१००० गावांच्या परिवर्तनासाठी विविध संस्थांबरोबर राज्य शासनाचे ६१ करार
शासन व संस्थांच्या भागीदारीने महाराष्ट्रात महापरिवर्तन घडणार – मुख्यमंत्री
मुंबई:- राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्यासाठी आज राज्य शासनाचे विविध विभाग, ‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन’ आणि विविध सामाजिक संस्था, कंपन्या व व्यक्तींबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६१ सामंजस्य करार करण्यात आले तर १२ इरादापत्र (लेटर ऑफ इंटेट) देण्यात आले. शासनाची व्यापकता व संस्थांकडील कौशल्य यांच्या सहयोगाने महाराष्ट्रात महापरिवर्तन घडून येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुल येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करण्यासाठी संस्थांबरोबर करार करण्यात आले. यावेळी ‘आरे भूषण’ या व्हिटामीन डी फोर्टिफाईड दुधाचे व डबल फोर्टिफाईड मिठाचे लोकार्पण, फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे अनावरण व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आरोग्य बँक उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी हंस फाउंडेशनच्या वतीने व्हिलेज सोशल फाउंडेशनला १० कोटी रुपयांचा धनादेश लेफ्टनंट जनरल एस. एम. मेहता यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने एक हजार गावांचे संपूर्ण परिवर्तन करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत राज्यातील १ हजार गावे मॉडेल गावे म्हणून तयार करणार असून या गावांमध्ये देशातील सर्वोत्तम सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाबरोबरच विविध संस्था, संघटना, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधी व स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांचा सहभाग घेण्यात येत आहे. आरोग्य, जलसंधारण, पोषण, कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रात काम करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील विविध संस्था, संघटनांच्या मान्यवर प्रतिनिधींनी आपला अमूल्य वेळ व पैसा यासाठी दिला आहे. यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. या सगळ्यांनी मिळून एकत्र येत नवीन भागीदारी तयार केली आहे. यामुळे सामान्यातील सामान्य माणसाला मदत होत आहे.
राज्यातील आदिवासी, मागास, दुष्काळी भाग, शेती संकटात असलेला भाग अशा सर्व भौगोलिक क्षेत्रात या भागीदारीतून काम करण्यात येत आहे. यामुळे शासकीय कामकाजात संसाधनांचा कार्यक्षम वापर, मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच तंत्रज्ञानाधारित नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आहे. सरकार, समाज व संस्था, कंपन्या एकत्र आल्यामुळे सकारात्मक परिवर्तन घडत आहे. त्यातून पुढील दोन-तीन वर्षात बदललेला महाराष्ट्र दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
आजचा कार्यक्रम हा आगळावेगळा असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीत एकाचवेळी ६१ सामंजस्य करार, १२ इरादापत्र आणि ४ नवीन उपक्रमाचे उद्घाटन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गावांच्या विकासासाठी करण्यात आलेले हे सर्व सामंजस्य करार फलद्रुप होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते. श्री. परदेशी यांनी ‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन’विषयी माहिती दिली.
यावेळी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजचे (एमसीएक्स) मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगांक परांजपे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक उन्नतीसाठी राज्य शासनाने मोठे कार्य हाती घेतले आहे. या कामासाठी हातभार लावावा म्हणून एमसीएक्सच्या वतीने कॉटन मिशन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवणे, उत्पादन वाढीसाठी मदत करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भारत फोर्जचे बाबा कल्याणी म्हणाले की, राज्य शासन गावांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. या गावांच्या विकासासाठी भारत फोर्जच्या वतीने सहभाग घेण्यात येणार आहे. या कामासाठी जनसहभाग महत्त्वाचा असून त्यातूनच ही योजना यशस्वी होणार आहे.
इएलएमएस स्पोर्टच्या विटा दाणी म्हणाल्या की, ऑलम्पिक स्तरावरील टेबल टेनिस खेळाडू तयार होण्यासाठी राज्य शासनाला मदत करण्यात आनंद होत आहे. त्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी करून आंतरराष्ट्रीय खेळाडूमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संस्थांसोबत झाले करार
टाटा ट्रस्ट, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मल्टि कमोडिटी एक्स्चेंज, सेव्ह लाईफ फाऊंडेशन, जे-पाल, दक्ष संस्था, रोटरी इंटरनॅशनल, ल्युपिन फाऊंडेशन, मुकुल माधव फाऊंडेशन, स्पाईन फाऊंडेशन, भन्साली ट्रस्ट, डॉ.अनुराधा मालपाणी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. जयश्री तोडकर, गॅलेक्सी केअर लॅप्रोस्केपी इन्स्टिट्यूट, द डायजेस्टिव्ह, डॉ. रणजित जगताप, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट, प्रेरणा हेल्थ केअर, नॅस्कॉम फाऊंडेशन, ओला फ्लिट टेक्नॉलॉजी, मारिको लि., रॅलिज इंडिया, भारतीय जैन संघटना, संहिता (कलेक्टिव्ह गुडस् फाऊंडेशन), हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी, केजे बजाज फाऊंडेशन, नानाजी देशमुख प्रतिष्ठान, नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस, पार्ले ॲग्रो, मायलान लि., बाँबे स्टॉक एक्चेंज, मॅजिक बस, डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन, एमकेसीएल, महाराष्ट्र सहकारी महामंडळ, हंस फाऊंडेशन, रत्नाकर बँक, पो-सेरा, जॅन्सन इंडिया, रेकिट बेनस्किसर, ग्लानबिया, विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थांबरोबर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य, महसूल, कृषी, कौशल्य विकास, ग्राम विकास, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण आदी विभागांनी सामंजस्य करार केले.
