अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
सदैव मी तुमचा उगवता देव।
नाही मावळणार, सौम्य करीन दैव।।
आपल्या देशात, सूर्य उगवत असताना त्याला वंदन करून अर्ध्य देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. हा उगवता सूर्य दिसावा म्हणून आम्हाला त्यावेळी पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे लागते. दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून आम्हाला उगवत्या सूर्याचे दर्शन होणार नाही. भगवंताची प्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातले चार प्रमुख मार्ग श्रीसाईसच्चरित बत्तिसाव्या अध्यायात येतात. हे वेगवेगळ्या दिशांनी जाणारे मार्ग आहेत.
श्रीसाईसच्चरित अध्याय ३२ –
‘उद्धरेदात्मनात्मानं’ । हें गीतेचें घेऊनि वचन । अयुक्त सर्वथैव परावलंबन । ऐसें प्रवचन एक करी ॥३८॥ कर्ममार्ग
तया प्रत्युत्तर करी अन्य । मन स्वाधीन तोचि धन्य । असावें संकल्प – विकल्पशून्य । कांहीं न आपणावीण जगीं ॥३९॥ योगमार्ग
अनित्य सर्व सविकार । नित्य एक निर्विकार । म्हणोनि नित्यानित्यविचार । करा निरंतर तिजा वदे ॥४०॥ ज्ञानमार्ग
चवथ्या नावडे पुस्तकी ज्ञान । करूं आदरी विहिताचरण । कायावाचा पंचप्राण । करी समर्पण गुरुचरणीं ॥४१॥ भक्तीमार्ग
सूर्य पूर्वेलाच उगवत असला तरी हा त्रिविक्रम मात्र असा देव आहे की, यातल्या कुठल्याही पवित्र मार्गावर आम्ही असलो तरी उगवता देव तोच दिसतो. त्यामुळेच या कथेत आम्ही पाहतो की, वेगवेगळ्या दिशांना तोंडे असणा-या या चारही सुबुध्दांना वणजारी भेटतोच. कारण सदैव मी तुमचा उगवता देव.
काहीजण आयुष्याच्या उशीराच्या टप्प्यावर सद्गुरुंप्रत येतात. काहीजण सद्गुरूंच्या मानवी देहातील अवतारकार्याच्या उशिराच्या टप्प्यावर सद्गुरुंप्रत येतात. दोघांनाही वाटते; मला उशीर झाला, आणखी लवकर हे व्हायला हवे होते. पण ‘ जब जागो तब सबेरा ‘. कोणत्याही टप्प्यावर आलात तरी हा प्रत्येकासाठीच सदैव उगवता देवच असतो.
हेमाडपंत यांना साईनाथांनी १९१० साली शिर्डीत आणले. त्यावेळी हेमाडपंत यांचे वय ५४ वर्षे होते; तर बाबांच्या अवतार कार्याची शेवटची आठ वर्षे राहिली होती. काय फरक पडला ? हेमाडपंतांवर बाबांनी जी कृपा करायची ती केलीच आणि त्यांच्याकडून विहित कार्यही करून घेतले. असा हा आमचा सदैव उगवता देव.
निसर्गात पाहायला गेले तर काळोखाचा नाश उगवता सूर्यच करतो. त्यानंतर दिवसभरात फक्त सूर्यबिंबाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या विविध तीव्र व मध्यम अवस्था असतात.
गुरु गीतेमध्ये आपण पाहतो…
गुकारस्त्वन्धकारस्तु रुकारस्तेज उच्यते । अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥
भावार्थ :
‘गु’कार म्हणजे अंधःकार, आणि ‘रु’कार म्हणजे तेज. जो ( ज्ञानाचा प्रकाश देऊन ) अंधःकाराचा निरोध करतो, त्याला गुरु म्हणतात.
याचाच अर्थ असा की अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा, आमच्यासाठी सदैव उगवता देव हा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध!
मातृवात्सल्य विंदानम् ग्रंथात सद्गुरु श्री अनिरुद्ध सांगतात;
माझ्या प्रत्येक क्षितिजावर सदैव उदयाला येत असतो, तो दत्तगुरु व त्या प्रत्येक क्षितिजावर सदैव उषा विलसत असते, ती माझ्या प्राणप्रिय आदिमातेची अर्थात परमेश्वरी चण्डिकेची. कुठल्याही क्षितिजावर फक्त हेच आणि म्हणूनच अस्त व संध्यास्वरूप माझ्यासाठी अस्तित्वातच नाही.
परमात्मा अनिरुद्धांसाठी जसे दत्तगुरु आणि आदिमाता; तसेच आमच्यासाठी अनिरुद्ध. आमच्या प्रत्येक क्षितिजावर उगवता देव हा सद्गुरू अनिरुद्ध आहे. आणि तो कधीही मावळणार नाही हे त्याचेच वचन आहे.
श्रद्धावानांसाठी हा सद्गुरू त्रिविक्रम सदैव उगवता देव आहे. याचा अर्थ श्रद्धावानांसाठी सतत उषःकालच आहे. ही सद्गुरुकृपेची उषा आमच्यासाठी का महत्वाची ? ऋग्वेदात ‘ उषासूक्त ‘ नावाने येणाऱ्या प्रार्थनांमध्ये याचे सविस्तर उत्तर मिळू शकते. वानगीदाखल काही ओळी पाहू
ऋग्वेद – मण्डल ७ सूक्त ७५ ( उषासूक्त )
अप द्रुहः तमः आवः अजुष्टं अङ्गिरःऽतमा पथ्याः अजीगरिति ॥ १ ॥
सुप्रकाशित होऊन तिने दुष्ट, अधम, आणि तिरस्करणीय अंधकार ह्यांचा प्रथम बीमोड केला; आणि अंगिरसाना अत्यंत आदरणीय अशा ह्या उषेने सन्मार्गवर्ती लोकांना जागृत केले. ॥ १ ॥
एते त्ये भानवः दर्शतायाः चित्राः उषसः अमृतासः आ अगुः जनयन्तः दैव्यानि व्रतानि ॥ ३ ॥
दर्शनीय रूपवती जी उषा, तिचे अद्भुत आणि अविनाशी किरण पहा दिसूं लागले आहेत. देवांनी घालून दिलेले नियम आचरण्याचा पहिला धडा तेच देतात ॥ ३ ॥
ऋग्वेद – मण्डल ७ सूक्त ७६ ( उषासूक्त )
प्र मे पन्था देवऽयानाः अदृश्रन् अमर्धन्तः वसुऽभिः इष्कृतासः ॥ २ ॥
देवयानाचा मार्गसुद्धां पुढें दिसूं लागला. त्या मार्गाने जाणार्याचा कधींहि घात होत नाही. इतकेच नव्हे, तर तो उत्तमोत्तम वस्तूंनी परिपूर्ण आहे. ॥ २ ॥
हा सदैव उगवता देव आमच्या जीवनात सतत त्याच्या कृपेची उषा प्रकाशित ठेवो ही त्याच्याच चरणी प्रार्थना.
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
(क्रमशः)
-डाॅ आनंदसिंह बर्वे