चला तंबाखुमुक्त आपला भारत करुया, त्याला सशक्त आणि सक्षम बनवुया!
भारतासारख्या विकसनशिल देशामध्ये बऱ्याच समस्या असताना तंबाखुचा वाढता वापर ही समस्या देशाला विळखा घालतेय ही अतिशय चिंताजनक बाबा ठरली असून ही समस्या सोडविण्यासारखा ज्वलंत प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. मृत्यूची एकंदरीत आठ कारणे पाहता त्या आठ प्रमुख कारणांपैकी तंबाखू एकूण सहा कारणांसाठी जबाबदार आहे. भारतात प्रत्येक वर्षी किमान आठ ते दहा लाख लोकांचा तंबाखुमुळे मृत्यू होतो. तंबाखुमळे होणाऱ्या मौखीक कर्करोगामध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. मौखिक कर्करोग तसेच इतर कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, क्षयरोग, मोतीबिंदू, पक्षाघात धुम्रपान करणाऱ्या ८५ टक्के लोकांमध्ये आढळणारे नपुंसकत्व हे सर्व तंबाखुशी निगडीत आहे. हे झाले प्रत्यक्ष धुम्रपान ज्यामध्ये धुम्रपान करताना ३० टक्के धुर स्वतःच्या शरिरामध्ये घेतला जातो व उर्वरित ७० टक्के धूर आजुबाजूच्या वातावरणात सोडला जातो. आजुबाजूच्या व्यक्ती, लहान मुले या अप्रत्यक्षरित्या केलेल्या धुम्रपानाला बळी पडताना दिसून येतात.
तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना निष्क्रिय धुम्रपानापासून वाचवण्यासाठी भारत सरकारने सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (२००३) सुरु केला. सन २००८ मध्ये आपल्या महाराष्ट्रात गुटखा बंदी केली गेली. तसेच केंद्र शासनाने जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखू नियंत्रणासाठी प्रमाणित आकृतीबंध २००४ ला मान्यता दिली असून त्या अंतर्गत देशात तंबाखूची मागणी व पुरवठा कमी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (एनटीसीपी) सन २००८ मध्ये २१ राज्यांच्या ४२ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. जीवनात आजुबाजूच्या सतत घडणाऱ्या बदलास तो सामोरा जात असतो. जे काही वाईट बदल असतात ते काही वेळा तो स्वीकारतो तर काही वेळा नाकारतो. एखादी व्यक्ती जेव्हा तो बदल समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी स्वीकारतो तेव्हा राष्ट्राचा विकास होत जातो. आज भारतातील बराचसा तरुण, सुशिक्षीत वर्ग व्यसनाच्या आहारी जाताना दिसून येतो. आजची तरुण पिढी जर व्यसनापासून लांब राहिली तरच भारताला विकसनशील देशाकडून विकसीत देशाकडे वाटचाल करता येईल.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर बोलावयाचे झाल्यास सर्वात प्रथम तंबाखूचे उत्पादन व पुरवठा नियंत्रित करणे महत्वाचे आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची आयात व निर्यातीवर कायद्याने पूर्णपणे बंदी आणली गेली व जे लोक तंबाखूच्या शेती व्यवसायात गुंतले आहेत. अशा लोकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करुन दिला गेला तर जास्तीत जास्त प्रमाणात तंबाखू उत्पादनावर नियंत्रण केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायदा (२००३) याची पूर्णपणे अंमलबजावणी केली गेली तर बऱ्याच प्रमाणात विक्री व पुरवठा या गोष्टींवर आळा बसेल.
शासकीय स्तरावर प्रभावी यंत्रणा असली पाहिजे, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी, जसे की, शाळा, कॉलेज, बस, रेल्वे स्थानक, शासकीय व अशासकीय कार्यालये तसेच इतर कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी धुम्रपानास पूर्णपणे बंदी आणली जाईल. देशातील प्रत्येक नागरिक निरोगी होण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन अधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य यंत्रणा या सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम केले पाहिजे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दूष्परिणांमांबाबत स्वतः माहिती करुण घेणे व इतरांना सांगून त्याबद्दल जनजागृती करणे महत्वाचे आहे. त्यासाठी ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, २० मार्च मौखिक आरोग्य दिन, ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन तसेच ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन शासकिय स्तरावरून राबविले जातात. पण हे दिवस अजून प्रभाविपणे राबविणे गरजेचे आहे. तंबाखू व्यसनाची तीव्रता त्यामुळे होणारे शारिरीक दुष्परीणाम हे सर्व स्तरावर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, जेणेकरुन तंबाखुचे व्यसन करण्यास भिती निर्माण होईल व माणूस त्यापासून दूर राहिल. तंबाखुमुक्त शाळा या संकल्पनेतून शालेयस्तरावर व्यसनांचे दूष्परिणाम मुलांच्या मनावर बिंबवले गेले तर उद्याची भावी पिढी नक्कीच निर्व्यसनी असेल. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर भारत तंबाखूमुक्त करायचा असेल तर स्वतः तंबाखुमुक्त होणे गरजेचे आहे. तंबाखुमध्ये असणारा निकोटीन हा सर्वात विषारी रासायनिक घटक, जो तंबाखुची सवय लावण्यास कारणीभूत ठरतो त्यामुळे तंबाखुवरील व्यक्तीचे शारिरीक व मानसिक अवलंबित्व वाढते आणि माणूस व्यसनी बनतो.
तंबाखू सोडणे ही काही सोपी बाब नाही. त्यासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे. तंबाखुपासून मुक्त होण्यासाठी स्वतः सकारात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढवला गेला पाहिजे. जर स्वतः तंबाखूच्या व्यसनातून बाहेर पडण्यास शक्य नसेल तर व्यसनमुक्ती केंद्र, वैद्यकीय उपचार यांची मदत नक्कीच घेता येईल. तंबाखुच्या व्यसनात अडकलेल्या जीवनातून तर तंबाखू कायमचा वजा केला तर कितीतरी चांगले फायदे होतील. पैशाची बचत होईल, शारिरीक क्षमता वाढेल, आरोग्य सुधारेल, कुटुंबात आनंदी वातावरण राहिल. कुटुंबातील लोकांची अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे होणारी हानी वाचेल. आज तंबाखू उत्पादनावर व पुरवठ्यासाठी जेवढा पैसा खर्च होतो त्याहून कितीतरी पटीने जास्त पैसा तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या रोगांवर खर्च होतो. या सर्व गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत. गरज आहे ती फक्त तंबाखूपासून दूर राहण्याची. यासाठी प्रत्येकाने स्वतः तंबाखू तसेच इतर व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे व कुटुंबाला दूर ठेवले पाहिजे. जर प्रत्येक कुटुंबातल्या एका जरी व्यक्तीने असे ठरविले तरी प्रत्येक कुटुंब पर्यायी आपला भारत देश तंबाखूमुक्त देश म्हणून यशस्वीरित्या वाटचाल करु शकेल.
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करुया की, मी स्वतः तंबाखूपासून दूर राहिन व माझ्या कुटुंबाला पण तंबाखूपासून दूर ठेवेन आणि माझ्या भारत देशाला तंबाखुमुक्त बनवेन.
“चला तंबाखुमुक्त आपला भारत करुया,
त्याला सशक्त आणि सक्षम बनवुया”
– डॉ. पौर्णिमा संतोष बिद्रे (दंतशल्य चिकित्सक)
जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
जिल्हा सिंधुदुर्ग. (‘महान्यूज’)