डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – थावरचंद गहलोत

नवी दिल्ली:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे, विशेषत: त्यांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी काल येथे केले.

नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातील भीम सभागृहात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या ‘डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान’च्या वतीने वर्ष २०१७ च्या ‘डॉ. आंबेडकर गुणवत्ता’ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारोह आज आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, विजय सांपला, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव रश्मी चौधरी, डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे संचालक डी.पी. मांझी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील एकूण ६ विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी श्री. गहलोत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी दशेतील जीवनात अतिशय संघर्षरथ होता. शाळेच्या बाहेरील पायरीवर बसून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांना तत्कालीन परिस्थतीशी खूप झटावे लागले. हार न पत्करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. जगातील निवडक उच्च विद्या विभूषित व्यक्तीमत्वांमध्ये आज त्यांचा नावलौकिक आहे. श्री. गहलोत म्हणाले, बाबासाहेबांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर आजची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय जल आयोग अशा कितीतरी संस्था कार्यरत आहेत.

पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना उद्देशून श्री.गहलोत म्हणाले, बाबासाहेबांचा आर्दश सदैव डोळ्यापुढे, ठेऊन भविष्याची वाटचाल करावी. बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देशबांधणीसाठी, देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी केलेला आहे. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या संविधानामुळे आज सर्वांना शिक्षण घेता येत आहे. त्याचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन श्री.गहलोत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

देशभरातील सर्वच राज्यातील अनुसूचित जाती-जमातीतील गुणवत्ता मिळविणाऱ्या एकूण १९० विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये १०४ विद्यार्थी दहावीचे तर ८६ हे बारावीचे होते. महाराष्ट्रातील एकूण ६ विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. प्रथम पुरस्काराच्या स्वरूपात ६० हजार रूपये रोख, व्दितीय ला ५० हजार रूपये रोख तसेच तृतिय पुरस्काराला ४० हजार रूपये रोख देण्यात आले. या सोबतच प्रशस्ती पत्र, भारतीय संविधानाची प्रत आणि एक पुस्तक प्रदान करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातून दोन विद्यार्थींनींना दहावीत उत्तम गुण मिळविले आहे. त्यांना आज गौरविण्यात आले. नुपूर गायकवाड या विद्यार्थीनीला दहावीमध्ये ९९ टक्के गुण मिळाले. तर नांदेड जिल्ह्याचीच हातगाव तालुक्यातील किरण रामकृष्ण इटूबोने या विद्यार्थीनीने दहावीमध्ये 98 टक्के मिळाले. तसेच मुंबई आयसीएसई बोर्डमधून प्रथम आलेला आदित्य तुळशीराम अनंतवार या विद्यार्थ्यांला ९७.८३ टक्के दहावीत प्राप्त झाले आहेत. या तिन्ही विद्यार्थ्यांना आज पुरस्कृत करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील तन्मय रमेश शेंडे हा विज्ञान शाखेतील विद्यार्थी बारावीत अनुसूचित जातीमधून महाराष्ट्रातून प्रथम आला. त्याला ९७.२३ टक्के प्राप्त झाले. सध्या तो वैद्यकिय अभ्यासक्रम करीत आहे. बुलढाणा जिल्ह्याची जयश्री जानराव तायडे या वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनीला बारावीमध्ये ९३.६९ टक्के प्राप्त झाले. तसेच लातूर जिल्ह्यातील रजनी गायकवाड या कला शाखेतील विद्यार्थींनीला बारावीमध्ये ९३.३८ टक्के मिळाले यांना आज गौरविण्यात आले. या दोन्ही विद्यार्थीनींना भारतीय प्रशासकीय सेवेत यायचे असून त्यांनी आतापासून अभ्यासही सुरू केल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *