साईधाम महिला मंडळाचे भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय!

ओम साईधाम महिला मंडळाचे श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे झालेले सुश्राव्य भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय होते. त्यासाठी हा लेखन प्रपंच!

ओम साईधाम महिला मंडळाचे सुश्राव्य भजन श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे ऐकण्याची सुसंधी दोन दिवसापूर्वी आम्हाला मिळाली. श्रावण महिन्यात श्रवण भक्तीचा महिमा सनातन हिंदू धर्मात सर्वोच्च स्थानी आहे. परमात्म्याच्या आणि त्याच्या आईच्या म्हणजेच आदिमातेच्या रूपाचे-गुणांचे वर्णन करता करता त्यांना भजण्यासाठी-आळविण्यासाठी संगीताच्या लयबद्ध साथीने ज्या रचना भक्तिभावाने म्हटल्या जातात त्यास `भजन’ म्हटले जाते आणि असे परमात्म्यावरील – आदिमातेवरील प्रेमापोटी गायलेले भजन शांता दुर्गा देवी मंदिरात श्रवण केले. ओम साईधाम महिला मंडळातील प्रत्येक महिला सदस्याने त्यात पूर्ण अंतःकरणाने घेतलेला सहभाग मनाला भावला. त्यामुळे उपस्थित श्रोतेजण आनंदित झाले होते.

देवाला, आदिमातेला सर्व भाषा समजतात. त्यांना समजत नाही अशी भाषा नाही. मात्र आपुलकीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा जेव्हा ओलावा व्यक्त होणाऱ्या भाषेत असतो तेव्हा तो देवाला अधिक प्रिय असतो. ते श्रवण करण्यासाठी साक्षात आदिमातही सुक्ष्म रूपाने प्रत्यक्ष हजर राहते आणि तोच अनुभव साईधाम महिला मंडळाच्या भजनात घेता आला. भारतात अनेक भाषा आहेत, अनेक बोली भाषा आहेत. ह्या भाषेच्या माध्यमातून आपण एकमेकांना जोडून घेतले पाहिजे. पण भाषेवरूनही माणसामाणसात दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसत असताना साईधाम महिला मंडळाच्या भजनात पाच भारतीय भाषेत भजनं गायली गेली; हे विशेष! ह्या भजनाच्या माध्यमातून सांघिक उपासनाही झाली. ह्या सांघिक उपासनेचे महत्व भारतीय धर्मांमध्ये असतानाही त्याकडे दुर्लक्ष होतोय. मात्र साईधाम महिला मंडळाच्या भजनात आपसूकपणे सांघिक भावनेने भजन करून सांघिक उपासना मोठ्या भक्तिभावाने केली.

ह्या भजनात छाया जोशी, संगीता कबिर, नेहा गुप्ता, मुग्धा सावंत, सरोज शनैश्चर, शिला राव, रमा सिंह, प्रिती गुप्ता, जयश्री चंपानेरकर, आशा सोनालकर, सुधा बामणे, लक्ष्मी जयस्वाल, अनमोल शुक्ला, सावित्री भट, लक्ष्मी नाईक, वृंदा हट्टंगडी आणि द्रौपदी यादव यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यासाठी अनेक दिवस सराव केला. मेहनत घेतली. त्यासाठी साईधाम महिला मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! महिला भजन मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी मी स्वतः, ओम साईधाम देवालय समितीचे खजिनदार चेतन नाईक, साईभक्त प्रकाश सोनालकर, पत्रकार नरेंद्र हडकर आणि सिद्धिविरा हडकर श्री शांता दुर्गा देवी मंदिरात हजर होतो. श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने आम्हा उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करून सन्मानित केले. त्यांनी दिलेला आदर निश्चितच आमच्यासाठी साक्षात आदिमातेची अमूल्य भेट होती. श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने साईधाम महिला मंडळाचे कौतुक करून यानंतरही होणाऱ्या उत्सवात भाग घेण्याचे आवाहन केले.

खरोखरच मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी साईधाम महिला मंडळाने केलेले भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य सदैव स्मरणात राहील; कारण ते अविस्मरणीय होते आणि त्यात आदिमातेच्या श्रद्धावानांचा प्रेमभाव होता.

-मोहन सावंत