अभ्यासू जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर ह्यांची एक्झिट दुःखदायक!
काल एक दु:खदायक बातमी आली. असलदे गावातील जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अभ्यासू-चिकित्सक पत्रकाराच्या विचाराला आपण मुकलो.
पत्रकारिता हा काही व्यवसाय किंवा धंदा होऊ शकत नाही, पत्रकार ही काही नोकरी होऊ शकत नाही. ते एक व्रत आहे; असे आम्ही गेली पंचवीस वर्षे मानतो आणि असे व्रत पाळणारे किसन वायंगणकर ह्यांनी केलेली पत्रकारिता खरोखरच आदर्शवत होती. गेली पस्तीस वर्षे त्यांनी केलेल्या पत्रकारितेला मानाचा मुजरा करावाच लागेल; कारण त्यांनी आपल्या अनुभव विश्वाच्या सीमा प्रचंड वाढविल्या होत्या व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्वात व लिखाणात दिसत होते.
देशभरात प्रवास आणि वाचन ह्या दोन गोष्टी करताना अनेक नामवंत साहित्यिक त्यांच्या सहवासात आले, अनेक समाजसेवकांबरोबर त्यांनी कार्य केले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्या ह्या व्रताला सुरुवात झाली. तेथूनच त्यांचा अनुभव सिद्धीत्वास पोहोचला. त्याला अफाट वाचनाची जोड मिळाली. त्यातूनच त्यांच्या पत्रकारितेचे विश्व फुलले. पत्रकाराचे अनुभव विश्व मोठे असायला हवे. पत्रकाराने नित्यनियमाने खूप वाचन करायचे असते. समाजातील सामान्य ते असामान्य लोकांशी मित्रत्वाचे संबंध ठेवायचे असतात आणि जनतेच्या समस्यांची जाण असावी लागते. जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारी अधिकाऱ्यांशी कधी सौम्यपणे तर कधी कठोरपणे वागावे लागते. अधिकाऱ्यांचे एजंट म्हणून काम करायचे नसते. ही आदर्श पत्रकारितेची विशेषतः आपण किसन वायंगणकर यांच्या रूपाने पहिली. त्यांची अनेकवेळा भेट व्हायची; तेव्हा खूप चर्चा व्हायची. `सर्वसामान्यांच्या हितासाठी पत्रकाराने लढायचे असते’ हा त्यांचा गुण त्यांचं मोठेपण प्रकट करायचा.
वर्तमानातील पत्रकारिता ही किसन वायंगणकर यांच्या चौकटीत बसणारी नव्हती. कारण त्यांनी स्वतंत्र पत्रकारिता करण्याचा जो प्रयास केला; तोही कौतुकास्पद होता. महाराष्ट्रामध्ये प्रथम रंगीत दैनिक सुरु करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे हे धाडस सह्याद्रीसारखे वाटते. नेहमी नोकर वर्गासारखी पत्रकारिता करणारे पत्रकार आणि स्वतःचे वर्तमानपत्र काढण्याचे धाडस करून स्वतंत्र विचार करून लिखाण करणारे पत्रकार ह्यामध्ये खूप फरक असतो. तो फरक मला त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहून व्हायचा.
ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाबाबत किसन वायंगणकर यांचे विचार अनमोल होते. मागील काही वर्षे ते असलदे निवासस्थानी राहायचे. त्यांचा नांदगाव पंचक्रोशिचा सामाजिक-राजकीय अभ्यास अधिक चांगला परिपक्व होता. ग्रामीण भागामध्ये कार्य करताना प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे दोन गुणच उपयोगी पडतात; अन्यथा ग्रामीण भागात राजकारणाच्या गजकरणात विकासाचा खेळखंडोबा होईल व स्वार्थी राजकारण्यांची चांदी होईल; अशी त्यांची स्पष्ट मते होती. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते अलिप्त राहायचे; पण त्यांचे मन नेहमीच सकारात्मक विकासाचे विचार करायचे; असे मला त्यांच्या भेटीत जाणवायचे. प्रकृतीने जर त्यांना साथ दिली असती तर नांदगाव पंचक्रोशीत अनेक चांगल्या योजना अस्तित्वात आल्या असत्या. तरीही ते सामान्यांना मदत करीतच होते. त्यांच्याकडे समाजपयोगी अनेक उपक्रम असायचे.
स्वर्गीय वसंत वायंगणकर यांचे ते व्दितीय पुत्र. नांदगाव पंचक्रोशीत मास्तरांनी जो आदर्श घालून दिला; त्या आदर्शाच्या मार्गावरून किसन वायंगणकर यांनी प्रवास केला. वायंगणकर मास्तरांना आम्ही पाहिले, त्यांच्याशी त्यावेळी बोलण्याचा योग आला. त्यांचा शांत-सोज्वळ स्वभाव समोरच्या व्यक्तीला जिंकून घ्यायचा. त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांचा व्यापार आणि वागणूक स्वच्छ सफेद. ते कधी `व्यापारी’ वृत्तीने लोकांशी वागले नाहीत आणि पैशासाठी गैरव्यवहार-गैरधंदा केला नाही. असं कार्य वायंगणकर मास्तरांनी केलं आणि हाच आदर्श ठेऊन किसन वायंगणकर यांनी पत्रकारिता केली.
किसन वायंगणकर यांच्या अचानक जाणं दुःखदायक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, ही परमात्म्या चरणी प्रार्थना!