कोल्हापूर जिल्हयात जलयुक्त शिवारने १७९ गावे बहरली

कोल्हापूर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार अभियान गतीमान करुन टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात उतविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच अभियानाव्दारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सक्रीय योगदानामुळे कोल्हापूर जिल्हयात गेल्या चार वर्षात १७९ गावांमध्ये जलसंधारणाची १ हजार ८३५ कामे पूर्ण करुन जवळपास ७ हजार १८ टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण केल्याने टंचाईग्रस्त भागातील शेतीला शाश्वत पाणी मिळाल्याने शेती बहरली आहे.

टंचाईवर कायमस्वरुपी उपाय म्हणून राज्य शासनाने गेल्या चार वर्षापूर्वी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने आज खऱ्या अर्थाने बाळसं धरलं आहे. या अभियानाद्वारे गावागावात जलसाठे निर्माण करुन दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्याच्या दिशेनं आज संपूर्ण महाराष्ट्र झपाटून कामाला लागला आहे. यामुळे टंचाई काळातही टंचाईवर काही अंशी मात करणे शासनास शक्य झाले आहे. हेच जलयुक्त शिवार अभियानाचे यश म्हणावे लागेल. जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देऊन इ.स. २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याच्या दिशेने राज्य शासनाने टाकलेले हे दमदार पाऊल आहे.

विविध कारणांनी राज्यात सतत उद्भवणारी टंचाई परिस्थिती, त्यामुळे कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम तसेच दरवर्षी कमी कमी होऊ लागलेली भूजलाची पातळी या साऱ्या गोष्टींचा विचार करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षापासून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणी टंचाईवर मात करणे आता शक्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानास राज्यातील जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आज गावागावात शाश्वत जलसाठे निर्माण होऊन शेती बहरली असून शेतकरी सुखावला आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्यामाध्यमातून जिल्ह्यातील १७९ गावामध्ये पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेतील वाढीमुळे शाश्वत शेतीचा मार्ग सुकर झाला आहे. कित्येक गावात पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे घेतली असून बंधारे, गावतलाव, वनतळी, पाझरतलाव, मातीबांध तसेच सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता शासन योजना आणि लोकसहभागातून वाढविण्यात आल्याने आज गावागावात शाश्वत जलसाठे दिसू लागले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व यंत्रणा आणि लोकसहभागातून गतिमान केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात गेल्या चार वर्षात १७९ गावांची निवड करुन या गावांमध्ये ४८ कोटी ७६ लाख खर्चाची १ हजार ८३५ कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात ७ हजार १८
टी.सी.एम. पाणीसाठा होऊ शकला, त्यामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रातही बागायती शेती बहरली असून शेती उत्पादनात मोठी वाढ होऊ शकली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या वर्षी जिल्ह्यातील ६९ गावामध्ये ३० कोटी ३८ लाख रुपये खर्चून १ हजार २१२ कामे पूर्ण केली आहेत. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील २० गावांमध्ये ४६१ कामांसाठी २२ कोटी २ लाखाचा आराखडा तयार केलेला असून ४६१ कामे पूर्ण केली असून १७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील १८ गावे निवडलेली असून २१५ कामे प्रस्तावित असून
त्यापैकी १६२ कामे पूर्ण असून १३ कामे प्रगतीपथावर आहेत व १ कोटी ३१ लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. चौथ्या वर्षी ७२ गावांची निवड करण्यात आली असून गावपातळीवर गावआराखडे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कृषि, लघुसिंचन जलसंधारण, जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा, सामाजिक वनीकरण, वनविभाग, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अशा विविध कामांचा समावेश आहे. याशिवाय या अभियानासाठी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी आणि सिद्धी विनायक न्यास, मुंबई या संस्थाकडूनही मोठा निधी उपलब्ध झाला असून या निधीतूनही जलयुक्त शिवार अभियानाची कामे हाती घेतली आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबवून शाश्वत शेतीसाठी जवळपास ७०१८ टी.सी.एम. पाणीसाठा उपलब्ध करण्यात शासन यंत्रणाबरोबरच स्वयंसेवी – सेवाभावी संस्था आणि गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष लोकसहभागास अनन्यसाधारण महत्व आहे.

एस.आर.माने- जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर, (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *