच्या संहारक मानसिकतेने निसर्गास कसे कैदेत टाकले आहे,

जल, जंगल आणि जमीन या तीन ‘ज’च्या पर्यावरण त्रिसूत्रीची गांभीर्याने विचार करून संरक्षण व संवर्धनच्या दृष्टीने अतिशय वेगाने पाऊले उचलली जाणे आवश्यक आहे.

हवामान बदल, वन संवर्धन आणि प्रदूषण, सागरी संवर्धन, प्रकाश-ध्वनी-रंग प्रदूषण, हवा-पाणी-माती संवर्धन अशा विविध सात विभागांत विभागून त्यांना अनुसरून पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य लोकांनी समस्यांवर फक्त विचारविनिमय न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे.कदाचित शेवटची संधी आता आपल्या हातात आहे. असे समजून पर्यावरण व्यवस्थापन करायची हीच वेळ आहे. यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करून त्याची पूर्तता करणे ही काळाची गरज आहे.

पर्यावरणाचे व्यवस्थापन विशिष्ट प्रदेश किंवा राष्ट्र यांच्याशी मर्यादित नसून ती संपूर्ण जगाची गरज आहे.

भविष्यात मानवी समाजाच्या समन्यायक्षम उपयोगासाठी परिसंस्थांचे रक्षण करणे व परिसंस्थांतील अखंडत्व राखणे हे अनिवार्य झाले आहे.

पर्यावरण हे जैविक तसेच अजैविक घटकांपासून बनलेले असते. असे व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे.

‘पर्यावरणदक्ष’ होऊन पर्यावरण संवर्धन, संगोपन आणि संरक्षण या त्रिसूत्री चा वापर करून निसर्गाची पर्यायाने पर्यावरणाची परतफेड करण्याची हीच वेळ आहे..

‘जगा आणि जगू द्या’ हा मंत्र स्वतःपुरता न ठेवता ते या निसर्गातील आपल्या पर्यावरणातील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीसाठी लागू होतो हे विसरून कसे चालेल…?

बुद्धिमान तर आहोतच आता थोडे शहाण्या सारखे वागूया……

 

सौ. स्वाती मसुरकर
ठाणे- डोंबिवली
swatidamari@gmail.com