लोकसहभाग देणाऱ्या गावांना जलयुक्तच्या कामांत प्राधान्य द्यावे – पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

लातूर:- लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात घेण्यात येणाऱ्या जलयुक्तच्या कामांचे नियोजन करावे. जलयुक्तच्या कामांबाबत संपूर्ण जिल्ह्याची ब्लू प्रिंट तयार करावी. जलयुक्तच्या कामांत स्वत:हून लोकसहभाग देणाऱ्या गावांमध्ये कामे सूरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

दयानंद सभागृहात मृद व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विक्रम काळे, जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकरी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, कृषी सहसंचालक तुकाराम जगताप आदिंसह लोकप्रतिनिधी, अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, लातूर जिल्हा जलयुक्तच्या कामांमुळे टंचाईमुक्त झाला आहे. टंचाईच्या काळात जिल्ह्यात टँकरची संख्या सहाशे इतकी होती ती मागील दोन वर्षांत शून्य झालेली आहे. परंतु जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावात घेण्यात येणाऱ्या कामांचे योग्य नियोजन करून जिल्ह्याची ब्ल्यू प्रिंट तयार करावी. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने मिळणाऱ्या पोकलेन व जेसीबी मशीनचा अत्यंत काटेकोरपणे वापर करून कामे पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली.

जिल्ह्याच्या प्रत्येक गावात कामे होत असताना लोकसहभाग देणाऱ्या गावांना प्राधान्य देऊन ती गावे प्रथम दुष्काळमुक्त करावीत व त्यानंतर इतर गावांत कामे घ्यावेत. ही कामे करत असताना भविष्याचा विचार करून लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना निलंगेकर यांनी केली.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाने येथील शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्यासाठी मार्गदर्शन करावे. बदलत्या हवामानाच्या व कमी पाणी लागाणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी त्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील वातावरण हे रेशीम पिकास अधिक पोषक असल्याने ह्या पिकांकडे ही शेतकऱ्यांनी वळण्याचे आवाहन निलंगेकर यांनी केले.

जिल्ह्यात सुमारे ९०० गणेश मंडळे असून यावर्षीच्या गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन करून प्रत्येक गणेश मंडळाने प्रतिदिन दहा शोषखड्डे घेतले तर जिल्ह्यात गणेश उत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात जवळपास एक लाख शोषखड्डे निर्माण होतील, असे निलंगेकर यांनी सांगितले. मागील दोन-तीन वर्षांत लातूर जिल्हा वृक्ष लागवड माहिमेंत आघाडीवर असून वृक्ष संवर्धनाची टक्केवारी ८५ इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षा खात्रीशीरपणे अधिक असून या अधिकाऱ्यांच्या कामांमुळेच जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात यश मिळून जिल्हा दुष्काळमुक्त झाला असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली.

जलयुक्तची कामे करत असताना वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामांनाही तेवढेच महत्त्व दिल्यास पावसाचे पाणी जमिनीत जिरेल असे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. तर खासदार गायकवाड यांनी शाश्वत पाण्यासाठी जलयुक्त महत्त्वाचे असून इंद्रप्रस्थमुळे ही वृक्ष लागवड मोहिम जिल्ह्यात कार्यक्षमपणे सुरू असल्याचे सांगितले. यावेळी आमदार त्र्यंबक भिसे व विक्रम काळे यांनी ही मार्गदर्शन केले.

भारतीय जैन संघटनेने व पाणी फाऊंडेशन केलेल्या जलयुक्त कामांची माहिती देऊन लातूर जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामांसाठी आवश्यक तेवढा मशिनरींचा पुरवठा करण्यात येईल अशी माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.

शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जलयुक्तचा उपक्रम राबविला जात असून या कार्यशाळेच्या माध्यमातून या संयुक्त कामांत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व पुढील कामांचे योग्य नियोजन करणे अपेक्षित असल्याचे जलसंधारण सचिव डवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *