मच्छिमार सुरक्षा संदेश- भारतीय तटरक्षक दलाची मोटारसायकल रॅली!
मुंबई:- मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात घ्यावयाच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या मुंबई-गोवा-मुंबई मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. समुद्रतटीय जिल्ह्यांमधील युवक-युवतींनी तटरक्षक दलाच्या भरती प्रक्रियेची माहिती देण्यासह प्रोत्साहित करण्याचे कामही या रॅलीदरम्यान होणार आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्डस्) वरळी येथील मुख्यालयातून २५ मोटारसायकल स्वारांसह १५ मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ आज झाला. या रॅलीच्या आयोजनामध्ये कोस्ट गार्डसह राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, सीमा सुरक्षा दल, ओएनजीसी आदींनी सहभाग घेतला आहे. रॅलीच्या शुभारंभप्रसंगी कोस्ट गार्डस् कमांडर (पश्चिम विभाग) महानिरीक्षक विजय चाफेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, मँग्रुव्हज सेलचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.वासुदेवन, सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त ओ. पी. पांडे, ओएनजीसीचे समूह महाव्यवस्थापक आर. के. शर्मा आदी उपस्थित होते.
कोस्ट गार्डस् आणि मच्छिमार यांच्यात परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण व्हावेत या हेतूने रॅलीचे आयोजन केल्याबद्दल श्री. जानकर यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, कोस्ट गार्डस्, सागरी पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग, गुप्तवार्ता विभाग यांचे अतूट नाते आहे. या तिन्ही विभागांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास समुद्रातील हालचालींची माहिती त्वरित मिळू शकते. त्यामुळे सुरक्षेला असलेल्या धोक्यापासून वाचता येऊ शकते. तसेच खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या जीविताला तसेच मालमत्तेला वादळ, खराब हवामान आदी नैसर्गिक आपत्ती वा अन्य कारणांनी धोका उत्पन्न झाल्यास कोस्ट गार्डस् त्वरित मदतीसाठी धावून येते. कोस्ट गार्डसने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये मत्स्यव्यवसाय विभाग सक्रिय सहभाग घेईल तसेच पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन श्री.जानकर यांनी दिले.
कमांडर श्री.चाफेकर म्हणाले की, सागरी किनाऱ्यांवरील गावांमध्ये जाऊन नागरिक तसेच स्थानिक मच्छिमारांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने तसेच दोन्हींमध्ये चांगले नाते तयार व्हावे म्हणून कोस्ट गार्ड्सने या रॅलीचे आयोजन केले आहे. मच्छिमारांना समुद्रातील विघातक हालचालींची, परदेशी मासेमारी जहाजांची, अवैध बोटींची माहिती बऱ्याचदा लवकर मिळते. ही माहिती कोस्ट गार्डसला दिल्यास संभाव्य धोक्यांपासून समुद्री सीमांचे संरक्षण करणे शक्य होईल.
कोस्ट गार्डस् व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याचे काम करते. जहाजांना इलेक्ट्रॉनिक देखरेख प्रणाली बसविल्याने जहाजांची टक्कर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मच्छिमार बोटींना डिस्ट्रेस्ड अलार्म ट्रान्समिशन (डॅट) यंत्रणा बसविल्याने संकटातील बोटींना त्वरित मदत पोहोचवणे शक्य होत आहे. मच्छिमारांना जीवरक्षक जॅकेटचे वितरण आदींसाठी ओएनजीसी तसेच अन्य कंपन्या पुढे आल्याने मच्छिमारांचे जीवित काही अंशी सुरक्षित होत आहे. कोस्ट गार्डसने गेल्या वर्षात समुद्रामध्ये ६५८ लोकांचे प्राण वाचवले. कोस्ट गार्डसकडून सामाजिक बांधिलकी कार्यक्रम राबविण्यात येतो. यावर्षी मोटारसायकल रॅलीतील सहभागी स्वार थांब्याच्या ठिकाणी लोकांशी संवाद साधून समुद्रात घ्यावयाच्या सुरक्षेची माहिती देतील. याशिवाय स्थानिक युवकांनी कोस्ट गार्डमध्ये भरती व्हावे यासाठी त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा यासाठी प्रयत्न करतील. गावांमधील शाळांमध्ये जाऊन भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासह अभ्याससंच वितरित करतील, असेही ते म्हणाले.
५ जिल्ह्यातून १३४० कि.मी. चा रॅलीचा प्रवास
मोटारसायकल रॅली महाराष्ट्र व गोव्यातील पाच समुद्रतटीय जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पणजी या जिल्ह्यांमधून सुमारे १३४० कि.मी. चा प्रवास करणार आहे. दि. ३ जून रोजी दुपारी ३ वा. श्रीवर्धन, सायं. ७ वाजता दापोली, दि. ४ जून रोजी सकाळी १० वाजता दाभोळ, दुपारी ३.३० वाजता जयगड, सायं. ६.३० वाजता मिरकरवाडा, ५ जून रोजी दुपारी १२.३० वाजता देवगड, मालवण येथे सायं. ६ वाजता, दिनांक ६ जून रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला येथे थांबा घेऊन सायं. ६ वाजता गोवा येथे रॅली समाप्त होईल. दिनांक ७ जून रोजी रॅलीचा परतीचा प्रवास सुरू होऊन दुपारी १.३० वाजता मालवण येथे पोहोचेल. ८ जून रोजी दुपारी १ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. रॅलीचा मुक्काम मिरकर वाडा येथे असेल. दि. ९ जून रोजी दुपारी २ वाजता मुरुड जंजीरा येथे थांबा घेऊन दिनांक १० जून रोजी दुपारी ३ वाजता वरळी, मुंबई येथे रॅली समाप्त होईल. (‘महान्यूज’)