आठ संस्थांनी दिले इरादापत्र
यावेळी ८ संस्थांनी विविध क्षेत्रात काम करण्यासंदर्भातील इरादापत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. यामध्ये भारत फोर्ज (सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील १०० गावे मॉडेल व्हिलेज), ईएलएमएस स्पोर्ट फाऊंडेशन (टेबल टेनिस साठी सेंटर ऑफ एक्स्लन्स), नॅस्कॉम फाऊंडेशन (सार्वजनिक ग्रंथालयांचे सक्षमीकरण), शांतीलाल मुथा फाऊंडेशन (एक लाख शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम), मुकुल माधव फाऊंडेशन (खडकवासला धरणातील गाळ काढण्यासाठी सहकार्य व आरोग्य सेवा), टाटा ट्रस्ट (गडचिरोलीमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकघराची उभारणी व १०० अतिरिक्त गावांचा विकास), डीएचएफएल (राज्यातील युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण व बालकांचे संगोपन विषयक काम), स्पाईन फाऊंडेशन (रत्नागिरी, नंदूरबार व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयांचा विकास), इंडिया सॅनिटेशन कोलीजन (लातूर शहरात सार्वजनिक शौचालय निर्मिती) या संस्थांचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत 21 सामंजस्य करार
ग्रामीण भागासाठी आरोग्य बॅंक ; वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आज विविध उपचारांसाठी 21 सामंजस्य करार करण्यात आले.
यात मॉडेल टीबी केअर इन धुळे डिस्ट्रिक्ट, थ्रू जीएमसी, धुळे, प्रोवायडिंग पेडियाट्रिक सर्जरी सर्व्हिसेस इन जीएमसी ऑन होनरी बेसिस, डेव्हलपिंग रिजनल स्पाइन केअर सेंटर इन जीएमसी (अंबेजोगाई, अकोला, धुळे),लॉन्चिंग मॉडेल ऑर्गन डोनेशन प्रोग्राम इन महाराष्ट्र, कन्स्ट्रक्शन ऑफ स्पाइन अँड ट्रॉमा केअर सेंटर इन जीएमसी, नागपूर, स्टार्टिंग फेलोशीप फॉर स्पेशलाइझ ट्रेनिंग इन ह एनएफ कॅन्सर सर्जरी कॅन्सर केअर फॉर फॅकल्टी फ्रॉम जीएमसी, प्रोवायडिंग सर्व्हिसेस टू चिल्ड्रन्स विथ सेरेब्रल पल्सी/ मेंटल रे टार्डेशन आयडेंटिफड थ्रू जीएमसी, कण्डक्टींग कॅटारॅक्ट सर्जरी कॅम्प्स इन नंदूरबार अँड गडचिरोली डिस्ट्रिक्ट अंडर कॅटरॅक्ट फ्री महाराष्ट्र मिशन, डेव्हलपिंग एनआयसीयू एट यवतमाळ जीएमसी एज सेंटर ऑफ एक्सलेन्स, सेटिंग अप सेंटर फॉर मेडिकल इंनोवेशन अँड इंटरप्रेनेआर शिप अँड लायब्ररी इन जे जे मेडिकल कॉलेज, सेटिंग अप सिकले सेल, स्टेम सेल थेरपी सेंटर इन जीएमसी नागपूर, एस्टॅब्लिशिंग युरो – गायनॅकॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलेन्स इन कामा हॉस्पिटल, प्रोवायडिंग पेडियाट्रीक कर्डियाक सर्जरीज टू ४०० पेशंटस् एवरी इअर, प्रोवायडिंग प्रो बोनो टेकनिकल अँड लिगल हेल्प फॉर स्ट्रीमलीनींग दि फंक्शनिंग ऑफ दि महाराष्ट्र फूड अँड ड्रग अडमिनीस्ट्रेशन, स्टार्टिंग फेलोशीप फॉर स्पेशलाइझड् ट्रेनिंग इन कॅन्सर केअर फॉर फॅकल्टी फॉर जीएमसी, एस्टॅब्लीशिंग महाराष्ट्र चाप्टर ऑफ दि नॅशनल कॅन्सर ग्रीड फॉर कम्प्रेहेंसिव कॅन्सर कंट्रोल केअर इन महाराष्ट्र ,कण्डक्टिंग १००० कॅन्सर सर्जरीज ओवर २ इअर फॉर नीडी पेशंट्स आयडेंटीफाईड थ्रू महा आरोग्य मेला, कण्डक्टिंग १००० मेटाबोलिक डीसीज सर्जरीज ओवर २ इअर फॉर निडी पेशंट्स आयडेंटीफाईड थ्रू महा आरोग्य मेला, कण्डक्टिंग १००० कर्डिएक डीसीज सर्जरीज ओवर २ इअर फॉर निडी पेशंट्स आयडेंटीफाईड थ्रू महा आरोग्य मेला, कण्डक्टिंग १००० कॅन्सर सर्जरीज ओवर २ इअर ऑफ नीडी पेशंट्स आयडेंटीफाईड थ्रू महा आरोग्य मेला, कंडक्टींग १००० पेडियाट्रिक कर्डिएक सर्जरीज ऑफ नीडी पेशंट्स आयडेंटीफाईड थ्रू महा आरोग्य मेला यांचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्याच बरोबर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आरोग्य बॅंक सुरु करण्यात येत आहे. आरोग्य मित्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासंबधी जनजागृती करण्यात येणार आहेत. (‘महान्यूज’)