सावधान… दादरला स्वस्त भाजी-फुले आहेत म्हणून घेताय? तुमची होतेय फसवणूक!
मुंबई (रोहिणी सातपुते):- मुंबईचा सर्वात स्वस्त बाजार म्हणून मुंबईचे लोक मोठ्या प्रमाणावर दादर पश्चिमेला बाजारात दिवसभर भाजी आणि फुले घेत असतात. पण मापात पाप करून फेरीवाले मुंबईकरांना फसवत असतात. जर एखाद्या गिऱ्हाईकाला घेतलेल्या भाजीचे वजन कमी असल्याचे लक्षात आले आणि त्याने दुसऱ्या फेरीवाल्याकडे वजन करून मागितले तर ते स्पष्ट नकार देतात. कारण आपापसात भांडणं नकोत म्हणून ते फेरीवाले ह्या बाबतीत संघटित वृत्ती दाखवून गिऱ्हाईकांना फसविण्यात धन्यता मानतात.
स्वस्त भाजी-स्वस्त फुले आहेत म्हणून दादरला पश्चिमेला स्टेशनलगत दिवसभर बाजार असतो. दक्षिणेच्या बाजूने फुलांचा बाजार असतो; तर उत्तरेच्या बाजूने भाजीचा बाजार असतो. ह्यातील रस्त्यावर बसणारे, उड्डाण पुलाखाली बसणारे भाजीवाले – फुलवाले अक्षरशः मापात पाप करीत असतात. लोक घाईगडबडीत असल्याने त्याचा फायदा घेत हे तथाकथित व्यापारी लोकांना लुटत असतात. याबाबत संबंधित फेरीवाल्याला विचारले की, तो ती गोष्ट नाकारतो. मग आजूबाजूला घेतलेल्या भाजीचे – फुलांचे वजन करून कोणीही देत नाही. ह्या फेरीवाल्यांकडे साधे वजनकाटे असो वा इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे; ते सेटिंग केलेले असतात. अशी वजनकाट्यात सेटिंग करून हजारो मुंबईकरांना फसविले जाते.
मुंबईकर व्यवहाराच्या बाबतीत सजग असतो; परंतु दादरला हे काही फेरीवाले मात्र मुंबईकरांना दिवसाढवळ्या लुटत असतात. यासंदर्भात अनेक मुंबईकरांच्या तक्रारी आहेत; पण त्यांच्याकडे धकाधकीच्या जीवनात वेळ नाही. त्यासाठी दादरमधील स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखल घ्यावी; अशी मागणी होत आहे. एका गृहिणीने तर “मनसेने `मनसे स्टाईल’ने मुंबईकरांना फसविणाऱ्या फेरीवाल्यांना दणका द्यावा!” अशी भावना आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.