जाणून घ्या… पावसाळ्यात वीज का जाते?
पावसाळ्याच्या सुरूवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त घडतात. वीज पुरवठा खंडित झाल्यास आपण वीज कंपनीचे वाभाडेच काढतो. विजेमुळे कुणाची किती आणि कशी गैरसोय झाली याबद्दल वृत्तपत्रांतूनही बरेच काही लिहले जाते. परंतु, वीज का गेली ? का जाते ? या प्रश्नाचे उत्तर कोणीही शोधत नाही.
विजेची यंत्रणा अशी आहे की ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. मोबाईल किंवा घरगुती फोनचे तसे नाही त्याचे एकदा कनेक्शन घेतले की त्याची सेवा संबंधीत कंपनीला एका ठिकाणी बसून चालू अथवा बंद करता येते. तीही धोक्याशिवाय. वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे. जर रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात येत असेल तर कोणीतरी भर पावसात किंवा अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलवर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे या वीज यंत्रणेवर निव्वळ दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे. जेणेकरुन आपले गैरसमज होणार नाहीत.
पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (Grid) देशात सर्वदूर पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होवून त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी-कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात. तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरताही मर्यादित असतो.
पावसाळ्याच्या सुरूवातीला वादळ-वारा व आकाशातील विजेचा कडकडाट सर्वांनीच अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्हीमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ते जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.
दुसरी बाब म्हणजे वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम झालेले असतात. त्यातच त्यावर पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होवून फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर हा फिडर बंद पडला नाही तर जीवित अथवा वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते.
जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. वेळप्रसंगी बंद पडलेल्या वाहिनीचे सर्व खांब चढून तपासावे लागतात. तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो.
चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच जनमित्राला खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारच्या काळज्या घेवूनही वीज कर्मचारी प्राणांकित अपघातात बळी पडल्याच्या घटना अधून-मधून घडतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की एखाद्याच्या जीवनाचे मोलही आपण ध्यानात घेत नाहीत, असो. तर वीज जाते अन् येते यादरम्यान काय होते ? याचा विचार आपण जेव्हा करु त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाहीत हे नक्की.
वीजपुरवठा खंडित झाल्यास पाच ते दहा मिनिटे थांबून महावितरणच्या टोल फ्री क्रमांकाला फोन करावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंपनीने 1912, 1800 233 3435 व 1800 102 3435 अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर चोवीस तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यामार्फत पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण केले जाते. टोल फ्री क्रमांक वीजबिलावर छापलेले असतात. महावितरणच्या मोबाईल अॅपमधूनही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात.
वीजपुरवठा जाण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. परंतु कारणे शोधण्यापेक्षा वीज गेल्यास काय करावे अन् काय करु नये याची व पावसाळ्यात विजेबाबत घ्यावयाची काळजी यासंबंधीची माहिती थोडक्यात…
*आपल्या घरात ईएलसीबी स्वीच (Earth Leakage Circuit Breaker) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.
*अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
*वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून, किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
*वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
*विद्युत खांबाला व ताणाला (stay) जनावरे बांधू नयेत.
*विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नयेत.
*वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.
*बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.
*विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी.
*नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीजमिटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.
-विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कोकण परिमंडल. (‘महान्यूज’)