महाराष्ट्र भूजल नियम २०१८ च्या मसुदा; हरकती व सुचना पाठवाव्यात

जालना:- मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील जनतेला सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करुन अतिशोषित पाणलोट क्षेत्रात भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) नियम २०१८ च्या मसुदा नियमांवर जिल्ह्यातील पदाधिकारी व जनतेने हरकती व सुचना पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम २०१८ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, पुणे येथील भूजल सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक आय.आय शहा, औरंगाबाद येथील उपसंचालक पी.एल. साळवे, कनिष्ठ भू-वैज्ञानिक डॉ.शरद गायकवाड आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागला. लातुरसारख्या शहराला रेल्वेने पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्याने तसेच पाण्याच्या अतिउपशामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत अडवून जिरवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून शाश्वत पाणी साठे निर्मितीवर भर देण्यात येत आहे. तरी देखील पाणी वापरासंबंधात काही नियम असणे गरजेचे आहे. या बाबींचा विचार करुन महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) नियम २०१८ च्या मसुदा नियमावली तयार करण्यात आली असून यासाठी जनतेकडून अभिप्राय व सूचना मागविण्यात येत आहेत. राज्यात या मसुद्याच्या माहितीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या असून अशा प्रकारच्या कार्यशाळा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर घेऊन समाजामध्ये पाण्याच्या वापराबाबत माहिती करुन देण्याचे आवाहनही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी केले.

८५ लक्ष एवढी लोकसंख्या असलेल्या व पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या इस्त्राईल देशाचा मराठवाडा वॉटरग्रीडच्या अनुषंगाने नुकताच दौरा केला असल्याचे सांगत पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, इस्त्राईल देशात इतर देशांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या देशामध्ये पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब् न थेंबाचे वापराचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून पिण्यासाठी,शेतीसाठी व उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी वापरासाठी अत्यंत कडक असे नियम आहेत. पाण्याच्या एका थेंबाचाही या देशामध्ये अपव्यय होत नसल्यानेच या देशाची प्रगती झाल्याचे दिसून येत असल्याचेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या पीकांची लागवड करण्यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची गरज असल्याचेही श्री.लोणीकर म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही नियमावलीबाबत उपयुक्त अशा सुचना मांडल्या.

सुरुवातीस माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेस पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *