जाती भेदाच्या भिंती पुसट-सर्वाधिक आंतरजातीय विवाह महाराष्ट्रात

महाराष्ट्रात सन २०१२ ते २०१७ पर्यंत २० हजार ४७५ आंतरजातीय विवाह

नवी दिल्ली:- जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सन २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत सर्वाधिक २० हजार ४७५ आंतरजातीय विवाह महाराष्ट्रामध्ये झाले आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे नवीन आयुष्य सुलभ व सुकर होण्यासाठी आर्थिक सहाय्यता पुरविली जाते. यामध्ये मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. ही आर्थिक मदत नागरी हक्कांचे संरक्षण याअंतर्गत प्रदान करण्यात येते.

वर्ष २०१२-१३ मध्ये महाराष्ट्रात एकूण ४ हजार ६८२ आंतरजातीय विवाह झालेले आहेत. वर्ष २०१३-१४ मध्ये ४ हजार ९७१, तर २०१४-१५ या वर्षात ४ हजार २८३, वर्ष २०१५-१६ मध्ये ३४०५ विवाह तर २०१६-१७ मध्ये ३ हजार १३४ इतके आंतरजातीय विवाह संपन्न झाले आहेत. वर्ष २०१२ ते १७ मध्ये एकूण २० हजार ४७५ आंतर जातीय विवाह महाराष्ट्रात झालेले आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ केरळ या राज्यात आंतरजातीय विवाह जास्त झाले आहेत. वर्ष २०१२-१३ मध्ये २१८९, वर्ष २०१३-१४ मध्ये २१८४, वर्ष २०१५-१६ मध्ये २१३१, वर्ष २०१५-१६ मध्ये १७९०, वर्ष २०१६-१७ मध्ये १४६६ असे आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष २०१२ ते २०१७ मध्ये एकूण ९ हजार ७६० आंतर जातीय विवाह झाले आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यावर संबंधित नवदापत्याने त्यांच्या जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीचे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून निर्धारित केलेला निधी त्यांना दिला जातो.

वर्ष २००६ पासून केंद्राकडून ५० हजार रूपये रकमेची आर्थिक मदत नवविवाहितांना केली जाते. ही मदत रक्कम वाढवून २०१७-१८ मध्ये केंद्र शासनाने १ लाख २५ हजार रूपये केलेली आहे. राज्य सरकारांनी १ लाख २५ हजार रूपये एवढा निधी अथवा त्यापेक्षा अधिक निधी दिल्यास केंद्र शासनाची हरकत नाही. नवोदित विवाहितांनी त्यांच्या आयुष्याची सुरूवात आनंदाने करावी आणि समाजात समता निर्माण व्हावी, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *