समाजसेवेचा ध्यास घेऊन प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या अनिल तांबे यांना सलाम!
आमचे विद्वान आणि कृतिशील परममित्र अनिल तांबे आज `मुंबई पोर्ट ट्रस्ट’मधून पर्यवेक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. सलग एकेचाळीस वर्षे आठ महिने सेवा केल्यानंतर नोकरीतून जरी निवृत्त होत असले तरी सामाजिक क्षेत्रात अधिक समर्थपणे कार्य करण्यासाठी ते आजपासून शुभारंभ करणार आहेत; म्हणूनच त्यांना आमच्याकडून मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा!
स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण नोकरी-व्यवसाय करीत असतो. या सर्वसामान्य मार्गावरून प्रवास करताना अनिल तांबे यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकी स्वीकारून बहुजन समाजाची सेवा करते; ही गोष्ट अतुलनीय आहे.
आर्थिक समस्येपोटी जी मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना सर्वोतोपरी मदतीचा हात देऊन अनिल तांबे यांनी शेकडो मुलांना उच्च शिक्षण दिलं. कसलीही प्रसिद्धीची हाव मनी न बाळगता `आपण समाजासाठी तन-मन-धन अर्पण करून कार्य करीत राहिले पाहिजे’; हा त्यांचा स्वभाव आणि ह्या ध्यासातून त्यांची कृतिशीलता आदर्शवत अशी आहे.
सर्वात जास्त त्यांचं प्रेम आहे, ते पुस्तकांवर! असंख्य दुर्मिळ आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा-ग्रंथांचा महासागर त्यांनी आपल्या संग्रही ठेवला आहे; तसेच अनेक बहुमूल्य ग्रंथ त्यांनी अनेक वाचनालयांना भेट म्हणून दिले आहेत. फक्त पुस्तकांचे प्रदर्शन न मांडता प्रत्येक पुस्तकाचा-ग्रंथाचा अभ्यास करायला त्यांना आवडतं आणि ते संदर्भ घेऊन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय करता येईल? ह्याचा विचार करून कृती करण्याची त्यांची सवय खरोखरच प्रशंसनीय आहे. हा मनुष्य अक्षरशः ग्रंथ `जगतो’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या आधुनिक जगात पुस्तकांचे-ग्रंथांचे महत्त्व आपणास समजून येणार नाही. वाचनातून मिळणारा आनंद आणि ज्ञान; त्यापेक्षा कुठली मोठी संपत्ती असेल? ही चिरंतन टिकणारी संपत्ती अनिल तांबे यांच्याकडे आहे. ती संपत्ती जपणारा हाडामासाचा समाजसेवक म्हणून संघटनात्मक कार्य करतो, तेव्हा तो सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक आणि कार्यक्षम व्यक्तींनाही सहजपणे आपलेसे करतो. अशा असंख्य विद्वान सामाजिक बांधिलकी स्वीकारणाऱ्या आदर्श व्यक्तीशी त्यांची मैत्री आहे, घरोब्याचे संबंध आहेत. त्यातूनच त्यांनी कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्याची दखल समाजाने घेतली म्हणूनच त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात एक विद्वान वक्ता आणि कृतिशील नेता म्हणून ओळखले जाते. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी शेकडो सभा गाजविल्या. रोखठोक स्वभावाचे अनिल तांबे यांची समाजाप्रती असलेली सद्भावना खूप काही शिकवून जाते.
सिंधुदुर्ग परिवर्तन नवनिर्माण प्रतिष्ठान अर्थात `सिंपन’ प्रतिष्ठान नावाच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना पुढील तीन वर्षात शैक्षणिक क्रांती करण्याचा अनिल तांबे यांनी संकल्प केला असून दोन दिवसापूर्वी कणकवली शहरात त्यांनी जागा विकत घेतली आणि मुहूर्तमेढ रोवली. त्या ठिकाणी भव्यदिव्य असे शैक्षणिक संकुल उभे राहणार असून ज्या शैक्षणिक सुविधांची आजपर्यंत सिंधुदुर्ग अलिप्त राहिला त्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अनिल तांबे यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यात ते यशस्वी होतील.
`शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि शिक्षणाशिवाय समाज सामर्थ्यवान होत नाही!’ हा आदर्श महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांनी-विभूतींनी देशासमोर ठेवला आणि महाराष्ट्र घडविला. तोच आदर्श घेऊन अनिल तांबे यांनी कार्य केले आणि आजपासून ते पूर्णवेळ कार्य करणार आहेत.
अनिल तांबे यांच्याकडे असलेले ज्ञान, सामाजिक कार्य करण्याचा अनुभव, समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास, समाजसेवेसाठी समर्पण वृत्ती, लाखमोलाचा शुद्ध प्रामाणिकपणा आणि सामर्थ्यवान कार्यक्षमता आम्हाला नेहमी भावते. आम्हाला ह्या मित्राचा अभिमान वाटतो. त्यांच्याकडील ह्या सदगुणांचा उपयोग समाजाने करून घ्यायला हवा; असं आमचं म्हणणं आहे.
नोकरीत असतानाही गेली ४१ वर्षे त्यांनी केलेल्या कार्याला मनापासून सलाम करताना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो; तो म्हणजे त्यांनी केलेला त्याग! बहुमूल्य वेळ आणि संपत्तीचा त्यांनी त्याग केला आणि समाजाला समर्पित केला. हे त्यागी जीवन जगताना त्यांना त्यांच्या पत्नीची मिळालेली साथ दुर्लक्षित करता येणार नाही. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वहिनींनी यशस्वीपणे पेलली. मुलांना चांगले संस्कारमूल्याधिष्ठित शिक्षण देऊन, संसार सांभाळून अनिल तांबे यांच्या मागे दृढपणे त्या उभ्या राहिल्या.वहिनींनी केलेल्या त्यागालाही लाख सलाम!
बरंच काही लिहायचं आहे. भविष्यात नक्की प्रयास करू. पण अनिल तांबे यांनी आजपर्यंत केलेले कार्य अभिमानास्पद आहे आणि आजपासून अधिक समर्थपणे कार्य करण्यास शुभारंभ करणार आहेत. त्यांच्या कार्याला आमचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा!
– सुरेश डामरे / -नरेंद्र हडकर